नववधूच्या लुकमध्ये तिच्या पेहरावाप्रमाणेच दागदागिन्यांही फार महत्त्व असतं. लग्नात बहुतेकवेळा पारंपरिक वेशभूषा केली जाते. त्यामुळे त्यावर घालण्यात येणाऱ्या आभुषणांमध्ये बाजूबंद हा दागिना आवर्जून परिधान केला जातो. बाजूबंद हा महिलांनी हाताच्या दंडावर बांधायचा एक पारंपरिक दागिना आहे. नऊवारीवर मोत्याच्या दागदागिन्यांसोबत मोत्याचा बाजूबंद खुलून दिसतो. मात्र या व्यतिरिक्त सोनं, चांदी, हिरे, मोती अशा विविध प्रकारचे बाजूबंद घातले जातात. महाराष्ट्राप्रमाणेच देशभरातील विविध प्रातांत बाजूबंद अथवा वाकी घालण्याची परंपरा आहे. पारंपरिक दागदागिन्यामुळे महिलांचे मुळ सौंदर्य् अधिकच सुंदर दिसतं. त्यामुळे प्रत्येकीला आपल्याकडे आधुनिक आणि काही पारंपरिक असायलाच हवे असं वाटत असतं. यासाठीच बाजूबंदाचे विविध प्रकार आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
भारतीय पारंपरिक दागदागिने घालण्यामागे हौसेप्रमाणेच आरोग्यदायी महत्त्वदेखील आहे. खरंतर प्रत्येक दागिना हा काही विशिष्ठ उद्दीष्ठासाठी परिधान केला जातो. पूर्वी बाजूबंद विशिष्ठ धातूंपासून केले जात शिवाय त्यामध्ये विविध प्रकारची रत्ने जडवलेली असत. राण्या महाराण्यांच्या काळात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक धातू आणि रत्ने त्यात जडवून दागदागिने बनवले जात. त्यामुळे त्या दागिन्यांच्या माध्यमातून शरीराला त्या धातू आणि रत्नांचा स्पर्श होत असे. सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती अशा विविध धातु आणि रत्नांच्या स्पर्शामुळे त्या स्त्रीचे आरोग्य उत्तम राहत असे. दागदागिने हे शरीराच्या विविध अवयवांवर परिधान केले जातात. त्या अवयवांवर तो दागिना घातल्यामुळे त्या भागातील अॅक्युप्रेशरचे बिंदू दाबले जातात. ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण उत्तम राहण्यास मदत होत असते. दंडावर बांधण्यात येणाऱ्या बाजूबंद अथवा वाकीचेदेखील असेच आरोग्यदायी फायदे होतात. आता मात्र सोन्या, चांदीपेक्षा आर्टिफिशिअल बाजूबंद घालण्याची पद्धत आली आहे. कारण वाढत्या महागाईमुळे कधीतरी वापरण्यात येणारे हे दागिने फक्त होैस अथवा फॅशनसाठी वापरले जातात. शिवाय असे दागिने दररोज वापरणे सोयीचेदेखील नाही. यासाठीच बऱ्याचदा सणासुदीला अथवा लग्नात महिला बाजूबंद अथवा वाकी घालतात.
लग्न कार्यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतात वधू आणि वर. त्यांचा पेहराव, वधूचा मेकअप, तिची हेअरस्टाईल, दागदागिने लग्नात येणाऱ्या लोकांसाठी नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यामुळे नववधूला ती तिच्या लग्नात इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक दिसावं असं वाटत असतं. लग्नातील पेहरावासोबत नववधूचे दागदगिने मॅच असतील तर तिचा लुक नक्कीच खुलून दिसतो. लग्नात साधारणपणे पारंपरिक पेहराव केला जातो. म्हणूनच वधूवस्त्रावर घालण्यासाठी आम्ही तुम्हाला काही पारंपरिक आणि आधूनिक बाजूबंद आणि वाकीच्या डिझाईन्स शेअर करत आहोत. ज्या तुम्हाला तुमच्या लग्नात नक्कीच घालता येतील.
