मुंबई तुम्हाला छोटीशी वाटत असली तरी मुंबईमध्ये बरेच काही पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहे. मुंबईत मिळणारे खाद्यपदार्थही फारच प्रसिद्ध आहे. तुम्ही मुंबईत आलात आणि मुंबईच्या खाऊगल्ल्या फिरला नाहीत तर मग तुम्ही मुंबई काहीच फिरला नाही असं होतं. मुंबईत तुम्हाला प्रत्येक नाक्यावर, चौकात चमचमीत आणि चविष्ट असे पदार्थ मिळतात. प्रत्येक पदार्थाची चव आणि त्याची खासियत वेगळी आहे. तुमच्या प्रत्येक वीकेंडला तुमचे जीभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी मुंबईतील ठिकठिकाणी खाऊगल्ल्या आहेत. आज करुया मुंबईतल्या याच खाऊगल्ल्यांची सफर… मग करायची का सुरुवात.
मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी कंपन्या असल्यामुळे त्या ठिकाणी कामाला येणारा नोकरदार वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी तुम्हाला खाण्याचे वेगवेगळे पर्याय नक्कीच दिसतात. अगदी हातगाड्यांपासून ते हॉटेलपर्यंतचे सगळे पर्याय तुम्हाला मुंबईत अगदी सहज मिळतात. असं म्हणतात मुंबईत एखाद्यावेळी राहण्याची सोय होणे कठीण आहे. पण या मायानगरीत कोणीही कधीही उपाशी राहत नाही. प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी अगदी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबई आणि मुंबईत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे नाते हे अगदी घट्ट आहे.
आज आपण मुंबईतील अशी काही ठिकाणं पाहुया जिथे तुम्हाला मस्त चमचमीत आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ खाता येतील. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधील ही ठिकाणं असून तुम्ही वीकेंडला या खाण्याचा आनंद घेऊ शकता.
अकक्ड बक्कड बंबे बो हे कांदिवली येथील प्रसिद्ध सँडवीचचे दुकान आहे. या ठिकाणी मिळणारे सँडवीच अप्रतिम आहे. चवीसोबतच यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सँडवीचच्या व्हरायटीही मिळतील. तुमचा चीझ हा वीकपॉईंट असेल तर तुम्हाला या ठिकाणी अगदी हमखास जायला हवे. हे दुकान आधी एक स्टॉल होता. पण आता यांनी हे दुकान चांगले केले आहे. दुकान केले असले तरी येथील किंमती या आजही लोकांच्या खिशाला परवडणारऱ्या अशा आहेत. खव्व्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पहाडी ग्रील सँडवीच फारच प्रसिद्ध आहे. नावाप्रमाणे हे सँडवीच आकाराने डोंगरासारखे असून हे खाण्यासाठी तुम्हाला पोट रिकामी ठेवावे लागेल किंवा तुम्हाला तुमच्यासोबत हे सँडवीच खाण्यासाठी तुम्हाला पलटणच न्यावी लागेल. याशिवाय येथे मिळणारे चॉकलेट सँडवीचही तुम्ही चाखून पाहायला हवे.
पत्ता : BMC ऑफिस, के के मीना सुतार मार्ग,महात्मा गांधी क्रॉस रोड क्रमांक 3, कांदिवली
वेळ: दुपारी 3 ते पहाटे 2 वाजेपर्यंत
जर तुम्हाला मुंबईची खासियत असलेला वडापाव खायचा असेल तर ठाण्यातील प्रसिद्ध गजानन वडापाव तुम्ही नक्कीच चाखायला हवा. गजानन वडापावची खासियत सांगायची झाली तर हा वडापाव देण्याची एक वेगळीच पद्धत आहे. पानावर वडापाव आणि त्यासोबत एक खास चटणी देखील दिली जाते. हीच चटणी याची खासियत आहे. एका स्टॉलपासून या दुकानाची सुरुवात झाली आता ठाण्यात याचे एक मोठे दुकान आहे. गजानन वडापावसोबत बेसन चटणी दिली जाते. जर तुम्हाला वडापाव खायचा असेल आणि त्यासोबत चमचमीत चटणी तर तुम्ही गजानन वडापाव खायलाच हवा. हे दुकान थोडे लहान असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आरामात खाता येणार नाही. वडापाव व्यतिरिक्त तुम्हाला इतर महाराष्ट्रीयन पदार्थांची तुम्हाला चव चाखता येईल.
