लांब आणि घनदाट केस हे नक्कीच सर्वांना आवडतात. लांबडसड केस मिळविण्यासाठी मुली बरेच प्रयत्न करत असतात. लांबसडक केसांची काळजीही खूप घ्यावी लागते. पण या केसांची काळजी घेताना कळत नकळत अनेक चुकाही होत असतात आणि केसांचं त्यामुळे नुकसान होतं. जेव्हा तुमचे केस खांद्यापर्यंत वाढतात तेव्हाच केसांमध्ये अनेक समस्या सुरु होतात. त्यामुळे तुम्हाला जर लांबसडक आणि घनदाट केस हवे असतील तर तुम्ही कोणत्या चुका करणं टाळायला हवं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्याही समस्यांना सामोरं जाऊन त्रासून केस कापून टाकण्यापेक्षा तुम्ही एकदा या गोष्टी नक्की लक्षात घ्या.
आपल्याकडे नेहमी गरम होत असतं. त्यामुळे केस मोकळे ठेवणंही शक्य नसतं. त्यामुळे बरेचदा चेहरा आणि मानेच्या घामापासून दूर ठेवण्यासाठी पोनीटेलचा आधार घेतला जातो. पण केसांना तुम्ही सतत बांधून ठेवलं तर तुमच्या केसांचे मूळ खराब होतं. यामुळे केस जास्त प्रमाणात तुटायला आणि गळायला लागतात. पोनीटेलऐवजी तुम्ही केसांची हायबन करू शकता. हे अतिशय सोपं पण आहे आणि सुपर स्टायलिश पण. ही स्टाईल तर सेलिब्रिटीदेखील फॉलो करतात. यामुळे तुमचे केस तुटत नाहीत आणि तुमच्या केसांची वाढही थांबत नाही.
लांब केसांसाठी ही एक मोठी समस्या आहे हे सर्वांनाच माहीत आहे. लांबसडक केसांमध्ये लवकर गुंता होतो. पण हा गुंता सोडवणं अतिशय कठीण आणि त्रासदायक असतो. पण या गुंत्यापासून सुटका मिळवताना तुमच्या कंगव्यामध्ये केस अडकून बरेचदा तुटू शकतात आणि केसगळतीही निर्माण होते. त्यामुळे तुम्ही तुमचे केस वेगवेगळे करून थोडे थोडे घेऊन गुंता सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे केस कमी तुटतील आणि गुंता सोडवताना तुम्हाला त्रासही होणार नाही. लक्षात ठेवा की, केस विंचरताना अथवा गुंता सोडवताना नेहमी मोठ्या दातांचा कंगवाच वापरणं योग्य आहे.
तेलाच्या बाबतीत तुम्ही केलेलं दुर्लक्ष हे तुमच्या केसांना नुकसान पोहचवण्यासाठी सर्वात मोठं कारण आहे. तुम्ही तेल लावून कधी मसाज केला होता हे तुमच्या तरी लक्षात आहे का? आपल्या रोजच्या आयुष्यात असणाऱ्या तणावाने केसांच्या मुळांमध्ये असलेली ताकद निघून जाते. तेल मालिश केल्याने केसांची गेलेली चमक आणि ताकद परत आणण्याचं काम करतं. तसंच तुमचे केस मजबूत होण्यासाठी आणि त्याची वाढ होण्यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा तेलाने मालिश करणं गरजेचं आहे. त्यामुळे तेलापासून लांब राहू नका. लांबसडक केस हवे असतील तर तेल तुमच्या केसांसाठी महत्त्वाचं आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणी केस मोकळे सोडून नक्कीच झोपत असतील. पण हे योग्य नाही. रात्री आपण झोपल्यानंतर उशीवर पलटतो, तसंच इकडे तिकडे होतो. त्यामुळे अशावेळी केस रगडले जातात आणि जास्त प्रमाणात तुटतात. तसंच केस फ्रिजी होण्यासाठी हे मुख्य कारण आहे. त्यामुळे तुम्ही रात्री झोपताना केस हलकेसे बांधून झोपायला हवं. केस मोकळे ठेवून झोपणं योग्य नाही.
लांब केसांवर सतत शँपू लावायची अजिबातच गरज नाही. असं केल्याने तुमचे केस अधिक कोरडे होतात आणि त्यातील नैसर्गिक चमक निघून जाते. आठवड्यातून केवळ दोन ते तीन वेळा तुम्ही शँपू करणं योग्य आहे. तुम्ही शँपू करण्यापूर्वी साधारण 15 मिनिट्स आधी तेलाने केसांचं मालिश केलंत तर तुम्हाला अधिक चांगले केस मिळतील.