लग्नात नेहमी सोन्याचे दागिने घालण्यावर भर दिला जातो. नववधूसाठी माहेर आणि सासरच्या मंडळींकडून खास सोन्याचे दागिने केले जातात. मुलीच्या लग्नासाठी आईवडील अगदी तिच्या लहानपणापासून सोन्याची खरेदी करून ठेवतात. तेव्हा जर तुम्हाला सोन्याचे दागिने करायचे असतील तर लग्नात अशी सोन्याची वाकी घालायला काहीच हरकत नाही.
लग्नात पारंपरिक नऊवारी साडी, केसांचा खोपा, पारंपरिक दागदागिने यासोबत ही सोन्याची वाकी तुमच्यावर नक्कीच उठून दिसेल. सोन्याच्या वाकीचा हा आणखी एक प्रकार नक्की ट्राय करा
या बाजूबंदाच्या प्रकारात मोठी तीन फुले एकमेकांना जोडलेली आहेत. सध्या वन ग्रॅमच्या दागिन्यांची फॅशन आहे. जर तुम्हाला सोन्या-चांदीमध्ये पैसे गुंतवण्याची ईच्छा नसेल तर स्वस्त आणि मस्त असलेला हा बाजूबंद तुम्ही लग्नात नक्कीच वापरू शकता. सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत म्हणूनच अशा प्रकारचे बाजूबंद सर्वसामान्यांच्या खिशाला नक्कीच परवडण्यासारखे असतात.
जर तुम्हाला पारंपरिक डिझाईन असलेला आणि सोन्यात तयार केलेला बाजूबंद हवा असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करा. काहींना परिपंरिक दागिने हे सोन्यात तयार केलेलेच हवे असतात. वामन हरी पेठे या ब्रॅंडचा हा पारंपरिक बाज असलेला बाजूबंद लग्नात तुमच्यावर नक्कीच खुलून दिसेल. या बाजूबंदाचे वजन 51.400 असून त्याची किंमत अंदाजे दोन लाख आहे.
लोकप्रिय ब्रॅंड पीएजी या सोनाराच्या दुकानातील ही बाजूबंदची डिझाईनदेखील थोडी वेगळी आहे. सोनं, गुलाबी रंगाचं रत्न आणि व्हाईट डायमंड जडवलेला हा बाजूबंद तुमच्या लग्नात तुमच्यावर तुमच्यावर नक्कीच खुलून दिसेल मात्र त्यासाठी दोन लाखांचा खर्च नक्कीच करावा लागेल.
बऱ्याचदा नववधूचे सर्व दागिने मोत्यातील असल्यामुळे मोत्याचा बाजूबंदच खरेदी केला जातो. मात्र जर तुम्ही कुंदनची ज्वैलरी परिधान करणार असाल तर त्यावर हा मोराची डिझाईन आणि कुंदन काम केलेला बाजूबंद अगदी उठून दिसू शकेल.
जर तुम्हाला डायमंड ज्वैलरी आवडत असेल आणि तुमच्या नववधूच्या कपड्यांवर तुम्ही सर्व डायमंड ज्वैलरी घालणार असाल तर हा बाजूबंद नक्की ट्राय करा. यावरील गुलाबी आणि हिरव्या रंगाचे डायमंड तुमच्यावर नक्कीच खुलून दिसतील.
जर तुम्हाला लग्नात वेगळा लुक करण्याची ईच्छा असेल तर या प्रकारचा बाजूबंद वापरण्यास नक्कीच काहीच हरकत नाही. जयपूर अथवा राजस्थानी नववधूच्या लुकमधली वाकी अथवा बाजूबंद तुम्ही कोणत्याही लुकवर ट्राय करू शकता.
गुलाबी, पांढऱ्या आणि हिरव्या खड्यांनी जडवलेला हा बाजूबंद थोडा वेगळ्या प्रकारचा आणि दिसायला अतिशय नाजूक आणि सुंदर आहे. शिवाय याला मोती लावलेले असल्यामुळे या बाजूबंदच्या मुळ सौंदर्यात अधिकच भर पडत आहे. या बाजूबंदाच्या विविध डिझाईन्स तुम्हाला मिळू शकतात.
