home / Family
लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सोप्या टिप्स

लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सोप्या टिप्स

पालकत्व ही एक कला आणि खूप मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांशी संवाद साधताना प्रत्येक आई-वडील  अथवा इतर मोठ्या मंडळींनी नेहमी सावधच असायला हवं. मुलं जे ऐकतात किंवा पाहतात त्याचा परिणाम नकळत त्यांच्या मनावर होत जातो. बालपणावर झालेल्या गोष्टींचा परिणाम मोठेपणी मुलांच्या वागणूकीत दिसून येत असतो. यासाठी जर तुमच्या मुलांनी भविष्यात स्वावलंबी आणि यशस्वी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर या टिप्स जरूर फॉलो करा.

1. मुलांवर मनापासून प्रेम करा

तुम्ही म्हणाल की, ‘आमचं आमच्या मुलांवर प्रचंड प्रेम आहेच.’ तुम्हाला असंं वाटणं अगदी स्वाभाविक आहे कारण प्रत्येक आई-वडीलांचं आपल्या मुलांवर प्रेम हे असतंच. पण तुमचं मुलांवर असलेलं प्रेम त्यांना सतत जाणवत राहील याचीही काळजी घ्या. कारण बोलताना झालेल्या गैरसमजातून जर त्यांना तसं जाणवलं नाही तर मुलांच्या मनात तुमच्याबद्दल एकप्रकारची अढी निर्माण होऊ शकते. जी भविष्यात पुढे कायम तशीच राहते. प्रेमात समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बदलण्याची ताकद असते. त्यामुळे जर तुमची मुलं तुमच्यासोबत नीट वागत नसतील तर तुमच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. 

वाचा – मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आयडियाज

2. मुलांच्या समस्यांचे वेळीच समाधान करा

मुले घराबाहेर असताना म्हणजेच शाळेत, पाळणाघर, विविध प्रकारचे क्लासेस त्यांच्यासोबत दिवसभर काय काय घडलं याची विचारपूस करा. ज्यातून तुम्हाला त्यांच्या समस्या समजू शकतील. मुलांच्या जीवनात असलेल्या कोणत्याही लहानसहान समस्येकडे दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी याचा परिणाम फारच घातक ठरू शकतो. त्यांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवण्यासाठी मदत करा. ज्यामुळे त्यांना तुमचा आधार वाटेल आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढू लागेल. शिवाय लहान मुलांना सतत प्रश्न विचारण्याची सवय  असते त्यातून त्यांच्या बुद्धीचा विकास होत असतो. तुमच्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्या. जर प्रश्न थोडासा अडचणीत आणणारा असेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. मात्र मुलांच्या प्रश्नाकडे मुळीच दुर्लक्ष करू नका अथवा त्यांना ओरडू नका. 

3. तुमच्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका

बऱ्याचदा परिक्षेतील मार्क अथवा एखाद्या स्पर्धेतील यशाबाबत मुलांशी तुलना केली जाते. मुलांना जास्त मार्क्स मिळावेत अथवा त्यांना स्पर्धेत जिंकण्याची जिद्द वाटावी यासाठी घरातील, शेजारील इतर मुले अथवा मित्रमंडळींच्या मुलांच्या तुलनेत उभं केलं जातं. याचा परिणाम क्वचितच चांगला येऊ शकतो. कारण बऱ्याचदा यामुळे मुलं नैराश्याच्या कोषात जाण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच तुमच्या मुलांना कधीच गृहीत धरू नका. प्रत्येक मुलाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं आणि प्रत्येकाकडे काहीना काहीतरी वेगळे गुण असतात याची सतत जाणिव ठेवा. तुमच्या मुलांमधील कलागुणांना ओळखून त्यांच्या गुणांना कसं विकसित करता येईल याचा विचार करा. 

4. मुलांचे कौतुक करण्यास विसरू नका

कौतुक सर्वांनाच आवडत असतं. जेव्हा  जेव्हा एखाद्याचं कौतुक केलं जातं त्या व्यक्तीला त्या कौतुकामुळे त्याचं  काम अधिक चांगलं करण्याचा हुरूप येतो. जर तुमच्या मुलांनी एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने केली असेल तर त्याचं मनापासून कौतुक करायला विसरू नका. बऱ्याचदा मुलं शेफारतील म्हणून पालक मुलांचं कौतुक करणं टाळतात. मात्र असं  केल्यामुळे भविष्यात मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. यासाठी मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं भरपूर कौतुक करा.  

5. सकारात्मक विचार द्या

मुलांना नेहमी सकारात्मक बोलण्याची, वागण्याची आणि ऐकण्याची सवय लावा. कारण सकारात्मक विचारसरणीचा त्यांच्या मनावर चांगला परिणाम होऊ शकतो. लहानपणापासूनच जर मुलं प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक विचारसरणीने पाहू लागली तर मोठेपणी त्यांना कधीच नैराश्य येत नाही. मात्र यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत सतत पॉझिटिव्हच बोलायला हवं. पालक हे मुलांसांठी नेहमीच आदर्श व्यक्तिमत्व असतात. लहानपणी मुलांना मोठं झाल्यावर आपण आपल्या पालकांसारखं व्हावं असं नकळत वाटत असतं. शिवाय मुलांवर पालक काय बोलतात यापेक्षा पालक कसे वागतात याचा अधिक परिणाम होत असतो. म्हणूनच पालकांनी मुलांसमोर वागताना नेहमीच सावध राहायला हवं. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल

लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल

ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुमच्या किशोरवयीन मुलांना अशी करा मदत

05 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this