पत्ता : छत्रपती संभाजी रोड, नौपाडा,ठाणे
वेळ: सकाळी 7.30 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत
मुलुंड पश्चिम हे देखील खव्व्यांसाठी एकदम मस्त ठिकाणं आहे. तुम्हाला इथे खूप काही व्हरायटी मिळेल. मुलुंड पश्चिमेकडील कालिदास नाट्यगृहासमोर खूप मोठी खाऊगल्ली आहे. या खाऊगल्लीत डोसा, पावभाजी असे अनेक खाद्यपदार्थ मिळतात. पण या ठिकाणी मिळणारा मसाला वडापाव हा फारच प्रसिद्ध आहे. मस्त पावभाजीसारख्या भाजीमध्ये चळचळवलेला पाव आणि त्यासोबत मिळणारा गरमगरम वडा येथील खासियत आहे. या वडापावचा एक बाईट घेतल्यानंतर तुमच्या तोंडात सगळे फ्लेवर रेंगाळल्याशिवाय राहणार नाहीत. यासोबत तुम्हाला हिरवी चटणी आणि मिरची दिली जाते.
पत्ता : कालिदास नाट्यगृहासमोरील गल्ली, मुलुंड (पश्चिम)
वेळ : सकाळी 11 नंतर
तुम्हाला साऊथ इंडियन फुड खायचे असेल तर तुमच्यासाठी प्युअर मिल्क सेंटर घाटकोपर हा मस्त पर्याय आहे. या ठिकाणी मिळणारे डोशाचे प्रकार मिळतात. इंडो-वेस्टर्न कॉम्बिनेशनच्या डोश्याचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी मिळतात. चीझ- पास्ता- फ्रेंचफ्राईज असे घालून येथील डोसा सर्व्ह केला जातो. या डोशाची प्रसिद्ध इतकी आहे की, डोसा म्हटलं की घाटकोपरच्या प्युअर सेंटरचे नाव आवर्जून घेतले जाते. तुमच्या खिशाला परवडेल असे खाद्यपदार्थ तुम्हाला याठिकाणी मिळू शकतील. येथील सांबार चटणीसुद्धा फारच चविष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एकदा तरी या ठिकाणी जायला हवे.
पत्ता: RB मेहता मार्ग, सिंधू वाडी, घाटकोपर (पूर्व)
वेळ: सकाळी 7.30 -11.30 आणि दुपारी 3.30 ते 11.30 वाजेपर्यंत
पावभाजी म्हटलं की सरदार पावभाजीचे नाव अगदी आवर्जून घेतले जाते. जर तुम्हाला परफेक्ट पावभाजी खायची असेल तर सरदार पावभाजी खायला हवी. या ठिकाणी पावभाजी खाण्यासाठी लोकांची खूपच गर्दी असते.त्यामुळे तुम्हाला येथे पावभाजी मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. ही पावभाजी एकाचवेळी खूप जणांना सर्व्ह केली जाते. त्यावर मोकळ्या हाताने बटर टाकलेले असते. पावभाजी व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी पिण्यासाठीही खूप चांगले पर्याय आहेत. तुम्हाला सीझननुसार या ठिकाणी स्मुदी आणि मिल्कशेक मिळू शकतील.
