महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने पेहराव करण्यासाठी महिला नऊवारी साडी आणि मोत्याची नथ आवर्जून घालतात. वास्तविक नथ हा पेशवाई संस्कृतीतील नटलेला एक अजरामर दागिना आहे. कारण प्राचीन काळापासून ते आजतागायत या दागिन्याचा नखरा मुळीच कमी झालेला नाही. महाराष्ट्रीयन नथींमध्ये पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, कारवारी नथ, बानू नथ असे विविध अनेक प्रकार आहेत. वास्तविक नाकात घाल्यासाठी चमकी, नथनी असे अनेक विविध दागिने आहेत. मात्र या सर्व नासिकाभूषणांमध्ये उठून दिसते ती नथच. नथीमुळे स्त्री च्या सौंदर्यांमध्ये अधिकच भर पडते. नथ घालून नाक मुरडून दाखविण्यात एक वेगळीच मौज असते. या नथींंचा सध्याचा ट्रेंड (Trend) नक्की काय आहे हे जाणून घ्यायला नक्कीच सर्वांना आवडेल. आम्ही त्यासाठीच खास हा लेख तुमच्यासाठी आणला आहे. नथीचे नक्की किती आणि कसे प्रकार आहेत हे तुम्हाला यातून जाणून घेता येईल.
पिवळेधम्मक मोती आणि लाल, हिरव्या आणि पांढऱ्या हिऱ्यांनी आणि मोत्यांनी गुंफलेला एक अप्रतिम दागिना म्हणजे नथ. मात्र काळानुरूप नथीचे आकार आणि प्रकार यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या आकाराच्या आणि जड वजनाच्या नथी वापरल्या जायच्या. अनेकांच्या आजींची आठवण म्हणून या प्रकारच्या नथी जपून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र सोयीनुसार आता वापरण्यात येणाऱ्या नथींचा आकार नाकाला पेलवेल एवढ्या लहान आकाराचा झाला आहे. शिवाय आजकाल मोत्याऐवजी नुसत्या सोन्याच्या, हिऱ्यांच्या आणि चांदीच्या नथीदेखील उपलब्ध झाल्या आहेत. अमेरिकन आणि खऱ्या हिऱ्यांच्या नथीबाबत एकप्रकारचं आकर्षण महिलांमध्ये निर्माण होत आहे. काही ब्रॅंडनी बाजारात आणलेल्या चांदीच्या नथींना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नाकात नथ घालण्यासाठी नाक टोचणं गरजेचं असलं तरी आजकाल उपलब्ध असलेल्या प्रेसच्या नथींमुळे तुम्ही नाक न टोचतादेखील नथ घालण्याचा आनंद घेऊ शकता. तसंच तुम्हाला खूपच विविध प्रकारच्या नथी आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला साजेल अशी नथ तुम्ही घेऊ शकता. तसंच तुमच्या साडीप्रमाणे तुम्ही अगदी मॅचिंग आणि तुमच्या मनाप्रमाणे नथ सहज विकत घेऊ शकता. जाणून घेऊया कोणकोणत्या नथींच्या स्टाईल्स आहेत.
नथ म्हटली की, अगदी मोत्यांचीच हवी असं आता राहिलेलं नाही. पण नथ म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती मोत्यांनी नटलेली. आता अनेक पद्धतीच्या नथी आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल
कायमस्वरूपी जपली जाणारी आणि अगदी पूर्वपरंपरागत चालत आलेली नथ म्हणजे ही ब्राह्मणी मोती नथ. कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर ही नथ शोभून तर दिसतेच. त्याव्यतिरिक्त कोणत्याही महाराष्ट्रीयन कपड्यांवर ही नथ तुम्हाला साज चढवते. या नथीसह तुम्ही मोत्याचे दागिने घातलेत तर तुमच्या लुकला अधिक शोभा येते. ही नथ तुम्हाला अनेक डिझाईन्समध्ये आता मिळते. पण त्यावर मोती आणि लाल खडा हे असायलाच हवं. ही नथ या खड्यानेच ओळखली जाते. शिवाय ही नथ इतर नथींपेक्षा आकाराने थोडी मोठी असते. असं असलं तरीही नऊवारी साडीवर हीच नथ घातली जाते. कारण या साडीबरोबर या नथीने कोणत्याही महिलेचं सौंदर्य हे अधिक खुलून दिसतं.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील परंपरा ही कारवारी नथ दर्शवते. ही नथ थोडीफार बानू नथीप्रमाणेच दिसते. पण त्यामध्ये थोडासा दाक्षिणात्य तडका असतो. कारवार या शहरावरून या नथीला नाव देण्यात आलं आहे. ही नथ सोनं, मोती, बसरा मोती यांनी तयार करण्यात येते. ही बऱ्यापैकी नाजूक प्रकारात मोडते. साधारण उभा चेहरा असणाऱ्या महिलांना अशा प्रकारची नथ शोभून दिसते. तसंच तुम्ही कोणती साडी नेसली आहे यावरही अवलंबून आहे. तुम्ही पाचवारी साडीवर अशा तऱ्हेची नथ घालू शकता. तुम्हाला कोणत्याही घरच्या कार्यक्रमांना अशी नथ घालून नक्कीच तोरा मिरवता येऊ शकतो.
