एखाद्या विषयाशी निगडीत वस्तूंचा संग्रह अथवा प्रदर्शन करणाऱ्या वास्तूला 'संग्रहालय' असं म्हणतात. काही संग्रहायलांमध्ये एकापेक्षा अनेक विषयाशी निगडीत वस्तू असू शकतात. वस्तू संग्रहालये ऐतिहासिक पंरपरा असलेल्या वस्तू अथवा शिल्प, प्राचीन संस्कृती, इतिहास जतन करण्यास मदत करतात. या संग्रहालयातून मिळणारी माहिती अभ्यासकांना अभ्यास करण्यासाठी फायदेशीर ठरते. देशभरात विविध विषय आणि वस्तूंची माहिती देणारी संग्रहालये आहेत. ज्यामुळे त्या देशाचा, शहराचा इतिहास पुढील पिढीला वारसारुपाने मिळू शकतो.
संग्रहालयांचे विविध प्रकार असतात. अगदी प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तूंपासून ते जैवविवधता जपणारी अनेक संग्रहालये असतात.
ऐतिहासिक संंग्रहालय - या ठिकाणी ऐतिहासिक वस्तू, शिल्प, कागदपत्रे, हत्यारे, ठिकाणे यांचा परिचय केला जातो.
उत्क्रांती इतिहास संग्रहालय - अशा संग्रहालयातून पृश्वीच्या निर्मितीपासून मानवाच्या उत्क्रांतीपर्यंत विविध जैवविविधतेची ओळख या ठिकाणी केली जाते.
सजीव संग्रहालय - वनस्पती, प्राणी, उभयचर, मासे अशा विविध ठिकाणांची माहिती या ठिकाणी मिळते.
विशेष संग्रहालय - एखाद्या विशेष वस्तू अथवा विषयाबाबत ज्या ठिकाणी माहिती प्राप्त होऊ शकते.
व्हर्चुअल संग्रहालय - घरबसल्या जगभरातील गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर व्हर्चुअल संग्रहालये उपयोगी पडतात.
पुढील पिढीला प्राचीन संस्कृती अथवा एखाद्या विषेश गोष्टींबाबत माहिती देण्यासाठी अशी संग्रहायले प्रत्येक शहरात असतात. मुंबई शहरातील विविध प्रकारची असलेली ही संग्रहायले जाणून घेण्यासाठी पुढील माहिती जरूर वाचा.
मुंबई शहरातील हे एक सर्वात महत्त्वाचं आणि प्राचीन वस्तू संग्रहालय आहे. हे म्युझियम फोर्टमध्ये आहे. 20 व्या शतकातील असून आजही या संग्रहालयाची वास्तू भक्कम आहे. या वास्तूच्या आतील आणि आजूबाजूच्या परिसराचा आराखडा ब्रिटीश वास्तू विशारद जॉर्ज विटेट यांनी तयार केला होता. या वास्तूच्या रचनेत इस्लामी, राजपूत आणि हिंदू मंदिरांच्या वास्तू तंत्राचा वापर केलेला आहे.
या संग्रहालयात अभ्सास करण्यासाठी आणि पाहण्यासाठी अनेक प्राचीन गोष्टीं आणि दुर्मिळ चित्रं, हस्तलिखीते जतन करून ठेवलेल्या आहेत. या संग्रहालयातील विविध दालने फिरण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तास लागतात.
तसेच कोलाबा कॉजवे मार्केट वाचा
मुंबईची संस्कृती समजून घ्यायची असेल तर भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाला जरूर भेट द्या. पूर्वी या संग्रहालयाचे नाव व्हिक्टोरीया अॅंड अल्बर्ट म्युझियम असे होते. या वास्तूची निर्मिती 2 मे 1872 साली झाली. मात्र नंतर या वास्तूचे नामकरण मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ आणि या संग्रहालयाच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजावणारे डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मुंबईतील हे अतिशय प्राचीन वस्तू संग्रहायल आहे.
जगाला अंहिसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींंच्या मुंबईतील निवासस्थानाचे नाव मणि भवन. या ठिकाणी एक अनामिक शांतता आणि प्रसन्नता तुम्हाला मिळू शकते. ग्रॅंट रोडच्या गावदेवी विभागातील लॅबर्नम रोडवर ही ऐतिहासिक वास्तू आहे. या ठिकाणी गांधीजी जवळजवळ सतरा वर्षे वास्तव्यास होते. या संग्रहालयात आजही तुम्हाला गांधीजीच्या जीवनावर आधारीत पुस्तके, त्यांची लेखनसामुग्री, चरखा आणि ते वापरत असलेल्या वस्तू जतन केलेल्या आढळतील.
मुंबईतील तारांगण तुम्हाला अवकाशाच्या अद्भूत विश्वात घेऊन जातं. आकाशदर्शनाचा एक अनोखा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तारांगणला जरूर भेट द्या. तारांगणाच्या या गोलाकार वास्तूमध्ये जवळजवळ 600 लोक एकत्र बसून आकाशदर्शन करू शकतात. लहान मुलांना खगोलशास्र शिकवण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. मुंबईतील वरळी येथे हे तारांगण आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील आर सिटी मॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित व्यक्तीमत्वांचे मेणाचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला राजकारणी, कलाकार, खेळाडू अशा मान्यवर व्यक्तींचे मेणाचे पुतळे दिसू शकतात. तसंच तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या हाताचा हॅंड वॅक्सदेखील बनवून घेऊ शकता.
मुंबई शहरातील अनेक महत्त्वांच्या वास्तूंपैकी ही एक महत्त्वाची वास्तू आहे. फोर्ट येथील काळा घोडा परिसरात हे कलादालन आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरत असलेल्या विविध कलाप्रदर्शने आणि उपक्रमांमुळे कलाकारांना त्यांच्या हक्काचे एक स्थान मुंबईत निर्माण झाले आहे. या वास्तूची निर्मिती 1952 साली झाली.
मुंबईतील वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र हे भारतातील सर्वात मोठं विज्ञान केंद्र आहे. या ठिकाणी तुम्हाला ऐतिहासिक वैज्ञानिक वस्तू, उपकरणं, संकल्पनांचे जतन केलेले आढळून येईल. लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी त्यांना अशा विज्ञान केंद्रांना जरूर घेऊन जावं. या केंद्रामधून वैज्ञानिक विश्वाचं एक आगळंवेगळं जग पाहता येऊ शकतं.
मुंबईतील नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट 1996 मध्ये सर्वांसाठी खुली करण्यात आली. या ठिकाणी प्रसिद्ध कलाकारांच्या विविध कलाकृती, शिल्पे, चित्रे प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात. जर तुम्हाला दुर्मिळ कलाकृती, चित्रांचा ठेवा पाहायचा असेल तर तुम्ही मुंबईतील या कलादालनाला जरूर भेट द्यायला हवी.
जर तुम्हाला जुन्या आणि दुर्मिळ नाण्यांचं जतन करण्याची सवय अथवा आवड असेल तर हे संग्रहायल तुम्हाला नक्कीच आवडेल. या संग्रहालयात तुम्हाला तुम्ही कधीच न पाहिलेली आणि प्राचीन नाणी पाहायला मिळतील. जर तुम्ही प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करत असाल तर या नाण्यांमुळे तुम्हाला प्राचीन संस्कृतीचे अनेक संदर्भ मिळू शकतात.
पत्ता - भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय , पिरोज शहा मेहता रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई 400001
कसे जाल - मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनर्सवरून अगदी चालत तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
कधी जाल - मंगळवार ते रविवार
वेळ - सकाळी 10:30 ते 5
प्रवेश फी - विनामुल्य
जर तुम्हाला बेस्टची तिकीटे जमवण्याचा छंद असेल तर या ठिकाणी तुम्हाला अगदी जुनी बेस्ट तिकीटे पाहण्यास मिळतील. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे बस इंजिन, तिकीट तयार करण्याचं मशिन, जुन्या काळात बेस्टमध्ये लिहीले जाणारे फलक अशा अगदी जुन्या आठवणींनी उजाळा देणाऱ्या गोष्टी तुम्ही या संग्रहालयात पाहू शकता.
पत्ता- बेस्ट संग्रहालय, तिसरा मजला, आनिक बस आगार, सायन, मुंबई 400022
कसे जाल - कुर्ला अथवा चुनाभट्टी रेल्वे स्थानकावरून तुम्ही बसने या ठिकाणी जाऊ शकता.
कधी जाल - बुधवार ते रविवार
वेळ - सकाळी 9:00 ते 5:00 ( या ठिकाणी दोन तास फिरण्याची परवानगी तुम्हाला मिळू शकते)
प्रवेश फी - प्रवेश विनामुल्य आहे
आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि यापैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही भेट दिली आहे हे आम्हाला जरूर कळवा
अधिक वाचा -
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक