बऱ्याच जणांना रोज दही खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहीत आहे का? रोज दही भात खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बऱ्याच जणांना वाटतं रोज दही खाणं योग्य नसतं. त्याने शरीराला त्रास होतो. पण असं काहीही नाही. याचा नक्की कसा फायदा होतो ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. फक्त दह्याचं सेवन करताना एक गोष्ट लक्षात ठेवणंं गरजेचं असतं. ते म्हणजे दह्याचं सेवन शक्यतो रात्री करणं टाळा. यामुळे कफ होण्याची शक्यता असते. पण तुम्हाला खायचंच असेल तर तुम्ही त्यात साखर आणि मिरपूड घाला आणि खा. रोज दही भात खाण्याचे नक्की फायदे काय आहेत ते पाहूया. दही भात हा केवळ पोटासाठी नाही तर मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट, प्रोबायोटिक्स आणि चांगले फॅट्स मिळतात. तसंच यामुळे वजनही नियंत्रणात राहातं आणि तुम्हाला ताण जाणवत असल्यास, अथवा अपचनाचा त्रास होत असल्यास त्यापासून सुटका मिळते.
दही आणि भात हे तुमच्या शरीरासाठी खूपच चांगलं मिश्रण आहे. हे खाण्याने ताण कमी होतो. तसंच तुम्हाला जर तिखट आवडत असेल. पण तिखट खाल्ल्यानंतर सतत घशात जळजळ होत असेल तर तुम्ही मुद्दाम त्यावर दही भात खायला हवा. त्यामुळे तुम्हाला अपचन होत नाही आणि तुमच्या पोटात थंडावा राहातो. दह्यामध्ये असलेल्या अल्कलाईन प्रभावामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसंच तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असल्यास, तुम्ही दह्यातील पाणी अधिक घ्यावं. त्यामुळे ही समस्या कमी होते. तुमचं डोकं दुखणं कमी होतं. त्यामुळे नियमित दही भात तुम्ही खाल्ल्यास, तुमच्या शरीरावर चांगले परिणाम होऊन, तुमचं पोट थंड राहातं आणि तुम्हाला त्यामुळे कोणत्याही जळजळीचा त्रास होत नाही.
दह्यामध्ये असणारे कॅल्शियम हे शरीरामध्ये अधिक फॅट सेल्स तयार होऊ देत नाहीत. तसंच रोज नियमित किमान 300 ग्रॅम दही तुमच्या पोटात जाणं गरजेचं आहे. इतकंच नाही तुमच्या पोटात कोणत्याही प्रकारची गडबड असल्यास, अपचन असल्यास, नेहमीच दहीभात खायला दिला जातो. याचं सेवन केल्याने सर्व टॉक्झिन्स बाहेर पडतात म्हणूनच नियमित दही भात खाणं गरेजचं आहे. तसंच दही आणि भाताचं हे मिश्रण तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करतं.
दही भात नियमित खाल्ल्याने वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते. तुम्ही स्नॅक्समध्ये तेलकट पदार्थ खाण्याऐवजी दही भात खाल्ल्यास, शरीरामध्ये कमी प्रमाणात कॅलरी पोहचते. पुलाव अथवा कोणत्याही फ्राईड राईसच्या तुलनेत साध्या दही भातामध्ये कमी कॅलरीज असतात. दही खाल्ल्याने पटकन पोट भरतं आणि बराच काळ पोट भरल्याची जाणीव राहाते. त्यामुळे भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहून कमी होण्यासही मदत होते. तुम्ही जेवणापूर्वी अथवा नंतर कधीही दही खाऊ शकता. फक्त दही भात शक्यतो रात्री खाणं टाळावं. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी तर अजिबात खाऊ नये. दही हे थंड असल्याने कफ तयार होतो. त्यामुळे याकडे नेहमी लक्ष द्यावं.