पेशवे आणि त्यांचा थाट याची आजच्या काळातही चर्चा केली जाते. पेशवाई नथ ही तिच्या पारंपरिकता, क्रिएटिव्हिटी आणि त्यावरील केलेले नाजूक काम यासाठी ओळखली जाते. ही सध्याच्या ट्रेंडमध्ये एक डिझाईनर नथ म्हणून वापरली जाते. या नथीचं वैशिष्ट्य म्हणजे धैर्य, शौर्य यासाठी ही नथ ओळखली जाते. या नथी आकाराने बऱ्यापैकी लहान असतात. तसंच साडीवर कोल्हापुरी साज आणि मोत्यांच्या दागिन्यांसह ही नथ परिधान केल्यास, महिलांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. तसंच चेहऱ्यावर या नथीमुळे एक वेगळाच लुक येतो आणि तुमचा लुक बऱ्यापैकी श्रीमंती थाटाचा वाटतो.
पाचू नथ सहसा दिसत नाही. पण काही जणांना पाचू घालयला आवडतं. पाचूची नथ ही एमराल्ड नथ म्हणूनही ओळखली जाते. कोणत्याही महिलेला एक पारंपरिक महाराष्ट्रीयन लुक ही नथ मिळवून देते. या नथीचे आकार जरी सारखे असले तरी हिऱ्यांमध्ये लखाखणारा पाचू अधिक लक्ष वेधून घेतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रंगबेरंगी खडे अथवा मोती नसतात. त्यामुळे ही नथ अतिशय रॉयल दिसत असून लग्न अथवा मुंजीमध्ये अधिक शोभून दिसते. त्याशिवाय इतर खड्यांचा रंग पांढरा असल्यामुळे यावरील पाचू अधिक उठून दिसतो आणि इतरांचंही लक्ष त्यामुळे तुमच्या नथीवर केंद्रीत होतं.
हिरा म्हणजे प्रत्येक महिलेचा आवडता विषय. प्रत्येक महिलेला आपल्याकडे हिऱ्याची नथ असावी असं वाटतंच. ही नथ अतिशय नाजूस असून महाग असते. ही नथ मुख्यत्वे राजस्थानी आणि मारवाडी विवाहित महिलांमध्ये घालण्याची पद्धत आहे. ही नथ लग्नामध्ये खूपच सुंदर दिसते. त्याशिवाय तुम्ही तुमच्या भरजरी लेहंग्यासोबत ही जडावू हिऱ्यांची नथ घालू शकता. फक्त तुमच्या नाकाला कितपत जड नथ पेलता येते याचा अंदाज तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्हाला केवळ आवड असली पण ते झेपणार नसेल तर अशी नथ घालणं टाळणंच योग्य.
बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये नथीचा फॅशन म्हणून अथवा भूमिकेची गरज म्हणून वापर केला आहे. बाजीराव मस्तानीमधील काशीबाई साकारण्यासाठी प्रियांका चोप्राने जी नथ घातली होती ती नथ नंतर फार लोकप्रिय झाली. लाल आणि हिरव्या रंगाच्या खड्याची ही नथ सध्या ट्रेंडमध्ये आहे. ही नथ पुणेरी नथ म्हणूनही ओळखली जाते. या नथीमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या दोन्ही मोत्यांचा वापर केला जातो. तसंच याचा आकार थोडा मोठा असून याची तार मात्र सरळ रेषेत असते. पूर्वीच्या महिला ज्या तऱ्हेने मोठ्या नथी वापरायच्या त्याच तऱ्हेने ही नथही बनवण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा चेहरा थोडा चौकोनी अथवा लांबसर असेल तर अशी नथ तुमच्या चेहऱ्यावर शोभून दिसते.
पुणेरी नथ ही इतर नथींच्या तुलनेत जड असते. ही नथ सर्क्युलर आकारात असून यावर फुलांचं डिझाईन असतं. मोठे मोती आणि खड्यांनी ही नथ बनवण्यात येते. इतर नथींपेक्षा ही बरीच वेगळी आणि भारदस्त दिसते. बानू आणि कारवारी नथीप्रमाणेच याचं डिझाईन बनवण्यात येतं. ज्या महिलांना जड दागिने घालायला आवडतात त्यांना ही नथ अधिक शोभून दिसते. तसंच ज्या महिलांना चेहरा थोडा गोल असतो त्यांच्यावरही ही नथ शोभून दिसते. ही नथ नाकाला थोडी जड असते. पण तुम्हाला जर ही नथ सांभाळता येणार असेल तर तुम्ही तुमच्या लग्नात अथवा घरच्या कोणत्याही जवळच्या कार्यामध्ये अशा प्रकारची नथ नक्कीच घालू शकता. मात्र यासह तुम्ही घालणार असलेले दागिनेही थोडे जड असायला हवेत हे लक्षात ठेवा.
मराठीतील ‘जय मल्हार’ ही मालिका खूपच गाजली आणि त्यापेक्षाही गाजली ती बानू नथ. अर्धगोलाकार असणारी ही नथ आकाराने लहान असते. पण याचा नाजूकपणाच महिलांचं सौंदर्य अधिक वाढवतो. याशिवाय ही नथ तुम्ही आधुनिक कपड्यांवरही घालू शकता. म्हणजे महाराष्ट्रीयन कुरता आणि त्याखाली जिन्स असा पेहराव केल्यानंतरही तुम्हाला ही नथ शोभून दिसते. यामधील खडे आणि मोती हे दोन्हीही आकाराने लहान असतात. पण हेच याचं वैशिष्ट्य आहे. अजूनही ही नथ ट्रेंडिंगमध्ये असून बाजारामध्ये या नथीला खूपच मागणी आहे. अगदी सोन्याच्या नथीही या डिझाईनच्या हल्ली महिला बनवून घेत आहेत. बऱ्याच कार्यक्रमांना अशा तऱ्हेची नथ घातलेली दिसून येते.
काही महिलांना खूप मोठ्या आकाराच्या आणि जड नथ आवडत नाहीत. त्यांच्यासाठी हुप नथ हा प्रकार खूपच चांगला आहे. ही नथ अजिबातच जड नसते. त्याशिवाय तुम्ही बराच वेळ ही नथ घालून राहू शकता. काही अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात अशा नथीचा वापर केला होता. त्यापैकीच एक द्रष्टी धामीही होती. मराठमोळ्या लग्नात अशी नथ कमी दिसते. पण गुजराती कम्युनिटीमध्ये या नथीचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. पण हल्ली लेंहग्यावर अशा तऱ्हेची नथ घालण्याचा ट्रेंड आहे. काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि नेहमीपेक्षा वेगळा लुक मिळवण्यासाठी अशा नथींचा वापर करण्यात येतो.
हल्ली बऱ्याच जणींना आपल्या लग्नामध्ये साडीपेक्षा लेहंगा घालणं जास्त ट्रेंडी वाटतं. त्यावेळी नेहमीच्या पारंपरिक नथीपेक्षा मुघल नथ घालण्याला काही महिला प्राधान्य देतात. ही नथ म्हणजे एक मोठी रिंग असते आणि त्याला जोडलेली चैन तुमच्या केसात अडकवता येते. त्यामुळे ही नथ सारखी हाताने सांभाळावी लागत नाही. त्यामुळे काही जणींना या नथीमध्ये कम्फर्टेबल वाटतं. अर्थात ही नथ नेहमीच्य पारंपरिक कपड्यांवर नक्कीच शोभून दिसत नाही. पण जर मॉडर्न आणि आधुनिक कपडे घातले तर अशी नथ शोभून दिसते हे नक्की.
बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये नथीचा फॅशन म्हणून अथवा भूमिकेची गरज म्हणून वापर केला आहे. बाजीराव मस्तानीमधील काशीबाई साकारण्यासाठी प्रियांका चोप्राने जी नथ घातली होती ती नथ नंतर फार लोकप्रिय झाली. त्यात भर पडली ती मणिकर्णिकामध्ये कंगनाने वापरलेल्या नथीमुळे. शिवाय अनेक हिंदी गाण्यांमध्येदेखील अभिनेत्रींनी नथ घालून नाच केला आहे. चित्रपटातील नथीच्या क्रेझमुळे आता तर नऊवारी न घालता अगदी वेस्टर्न आऊटफीटवर नथ घालून मिरविण्याची फॅशन आली आहे. अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रींनी पारंपरिक नथी घातल्या आहेत.
मराठी सिनेसृष्टीत तर ‘उंच माझा झोका’ मालिका असो अथवा नुकताच प्रदर्शित झालेला ‘आनंदीगोपाळ’ हा चित्रपट असो यांच्या प्रमोशनसाठी नथीचा वापर केला गेला होता. मराठी अभिमान, 132 वर्षांपूर्वीचा इतिहास असे हॅशटॅग आनंदीगोपाळ चित्रपटाच्या पोस्टसाठी वापरण्यात आले होते. शिवाय महाराष्ट्रीन निरनिराळ्या प्रकारच्या नथी घालून मराठी अभिनेत्रींनी आनंदीबाईंना मानवंदना दिली होती. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर,प्रिया बापट,सोनाली कुलकर्णी, प्रियांका बर्वे, दीप्ती देवी, आनंदी जोशी, स्पृहा जोशी, तेजश्री प्रधान, मृण्मयी देशपांडे, मनवा नाईक, स्नेहलता वसईकर या मराठी अभिनेत्रींनी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नथ घालून व्हिडिओ शेअर केले होते.
पारंपरिक असो अथवा आधुनिक ट्रेंडी असो अनके ठिकाणी तुम्हाला नथी मिळू शकतात. अगदी तुम्ही ऑनलाईनदेखील नथ विकत घेऊ शकता. नक्की कुठून नथी घ्यायच्या याची काही ठिकाणं आणि वेबसाईट्स आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत.
वामन हरी पेठे
मुख्य शाखा - गिरगाव, ठाकुरद्वार
उपशाखा - पेठे बिल्डिंग, रानडे रोड, दादर पश्चिम
चिंतामणी ज्वेलर्स
मुख्य शाखा - सूरज विस्ता को ऑप हाऊ. सोसा., ३ रा मजला, काशिनाथ धुरू मार्ग, किर्ती कॉलेज लेन, दादर पश्चिम
उपशाखा - आनंद निवास, मांगलवाडीजवळ, गिरगाव
जैनम एन्क्लेव्ह, जांभळी गल्ली, बोरिवली पश्चिम
वसई स्टेशन रोड, स्टेला, वसई पश्चिम
कल्याण ज्वेलर्स
मुख्य शाखा - केरळ
उपशाखा - भारतामध्ये 100 पेक्षा अधिक शाखा
पु. ना. गाडगीळ
मुख्य शाखा - पुणे
उपशाखा - विलेपार्ले, ठाणे, मुलुंड, डोंबिवली, दादर
असे अनेक दुकानांचे पर्याय तुम्हाला सोन्याच्या नथी घेण्यासाठी उपलब्ध आहेत. तर हल्ली ट्रेंडी नथ घेण्यासाठी ऑनलाईन हा चांगला पर्याय आहे. महाराष्ट्रीयन पारंपरिक नथ तुम्हाला हवी असेल आणि तुम्हाला जास्त खर्च करायची इच्छा नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सर्च करून नथ घेऊ शकता.
तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नथींचं कलेक्शन हवं असल्यास तुम्ही ऑनलाईनदेखील बघू शकता. तुम्हाला जर सराफाच्या दुकानात जायला वेळ नसेल तर तुम्ही हा पर्याय स्वीकारू शकता
मध्यम आकाराची पण तितकीच आधुनिक नथ हवी असल्यास, तुम्हाला Amazon वरूनही मागवता येईल.
तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या नथी हव्या असल्यास, त्याप्रमाणेदेखील उपलब्ध असतात. तुम्ही ऑनलाईन कोणत्याही प्रकारच्या नथी घेऊ शकता.