पत्ता : 166 A- तारदेव रोड जंक्शन, जनता नगर, तारदेव, मुंबई- 400034
वेळ : दुपारी 12 ते रात्री 2 वाजेपर्यंत
वाचा - मुंबईत पावभाजीचा ठिकाणांना
जर तुम्हाला वेगळे सँडवीच खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही लाला लजपतराय कॉलेजजवळील सँडवीच नक्कीच खायला हवे. समोसा सँडवीच ही येथील खासियत आहे. या कॉलेजच्या बाहेर तुम्हाला अनेक सँडवीचची दुकाने दिसतील. या सगळ्याच स्टॉलवर तुम्हाला उत्तम सँडवीच मिळू शकतील. या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी तर असतेच. पण या शिवाय ही इतर खव्व्यांची गर्दी तुम्हाला या ठिकाणी दिसू शकेल. ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड अशी व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळेल. मसाला टोस्ट, क्लब टोस्ट, चॉकलेट सँडवीच असे प्रकार तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील.
पत्ता : लाला लजपतराय कॉलेज, लाला लजपतराय मार्ग, हाजी अली गव्हर्टमेंट कॉलनी, महालक्ष्मी, मुंबई- 400034
वेळ: सकाळी 8 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत
मुंबई ओळखलीच जाते चमचमीत पदार्थांसाठी सांताक्रुझ येथील एका स्टॉलवर मिळणारी भजी म्हणजे क्या बात है.. तुम्हाला यासोबत मस्त चमचमीत भजी आणि सोबत तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी मिळतील. गरमागरम पदार्थ या ठिकाणी मिळतात म्हणूनच हे खाण्यासाठी येथे लोकांची गर्दी असते. जर तुम्हाला मस्त गरमा गरम चहा आणि भजी खायची असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी जायला हवे. मस्त पेपर आणि पानावर सर्व्ह केली जाणारी भजी आणि वडापाव म्हणजे तुमचा मूड एकदम सेट होणारच.
पत्ता: आशा पारेख रुग्णालयासमोर, सांताक्रुझ पश्चिम
वेळ: सकाळी 8.30 वाजता
जर तुम्ही बोरीवलीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बोरीवली येथील दिनेश पावभाजीला भेट द्यायलाच हवी. कारण या ठिकाणी मिळणारा मसालेदार पॅटीस पाव हा फारच प्रसिद्ध आहे. पावामध्ये घातलेलं पॅटीस आणि पावाला लावलेली मस्त चटकदार चटणी आणि त्यावर कांदा, भुरभुरलेली शेव आणि चटण्या म्हणजे क्या बात है… पावभाजी आणि पाणीपुरी, शेवपुरी यामध्ये काय खाऊ असा विचार करत असाल तर बोरीवली येथील दिनेश पावभाजी सेंटरला नक्कीच भेट द्या. तुम्हाला या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे पदार्थदेखील खायला मिळतील.
पत्ता : शॉप क्रमांक 4, योगी विहार सोसायटी, योगी नगर, एक्सार, बोरीवली, मुंबई 91
वेळ: दुपारी 3 वाजल्यापासून
वाचा - दाक्षिणात्य खाद्यपदार्थ चाखायचे असतील तर मुंबईतील हे स्टॉरंट आहेत बेस्ट
मुंबईत सध्या आणखी एक वडापाव प्रसिद्ध आहे तो म्हणजे भाऊचा वडापाव. भांडुपमध्ये याचे मूळ दुकान असून अगदी 3 रुपयांपासून या ठिकाणी वडापाव विक्रीला सुरुवात झाली. या वडापावची खासियत सांगायची तर त्याचा मोठा आकार आणि त्यासोबत मिळणारी खोबऱ्याची लाल मिरची वाटून केलेली चटणी आणि सोबत बारीक चिरलेला कांदा, भांडुपमध्ये हा वडापाव फारच प्रसिद्ध असून या दुकानामध्ये फारच गर्दी असते. वडापाव व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी चुरा पाव, राईस प्लेट असे देखील खाता येईल. गरम गरम भाऊचा वडा मस्त कागदावर दिला जातो. त्याचा आकार पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिवाय या वडापावसाठी येणारे पावही खास असतात.
पत्ता: भाऊचा वडापाव, शिवाजी तलाव समोर, भांडुप (प.) मुंबई 400078
वेळ: सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत
जर तुम्हाला चाटचा पर्याय हवा असेल तर मग तुम्ही मुलुंड येथील जय जलाराम भेलपुरीला नक्कीच भेट द्यायला हवी. मुलुंडच्या पाचरस्त्यावर जय जलारामचा ठेला आहे. तुम्हाला भेळचे विशेष सांगायचे तर सढळ हाताने यामध्ये सगळे जिन्नस घातले जातात. येथील सुकी भेळ, ओली भेळ तुम्ही नक्कीच चाखायला हवी. सगळ्या चटण्या या थंडगार असल्यामुळे खाताना एक वेगळा आनंद मिळतो. शिवाय पानामध्ये ही भेळ दिली जाते सोबत खायला चमचाही दिला जातो. त्यामुळे तुम्हाला ही चटपटीत चमचमीत भेळ अगदी नीट खाता येते. जय जलाराम हा आईस भेळसाठी फारच प्रसिद्ध आहे.
पत्ता: विद्याविहार मार्ग, एम जी रोड, मुलुंड (प.)
वेळ: संध्याकाळी 4.30 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत
तुम्ही वेस्टर्नकडे राहणारे असाल तर तुमच्यासाठी सांताक्रुझ येथील राम श्याम चाट कॉर्नरला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे चाट खाण्याचा आनंद घेता येईल. या चाटची चव चाखण्यासाठी फारच गर्दी असते. येथील दहीपुरी तर चवीला फारच सुंदर लागते. जर तुम्ही काहीही न जेवता गेलात तर येथील एक प्लेट दहीपुरीच तुमचे पोट भरुन टाकेल. त्यामुळे एखाद्या संध्याकाळी तुम्हाला येथे फेरी मारायला हरकत नाही.
पत्ता: नॉर्थ एव्ह, सांताक्रुझ (प.) मुंबई -54
वेळ : दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत
मुलुंड येथील सर्वोदय येथे देखील एक खाऊगल्ली आहे. या खाऊगल्लीत तुम्हाला अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. जर तुम्हाला सँडवीचचा वेगळा प्रकार खायचा असेल तर मग तुम्ही या खाऊगल्लीत नक्कीच जा. तुम्हाला या ठिकाणी उत्तम क्लब सँडवीच मिळेल. हे क्लब सँडवीच इतक्या छान पद्धतीने सर्व्ह केलेले असते की, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून समजा. मस्त चिप्स आणि चीझ घालून हे चीझ टोस्ट क्लब सँडवीच दिलं जातं आणि सोबत मस्त चटणी.
पत्ता : सर्वोदय नगर, मुलुंड (प.)
वेळ : दुपारी 3 नंतर
आता तुम्हाला काही मस्त प्यायचा विचार असेल तर सीएसटी येथील प्रसिद्ध बादशाह ज्यूस सेंटरमध्ये नक्कीच जायला हवं, कारण तुम्हाला या ठिकाणी अगदी क्लासिक असे फालुदा खायला मिळतील. हे फालुदा खाल्यानंतर तुम्हाला बाकी काहीच खायची इच्छा होणार नाही. ड्रायफ्रुटचा भडीमार असलेल्या या फालुद्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घासात वेगळी चव लागेल जी तुम्हाला छान गारवा देऊन जाईल. जर तुम्ही फुडी असाल तर एक पूर्ण ग्लास संपवू शकाल अन्यथा एक ग्लास फालुदा संपवणे ही कठीण गोष्ट आहे. शिवाय तुम्हाला सीझनल फळांचे मस्त फालुदे या ठिकाणी मिळतात.
