भारतात प्रत्येक कार्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे रांगोळी. मला आजही आठवतं की, दर दिवाळीत माझी आईसोबत बसून रांगोळी काढण्यासाठी धावपळ सुरू असायची. आईसारखी चांगली नाही पण छोटीशी सुबक रांगोळी माझीही असायची. तर अशीही रांगोळी भारताच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककलांमध्ये मोडते. भारताच्या विविध प्रांतात रांगोळीही विविध नावांनी आणि विविध प्रकारे रेखाटली जाते.
गारगोटीच्या दगडापासून बनवण्यात येणारी ही साधी पावडर किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा तांदूळाने रेखाटलेली रांगोळी प्रत्येक समारंभाची शोभा असते. रांगोळी ही सामान्यतः सणवार, पूजा, लग्न आणि सर्व शुभकार्यांना आवर्जून काढली जाते. रांगोळी काढणं हे शुभ मानलं जातं. रांगोळीमध्ये साधारणतः भूमितीय आकार, फुलं-पानं किंवा देवीदेवातांच्या आकृत्याही रेखाटल्या जातात. आजकाल तर पोर्ट्रेट रांगोळीत वधू-वरांचे फोटोही अगदी हूबेहूब रांगोळीच्या रुपात काढले जातात. रांगोळीमागचा प्रमुख उद्देश्य म्हणजे सुशोभीकरण. रांगोळी पूूर्वी महिलांकडूनच रेखाटली जायची पण आजकाल बरेच पुरूषही यात सहभाग घेताना दिसतात.
रांगोळीला अल्पना असं सुद्धा म्हटलं जातं. रांगोळी म्हणजेच अल्पना चिन्ह ही अगदी मोहंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या खुणांमध्येही आढळली आहेत. अल्पनेचा समावेश हा कामसूत्राने वर्णन केलेल्या चौसष्ठ कलांमध्येही होतो. ही एक अतिप्राचीन लोककला आहे. अल्पना या शब्दाची उत्त्पत्ती ही संस्कृत शब्दातील ओलंपेन या शब्दातून झाली. याचा अर्थ लेप करणे असा आहे. प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की, कलात्मक चित्रांनी शहर आणि गावं धनधान्याने समृद्ध राहतात आणि जादुई प्रभावापासूनही सुरक्षित राहतात. याच दृष्टीकोनातून अल्पना धार्मिक आणि सामाजिक समारंभांच्या वेळी काढण्याची प्रथा सुरू झाली. रांगोळीचा उल्लेख आर्य युगातही आढळतो.
रांगोळी ही नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिकतेचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक आध्यात्मिक कार्याचं रांगोळी ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणूनत प्रत्येक यज्ञाच्या किंवा पूजेच्या ठिकाणी वेदीसाठी आधी रांगोळी काढली जाते. फार पूर्वीपासून खेड्यापाड्यात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढण्याची प्रथा आहे. आजही शहरी भागात काही ठिकाणी गृहिणी आवर्जून रांगोळी काढतात. असं म्हणतात की, रांगोळी घरात येणाऱ्या अशुभ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. तसंच काहीसं शुभकार्याच्या बाबतीतही आहे. पण आता रांगोळी काढण्यामागे हे एकमेव कारण राहिलं आहे, असं नाही. तर महाराष्ट्रात नववर्षाच्या सणाला म्हणजेच गुढीपाडव्याला स्वागत यात्रांमध्ये रांगोळीचे गालिचे घातले जातात. या रांगोळीचं आयुष्य अगदी काही क्षणांचं असलं तरी त्यामागील भावना महत्त्वाची मानली जाते.
रांगोळीचा जसा इतिहास मोठा आहे तसंच विविध प्रांतातील तिची ओळखही वेगवेगळी आहे. केरळमध्ये पुविडल, राजस्थानमध्ये मांडणा, बंगालमध्ये अल्पना, आंध्रप्रदेशमध्ये मुग्गु, तामिळनाडूमध्ये कोलम जी मुख्यतः तांदूळाने काढली जाते. मध्यप्रदेशमध्ये चौकपूरना अशी भारतातील विविध भागात रांगोळीला विविध नावांनी संबोधलं जातं. महाराष्ट्रातील काही आदिवासी जमातींमध्ये तर रांगोळी अशा पद्धतीने रेखाटली जाते की, त्याला वारली पेटींग म्हणून ओळखलं जातं. या वारली पेटींगमधील काही आकार लग्नघरात रेखाटणं हे शुभ मानलं जातं.