हा बाजूबंदचा आणखी एक हटके प्रकार आहे. यात हिरव्या रंगाचे कुंदन वर्क केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या पारंपरिक नववधूच्या पेहरावासोबत तो अगदी खुलून दिसेल. शिवाय यासोबत असलेले हे इतर दागिने त्यासोबत घातले तर तुमचा लुक नक्कीच इतरांपेक्षा वेगळा होऊ शकतो.
सोन्याची वाकी तुम्हाला वधूवस्त्रावर तर घालता येईलच शिवाय तुम्ही लग्नानंतर ती कोणत्याही पेहरावासोबत वापरू शकता. कमानीसारखा असलेली ही वाकी तुम्हाला जरा हटके आणि सुंदर लुक नक्कीच देईल.
अनेक लोकांंकडे साखरपुडा अथवा लग्नकार्यात हिरव्या रंगाची साडी नेसणं शुभ मानलं जातं. हिरवा रंग हा विपुलतेचं प्रतिक मानलं जातं. जर तुमची साडी हिरव्या रंगाची असेल तर असा एकच हिरवा खडा असलेला सोन्याचा अथवा आर्टिफिशिअल बाजूबंद तुम्हाला नक्कीच शोभून दिसेल.
आता ही सोन्याची वाकीच पहा किती सुंंदर दिसत आहे. जर तुम्हाला असा लुक तुमच्या लग्नात हवा असेल तर ही सोन्याची अथवा आर्टिफिशिअल वाकी जरूर घ्या. कारण ही वाकी नंतर तुम्ही चक्क एखादया स्लीव्जलेस ब्लाऊजवर सुद्धा घालू शकता.
जर तुम्हाला साधा आणि सिंपल लुक आवडत असेल तर यासारखा लुक करण्यासाठी तुम्ही असा सिंपल आणि साधा एक फुलाची डिझाईन असलेला बाजूबंद वापरू शकता. कारण यामुळे तुम्हाला लग्नात भरपूर दागिने घातल्यामुळे होणारा त्रास नक्कीच होणार नाही.
जर तुम्ही कुंदनवर्कच्या चाहत्या असाल आणि तुम्हाला मोतीही प्रिय असतील तर हा तुमच्यासाठी अगदी बेस्ट बाजूबंद आहे. कारण यात या दोघांचाही वापर केला आहे. ज्यामुळे तुमचं नवरीचं लुक अगदी खुलून येईल.
सोन्याचा, खऱ्या मोत्यांचा, खऱ्या डायमंडचा बाजूबंद खरेदी करताना ते तुमच्या विश्वासू सोनाराऱ्याच्या दुकानातून खरेदी करा. आर्टिफिशिल दागदागिने खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये भुलेश्वर मार्केट, दादर, विलेपार्ले येथे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता.दागिने सोन्याचे असो वा आर्टिफिशिअल त्यांची योग्य काळजी आणि निगा राखली तर ते अनेक वर्ष टिकू शकता. प्र्त्येक दागिना हा वेगवेगळ्या दागिन्यांच्या पेटीत ठेवा ज्यामुळे तो खराब नक्कीच होणार नाही. शिवाय दागदागिने आपण फक्त लग्नकार्य,सणसमारंभ अशाच वेळी घालतो. त्यामुळे दागिन्यांची काळजी घ्या आणि लग्न कार्यात दागिने घालून तुमची हौस मस्त भागवून घ्या. आम्ही सुचवलेले हे बाजूबंद आणि वाकीचे प्रकार तुम्हाला कसे वाटले आणि ते तुम्ही खरेदी केले का हे आम्हाला जरूर कळवा.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
अधिक वाचा-
मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर
महाराष्ट्रीयन नववधूवर खुलून दिसतील या '15' हेअरस्टाईल्स (Maharashtrian bridal hairstyles)