पत्ता : जोतिबा फुले मंडई समोर, क्रॉफर्ड मार्केट, सीएसटी, मुंबई
वेळ: सकाळी 8 वाजल्यापासून
हल्ली मुंबईत अनेक ठिकाणी फुड ट्रक दिसू लागले आहेत. रुईया कॉलेजच्या बाहेर असणारा असाच एक फुड ट्रक आणि त्यामधील खाद्यपदार्थ म्हणजे तुम्हा खव्वयांसाठी छान मेजवानीच आहे. याचे कारण असे की, जर तुम्हाला नवीन काहीतरी खायचे असेल तर हे नक्की ट्राय करायला हवे. डिलाईट डंपलिग्ज या फुड ट्रकवर मिळणारे मोमोज म्हणजे क्या बात है.. सोबत सर्व्ह होणारे डंपलिग्ज तुम्ही नक्की खाऊन पाहायला हवे.
पत्ता : डिलाईट डंपलिंग्ज
वेळ: तसं तर कॉलेजच्या वेळात हा ट्रक या ठिकाणी असतोच
जर तुम्हाला फ्रँकी खायची असेल तर मात्र तुमच्यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे हिंदुजा कॉलेज येथील फ्रँकीचा..हिंदुजा कॉलेजच्या जवळपास असल्यामुळे ही फ्रँकी याच नावाने ओळखली जाते. येथील फ्रँकीबद्दल सांगायचे झाले तर तुम्हाला याची चटणी वेगळी लागते.याशिवाय येथील सँडवीचही फार प्रसिद्ध आहे. या सँडवीचवर भरभरुन बारीक शेव भुरभुरली जाते. त्यामुळे त्याला एक मस्त इंडियन टच मिळतो.
पत्ता: हिंदुजा कॉलेज जवळ, चर्नी रोड
वेळ : सकाळी 10 वाजल्यापासून
सध्या सँडवीचमध्ये पानिनी सँडवीचचा प्रकार आहे. चर्चगेटच्या HR कॉलेजच्या बाहेर तुम्हाला राजू सँडवीचवाला दिसेल. चीझ, पानिनी ब्रेड आणि मस्त भाज्या असं कॉम्बिनेशन असलेलं हे सँडवीच तुम्ही नक्कीच खाऊन पाहायला हवं. तुम्हाला यामध्ये भाज्यांची व्हरायची चाखता येईल. मस्त चिली फ्लेक्स आणि हर्ब्स घालून तुम्हाला हे सँडवीच खाता येईल.
पत्ता : HR कॉलेजच्या बाहेर, चर्चगेट
वेळ : कॉलेजच्या वेळात तुम्हाला मिळेल.
Also Read: 10 Best Place To Eat Vada Pav In Mumbai In Marathi
समोसा आणि रगडा याचं सुरेख कॉम्बिनेशन तुम्हाला फक्त सायन येथील गुरुकृपा येथे खाता येईल. रगडा समोसासोबत गोड चटणी आणि कांदा असे यासोबत दिले जाते. गुरुकृपाचे समोसे फारच फेमस आहेत. याचा आकारही एकदम युनिक आहे. शिवाय या समोस्याची चव अगदी हमखास जीभेवर रेंगाळतेच. या शिवाय तुम्हाला येथे उत्तम जेवण, गोड पदार्थ आणि चाट सुद्धा मिळेल.
पत्ता: गुरुकृपा, सायन स्टेशन जवळ, सायन
वेळ: सकाळी 10 ते रात्री 10
जर तुम्हाला सँडवीचमधील वेगळा प्रकार खायचा असेल तर तुम्ही प्रिती सँडवीच आणि ज्युस सेंटरला भेट देऊ शकता. येथे मिळणारे मॅगी सँडवीच एकदमच वेगळे आहे. सँडवीच टोस्ट करुन त्यावर तुमची आवडती मॅगी घातली जाते. यावर चीझ आणि कोबीचे सॅलेड घातले जाते. त्यामुळे वेगवेगळी चव तुम्हाला यामध्ये नक्कीच घेता येते.