वाचा - नववर्षाचं पर्व साजरं करा.. गुढीपाडवा शुभेच्छा संदेश द्या
पांढरी रांगोळीही मुख्यतः गारगोटीच्या दगडापासून बनवली जाते. जी रंगाला पांढरी आणि पावडरसारखी असते. पारंपारिक रांगोळ्यांमध्ये तांदूळाचा, कुंकूवाचा, हळदीचा किंवा अगदी गव्हाच्या पीठाचाही वापर करण्यात यायचा. फुलांच्या रांगोळीसाठी खास विविध फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. आजकाल रांगोळीमध्ये रंग म्हणून रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो. इको फ्रेंडली रांगोळी साकारताना ती मुख्यतः तांदूळाच्या पीठाने, फुलांनी किंवा अगदी लाकडी भुस्स्याने ती साकारली जाते.
रांगोळीमध्ये मुख्यतः स्वस्तिक, कमळाचं फूल, लक्ष्मीची पावलं, गोपद्म यांसारख्या समृद्धी आणि मंगल चिन्हांचा समावेश असतो. ही चिन्ह म्हणजे एक प्रकारे सांकेतिक भाषा आहे, असं म्हणायला हरकत नाही. आजही अनेक घरांमध्ये देव्हाऱ्यांसमोर नित्यनेमाने रांगोळी काढली जाते. ज्यांना हाताने रांगोळी काढणं शक्य नसतं ते रांगोळीच्या छाप्यांचा वापर करतात. आनंद आणि प्रसन्नतेचं प्रतीक म्हणजे विविध रंगी रांगोळी होय.
भारतात विविध प्रकारे रांगोळी काढली जाते. हे तर आपल्याला माहीतच आहे. यामध्ये ओली रांगोळी आणि सुकी रांगोळी असेही प्रकार असतात. काही रांगोळ्या या आकृतीप्रधान असतात तर काही रांगोळ्यांमध्ये वेलबुट्टी म्हणजे वल्लरीप्रधान असतात. आजकाल बऱ्याच रांगोळी स्पर्धांमध्ये आणि प्रदर्शनांमध्ये विविध विषयांवर आधारित मुक्तहस्त रांगोळ्याही काढल्या जातात. महाराष्ट्रात मुख्यतः गौरी-गणपती आणि दिवाळीच्या निमित्ताने रांगोळी आवर्जून काढली जाते. शहरांमध्ये आता जागेअभावी रांगोळी तेवढी प्रचलित नसली तरी महाराष्ट्रात रांगोळीचे आढळणारे काही मुख्य प्रकार.
महाराष्ट्रात पूर्वी ठिपके काढून ते जोडून रांगोळी काढली जात असे. ही रांगोळी काढण्याआधी जिथे ही रांगोळी काढायची आहे तेथील जमीन गेरूने सारवली जाते. पूर्वी गावी रांगोळी काढण्याआधी शेणाने जमीन सारवली जात असे. पण ते काही शहरात शक्य नसल्याने गेरूने लाल रंग दिला जातो. त्यानंतर शुभ्र पांढरी रांगोळी त्यावर काढली जाते. ज्यामुळे ती उठावदार दिसते. ही रांगोळी काढायला सोपी असते. अशी ठिपक्यांची रांगोळी काढल्यावर ती रंगाने भरली जाते किंवा रंग भरायचे नसल्यास फक्त हळद कुंकू वाहिले जाते. जे शुभ मानले जाते.
सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक सार्वजनिक सणांमध्ये संस्कारभारती रांगोळीचे गालिचे घातले जातात. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून हा मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या आकृत्यांचा समावेश असलेल्या रांगोळ्या काढण्याची पद्धत सुरू झाली. यामध्ये पाच बोट एकत्र धरून रांगोळी काढली जाते. मोठी वर्तुळ दोर आणि पेन्सीलच्या साहाय्याने काढून त्यात स्वस्तिक, गोपद्म, चक्र, शंख, गदा, पद्म, ध्वज ही प्रतिकं तसंच वेलबुट्टी काढून ही रांगोळी काढली जाते. ही रांगोळी मोठी असल्याने यात चाळणीच्या साहाय्याने रंग भरले जातात. संस्कार भारतीने विकसित केलेल्या तंत्राने काढण्यात येणाऱ्या या रांगोळ्या आता महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. या रांगोळ्या काढताना पाहणं हाही एक सोहळा असतो. स्त्री-पुरूष मिळून या रांगोळ्या अगदी झटपट रेखाटतात. या रांगोळीची किर्ती आता सातासमुद्रापारही पोचली आहे. आजकाल शुभकार्यांमध्ये स्वागतासाठीही रांगोळी काढली जाते.