पत्ता: शॉप क्रमांक 2, योगेश बिल्डींग, गणेश गावडे मार्ग, राजूपानवाला जवळ, मुलुंड ( प.)
वेळ: दुपारी 12.30 ते रात्री 1.30 वाजेपर्यंत
चायनीजचा कोणताही प्रकार म्हटला की, तो मस्त चमचमीत आणि छान लागतो. त्यात चायनीज भेळची तर गोष्ट निराळीच असते. तुम्हालाही चायनीज भेळचा आनंद घ्यायचा असेल तर विद्याविहार पूर्वेला चालत गेल्यावर तुम्हाला एक स्टॉल दिसेल तिथे तुम्हाला हॉट पॅन हा प्रकार मिळेल. इतर चायनीज भेळसारखी ही भेळ नाही. यामध्ये तुम्हाला मंच्युरिअन फ्राईड नुडल्स आणि बरेच काही अनुभवता येईल
पत्ता: विद्याविहार पूर्वेला चालत अगदी दोन मिनिटांवर
वेळ: संध्याकाळी 4 वाजल्यापासून
आता तुम्हाला इतकं खाल्ल्यानंतर थोडसं थंडगार खावंस वाटत असेल तर मग तुम्ही हमखास के रुस्तमचं आईस्क्रिम सँडवीच खायला हवं. तुम्हाला कुरकुरीत आणि थंड हे सँडवीच नक्कीच खायला हवं. हे खाताना तुम्हाला मस्त वेगवेगळे फ्लेवर्स अनुभवता येतील.
पत्ता: के रुस्तम कॉलेजच्या शेजारी, चर्चगेट
वेळ: सकाळी 10 वाजल्यापासून
मुंबई जरी लहान असली तरी मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत काही ना काही खाद्यपदार्थ मिळतातच. वडापाव, पावभाजी, डोसा असे खाद्यपदार्थ हमखास या ठिकाणी तुम्हाला मिळतात. त्यामुळे मुंबईत एकच खाद्यपदार्थ प्रसिद्ध नाही तर असे अनेक खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत.
मुंबईत ठिकठिकाणी वडापाव मिळतो. वडापावचा शोध हा मुंबईतला आहे. त्यामुळे मुंबईत गल्लीत आणि नाक्या नाक्यावर तुम्हाला वडापाव मिळतो. शिवाय वडापाव हा अगदी स्वस्तात मस्त आणि पोटभरीचा असल्यामुळे मुंबईकरांच्या पोटाला आधार देणारा असा हा खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईत आलात तर तुम्हाला ठिकठिकाणी वडापाव दिसेल. त्यामुळेच मुंबईची ओळख ही वडापाव झाली आहे.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी उत्तम चाट मिळते. दक्षिण मुंबईपासून ते अगदी मुंबई उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी असे चाट सेंटर आहेत. गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, बोरीवली घाटकोपर, मुलुंड येथील खाऊगल्लीमध्ये तुम्हाला बेस्ट चाट मिळतील. पापडी चाट, ढोकला चाट, समोसा चाट, छोले समोसा, फ्लेवर्ड पाणीपुरी असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळतील.
मुंबईत बऱ्याच खाऊ गल्ली प्रसिद्ध आहेत. सीएसटीला फॅशन स्ट्रीट मागील खाऊगल्ली, भुलेश्वर खाऊगल्ली, काळबादेवी, बोरीवली,पार्ले पश्चिम, मुलुंड पश्चिम या ठिकाणी खाऊगल्ली आहेत.
You Might Like This:
मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ
खवय्ये असाल तर नक्की भेट द्या दक्षिण मुंबईतल्या बेस्ट रेस्टॉरंट्सना