वाचा - काय आहेत नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या 9 रंगाचे महत्त्व
महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत काढण्यात येणारी वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी म्हणजे चैत्रांगण. या रांगोळीमध्ये तब्बल 33 प्रतीकांचा समावेश आहे. ज्यामध्ये मखरातील ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन गौरी, दोन्ही बाजूंना सूर्य आणि चंद्र, दोन समया, दोन पाट, त्याखाली शंख, चक्र, गदा, गोपद्म, पाळणा, फळं, नारळ, तेहतीस कोटी पोटात बाळगणाऱ्या गोमातेची आठवण करणार गायवासरू हे मातृत्वाचं प्रतीक, कासव, ओम, करंडा, फणी, मंगळसूत्र, तर डमरू आणि त्रिशूळ ही शंकराची आयुधं तुळशी वृंदावन आणि कमळ आणि स्वस्तीक अशा प्रतीकांनी चैत्रांगण असतात. येणाऱ्या नवीन वर्षात घरात सुख-समृद्धी यावी, म्हणून हे चैत्रांगण घराबाहेर रेखाटलं जातं.
बरेचदा घरातील शुभकार्यांमध्ये जेवणाच्या ताटाभोवती फुलांनी महिरप काढली जाते. अगदी पेशवाई कालापासून ही ताटाभोवती रांगोळी काढण्याची प्रथा आहे. तसंच प्रदूषण टाळण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे फुलांची रांगोळी. अनेकदा पाण्यावर रांगोळी काढण्यासाठी फुलांच्या पाकळ्यांनी रांगोळी रेखाटली जाते. ही रांगोळी जास्त दिवस टिकतेही आणि दिसायला सुंदर असते.
या रांगोळीमध्ये व्यक्ती चित्रण असतात. यात थ्रीडी हा प्रकारही पाहायला मिळतो. अनेक रांगोळी कलावंत अगदी हूबेहूब व्यक्तीचित्र किंवा प्रसिद्ध व्यक्तीमत्वांची रांगोळी यातून साकारताना दिसतात. आता बऱ्याच लग्नांमध्ये ही रांगोळी कपलचा फोटो वापरून काढली जाते. ही रांगोळी वास्तवदर्शी प्रकारात मोडते.
साधी आणि सुंदर अशी बॉर्डर रांगोळी काढायला अगदी सोपी असते. ताटाच्या बाजूला, उंबरठ्याला आणि यज्ञाच्या वेदीच्या बाजूला जास्तकरून बॉर्डर रांगोळी काढली जाते. ही रांगोळी फारच छान दिसते.
रांगोळी रेखाटण्यातील विविधता आपण पाहिली. आता नजर टाकूया विविध साधी रांगोळी डिझाईन आणि व्हिडीओजवर
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये रांगोळी कलाकार मेघना करवंदे यांनी रेखाटलेली ही सुंदर पैठणीच्या पदराची रांगोळी. ही रांगोळी खास गौरी-गणपतींच्या आगमनानिमित्त रेखाटण्यात आली होती.
भांड्याचा आणि फुलांचा मेळ साधून गणपती बाप्पाची साकारलेली ही सुंदर मॉर्डन रांगोळी.
लग्न समारंभ असो वा कोणतंही शुभकार्य असो आजकाल फुलांच्या रांगोळीला भरपूर मागणी आहे.
जुन्या काळापासून तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी घालण्याची पद्धत चालत आली आहे.
फुलांची साधी आणि सोपी रांगोळी जी तुम्ही अगदी काही मिनिटांत काढू शकता.
पाहा बांगडीच्या साहाय्याने काढलेली झटपट रांगोळी.
रिंग आणि काडेपेटीच्या काडीने काढलेली ही सोपी रांगोळी.
कोलम रांगोळीचे काही व्हिडिओज
इतर कलांच्या तुलनेत रांगोळी ही लोककला येणाऱ्या काळाप्रमाणे बदलत असून ती अजून समृद्ध होत आहे. घराच्या उंबरठ्यापर्यंत असलेली ही रांगोळी आता सातासमुद्रापार पोचली आहे. ही कला अशीच बहरत राहो.
हेही वाचा -
‘गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी