प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा असं वाटत असतं आणि अर्थातच का वाटून नये? आपला चेहरा नेहमी प्रसन्न राहिला तर अधिक सुंदर दिसतो. पण त्याहीपेक्षा अधिक सुंदर तेव्हा दिसतो जेव्हा चेहऱ्यावर चरबी साठलेली नसते. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर चरबी असते, तर काही जणांचा चेहरा हा थुलथुलीत असतो. इतकंच नाही तर काहींना डबलचीनचाही त्रास असतो. पण या सगळ्या त्रासातून बाहेर येऊन आपला चेहरा नक्की कसा सुंदर करायचा हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना असतो. यासाठी आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी काही खास उपाय या लेखाद्वारे सांगणार आहोत. पण त्याआधी जाणून घेऊया नक्की चेहऱ्यावर चरबी जमते म्हणजे नक्की काय होतं. फॅट्स म्हणजे नक्की काय असतं? या सगळ्याची माहिती घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकतात.
जेव्हा तुमचा चेहरा अधिक जास्त फुलू लागतो आणि गोल होऊ लागतो अर्थात पफी दिसू लागतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर फॅट अर्थात चरबी जमू लागली आहे असं समजावं. आपल्या चेहऱ्यावर अनेक लेअर्स असतात जे आपल्या चेहऱ्याला आकार मिळवून देतात. त्यामध्ये स्नायू, अनेक हाडं असतात आणि त्यानंतर फॅट हा भाग असून त्यावर सर्वात शेवटचा लेअर असतो तो म्हणजे त्वचेचा. फॅट लेअरमध्येच चेहऱ्याचे फॅटही तुम्हाला जाणवतात. आता काहींचा चेहरा फारच मोठा असतो.त्यांचे गालही फार थुलथुलीत असतात.तर काहींना डबलचीन असते. असा हेल्दी चेहरा दिसायला कधीच चांगला दिसत नाही. जर तुम्हाला तुमचा चेहरा आकर्षक दिसावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील फॅट कमी करणे गरजेचे आहे.
आता आपल्याला प्रश्न पडतो की, आपल्या चेहऱ्यावर नक्की चरबी जमली आहे की नाही? हे नक्की ओळखायचं कसं? तर आपल्या चेहऱ्यावर काही ठिकाणी चरबी जमलेली पटकन समजते. जे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुमच्या चेहऱ्याच्या बाजूला, तसंच गालावर, तुमच्या हनुवटीवर आणि मानेच्या भोवती ही चरबी जमा होतो. या भागांभोवती चरबी जमू लागली की हे भाग सुजल्यासारखे दिसतात. त्यालाच फेस फॅट अर्थात चेहऱ्यावरची चरबी असं म्हटलं जातं. तुम्हाला नक्कीच आरशात पाहिल्यानंतर आपल्यामधील बदल जाणवतात. त्यामुळे असं झाल्यास, तुमच्या चेहऱ्यावर चरबी जमू लागली हे समजून लवकरच त्यावर उपाय करायला घेणं गरजेचं आहे हे समजून जा.
तुमचं पोट जरासं वाढलं तर कदाचित त्यातला फरक तुम्हाला पटकन जाणवणार नाही. पण तुमच्या चेहऱ्यावरील फरक मात्र पटकन जाणवतो. चेहऱ्यावरील चरबी ही नेहमीच प्रत्येकाला नकोशी वाटत असते. प्रत्येकासाठी ती एक समस्या ठरते. त्यामुळे चरबी जमा झाली की, ती कशी कमी करायची आणि त्याचं मुख्य कारण काय हे लोक शोधायला लागतात. प्रत्येक वेळी गाल गुबगुबीत असणं हे ‘क्यूट’ असेलच असं नाही. चेहऱ्यावर चरबी जमणं हे आरोग्यासाठी एखादा गंभीर आजाराचं लक्षणही असून शकतं. तसंच हे लठ्ठपणाचं लक्षणही असून शकतं. त्यामुळे वेळीच तुमच्या शरीरात बेढब फरक येण्याआधी तुम्हीच तुमची काळजी घेणं गरजेचं आहे.
तुमच्या चेहऱ्यावर चरबी जमा होते कारण तुमच्या शरीराला हवी तशी विश्रांती मिळत नाही. तसंच बाकीही अनेक कारणं यासाठी कारणीभूत ठरतात. नक्की काय कारणं आहेत पाहुया.
चेहऱ्यावर चरबी जमण्यामागे अनुवंशिकता हे महत्त्वाचं कारण आहे. तुमच्या हाडांची रचना आणि चेहऱ्याची रचना ही तुमच्या आईवडिलांकडून आलेली असते. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकत नाही. तुमच्या आईवडिलांना ही समस्या असल्यास, तुम्हालाही तीच समस्या असते. त्यामुळे चेहऱ्यावरील चरबी अथवा मोठा चेहरा हे अनुवंशिकतेनेही असू शकतं.
काही वेळा तुमच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे चेहऱ्यावर चरबी जमा होऊ लागते. मासिक पाळीच्या काळात वेळेत न आल्याने अथवा सतत मागेपुढे झाल्याने तसंच PMS (Premenstrual Syndrome) लक्षणं तुमच्या शरीरात असतील तर चेहऱ्यावर चरबी जमा होऊ लागते. तसंच तुम्हाला थायरॉईडचा त्रास असल्यासदेखील तुमच्या वजनात झटपट वाढ होते. त्यामुळे त्याचा परिणाम चेहऱ्यावरील चरबीतदेखील होतो.
शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असणं हे वजन वाढण्याचं मुख्य कारण ठरू शकतं. तुम्ही जेव्हा डिहायड्रेट असता तेव्हा तुमचं शरीर पाणी जितकं जास्त प्रमाणात शोषून घेता येईल त्याचा प्रयत्न करत असतं. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, चेहरा हा शरीराचा असा भाग आहे जिथे सर्वात जास्त प्रमाणात पाणी शरीराने स्टोअर केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्यायलात तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि तुमची चेहऱ्यावरील चरबी जास्त प्रमाणात वाढते.
जास्त प्रमाणात दारू पिणंदेखील यासाठी कारणीभूत ठरतं. कधीतरी एखादा ग्लास दारू पिणं आणि सतत पार्टी करत दारू पिणं यामध्ये खूप फरक आहे. सतत दारू प्यायलाने सर्वात पहिला परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. बीअर, ब्रँडी यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात आणि पोषक तत्व नसतात. ज्यामुळे तुमचं शरीर अधिक प्रमाणात डिहायड्रेट होतं. शरीर डिहायड्रेट झाल्यास, नक्की काय होतं हे तर तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे दारू पिणंही चेहऱ्यावर चरबी साठण्याचं मुख्य कारण आहे.
तोंडाचा कॅन्सर होण्याव्यतिरिक्त धुम्रपान हे तुमच्या स्नायू आणि लिगामेंट्सच्या त्रासासाठी कारणीभूत ठरतं. तुमच्या चेहऱ्यावर अधिक चरबी जमा करण्यासाठी याचाही महत्त्वाचा वाटा असतो. तसंच तणाव आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यासाठीदेखील धुम्रपान करणं वाईट ठरतं.
कोणत्याही प्रकारचा अयोग्य आहार हा तुमच्या शरीराचं वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. सतत जंक फूड, कार्बोहायड्रेट्स आणि सोडियम असलेले पदार्थ खाल्ल्यास, तुम्हाला त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे शरीरात अधिक प्रमाणात चरबी साठत जाते. ती कमी करणं कठीण होतं. तसंच कमी प्रमाणात पोषक तत्व शरीराला मिळाली तर त्याचाही परिणाम चरबी साठण्यावर होत असतो हे नेहमी लक्षात ठेवा.
पोट फुगणं ही अपचनाची मुख्य प्रक्रिया आहे. काही व्यक्तींना काही पदार्थांची अलर्जी असते. पण नक्की कोणत्या पदार्थांमुळे अलर्जी होत आहे ते न कळल्याने चेहऱ्यावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे तुम्ही काय खात आहात याकडे नीट लक्षण देणंही गरजेचं आहे.
चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला आहारही त्याचप्रमाणे करायला हवा. त्यासाठी जाणून घेऊया नक्की काय काय खाणं आवश्यक आहे.
आजकलच्या तुमच्या धावपळीच्या आयुष्यात बरेचसे लोक सकाळी नाश्ता करण्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहीत का? सकाळी भरपेट नाश्ता केल्यास, तुम्हाला दिवसभर योग्य ऊर्जा आणि शक्ती मिळते. तुम्ही रोज योग्य वेळेवर नाश्ता केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि तुमचं वजनही वाढणार नाही.
वजन वाढण्यासाठी सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे साखर. तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर साखरेपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करा. सोडा, कॉफी आणि इतर ड्रिंक्समध्ये साखर घालू नका. जास्त गोड चहा अथवा कॉफी पिऊ नका. ज्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा पदार्थांपासून दूर राहा. एका दिवसात कमीत कमी दोन हंगामी फळं खा. केक, पेस्ट्री, डेझर्ट, तेलकट पदार्थ खाण्यापासून स्वतःला दूर ठेवा. हे सगळे पदार्थ वजन वाढण्यास कारणीभूत आहेत.
आपल्या आहारामध्ये प्रोटीन वाढवा आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं वर्कवाऊट रूटीन योग्य तऱ्हेने करण्यासाठी मदत मिळेल. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, तुमच्या आहारामध्ये अधिक प्रोटीन असल्याने, मांसपेशीमधील सिंथेसिसमध्ये 25% वाढ होते. याचा अर्था असा की, तुमच्या मांसपेशी योग्य प्रमाणात वाढीला लागतात. तुम्ही जिममध्ये जात असाल अथवा घरच्या घरी व्यायाम करत असाल तरीही प्रोटीनचं प्रमाण वाढवणं नेहमी लक्षात ठेवा.
पाण्यामुळे जे काम होतं ते इतर कोणत्याही गोष्टीमुळे होत नाही असं म्हटलं तर ती नक्कीच अतिशयोक्ती नसेल. अधिक चरबी घटवण्यासाठी पाणी सर्वात फायदेशीर ठरतं. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं योग्य नाही आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरातील वजनच्या 10 व्या भागाला 2 ने वजा करून जी संख्या येते तितकं लीटर पाणी आपल्या शरीरात जायला हवं. उदाहरणार्थ तुमचं वजन जर 70 किलो असेल तर त्याचा 10 वा भाग अर्थात 7 लीटर असणार. आता त्यातून 2 वजा केल्यानंतर 5 लीटर ही संख्या राहाते. त्यामुळे तुम्हाला निदान रोज 5 लीटर पाणी प्यायला हवं. सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्यायल्यानेही तुमच्या शरीरातील चरबी कमी होते.
तुम्हाला रोज व्यायाम करण्यासाठी अथवा जिम जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्या रूटीनमध्ये काही धावपळीची कामं सहभागी करून घ्या. उदाहरणार्थ रोज नियमाने भाजी आणि दूध आणायला जाणं, नित्यनियमाने अर्धा तास चाला, सतत बसून राहू नका, हातांना व्यायाम मिळेल अशा प्रकारची कामं घ्या. अशा सोप्या पद्धतीनेही तुम्ही हाताला व्यायाम देऊ शकता.
तुम्हाला जर चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही घरगुती उपायदेखील करू शकता. या उपायांनी केवळ तुमच्या चेहऱ्यावरील चरबीच कमी नाही होत तर तुमची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होते. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती उपाय केल्याने त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जाणून घेऊया 15 घरगुती उपाय ज्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकता :
ग्रीन टी मध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्सने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजमसाठी आणि टॉक्झिन्स कमी होण्यासाठी मदत मिळते. किमान दिवसातून 3-4 कप ग्रीन टी पिणं आवश्यक आहे. तसंच यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅफेन नसल्याने तुम्हाला जास्त विचार करायची गरज भासत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे त्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. तुम्हाला चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठीही याचा चांगला उपयोग करून घेता येतो.
दूध वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण दुधामुळे तुमची त्वचा अधिक टाईट होण्यासाठी मदत मिळते. तसंच तुमच्या त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी एक पोषक तत्व म्हणून याचा उपयोग होतो. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी दुधाचा दोन प्रकारे उपयोग करून घेऊ शकता. :
1.थोडं कच्चं दूध घेऊन तुमच्या चेहरा आणि मानेवर मसाज करा. काही वेळाने कोमट पाण्याने चेहाल धुवा. तुमची डबलचीन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
2. ताज्या दुधाच्या सायीमध्ये काही थेंब मध घाला. ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहरा आणि मानेला लावून काही मिनिट्स तसंच राहू द्या. नंतर थोड्यावेळाने थंड पाण्याने तोंड धुवा. असं तुम्हा नियमित केल्याने तुमची त्वचा अधिक चमकदार होते आणि तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी व्हायला मदत मिळते.
शरीरातील चरबी कमी करण्यासाठी लिंबू हा सर्वात चांगला आणि सोपा उपाय समजला जातो. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून प्यायलास आरोग्य उत्तम राहाते. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्या. त्यामुळे तुम्हाला चरबी साठण्याचा त्रास होणार नाही. तसंच तुमचं मेटाबॉलिजम व्यवस्थित राहील.
चेहरा उजळवण्यासाठी आणि अँटिसेप्टिक म्हणून हळदीची ओळख आहे. पण तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठीही याचा उपयोग करता येऊ शकतो. तुम्ही बेसन आणि दह्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर जमलेल्या चरबीवर नियमित लावल्यास, याचा परिणाम चरबी कमी होण्यावर होतो. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील जमखा आणि सुरकुत्याही निघून जायला मदत होते.
अंड्यामध्ये विटामिन ए चं प्रमाण जास्त असतं, ज्याचा त्वचेला फायदा होतो. तुम्ही याचा दोन प्रकारे उपयोग करून घेऊ शकता:
1. एक चमचा दूध, मध आणि लिंबाच्या रसामध्ये दोन अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. तसंच त्यामध्ये थोडे थेंब पेपरमिंट ऑईल मिसळा. हा मास्क तुमच्या चेहरा आणि मानेवर लावा. अर्धा तास तसंच ठेऊन कोमट पाण्याने धुवा. नियमित तुम्ही हे केल्यास, चेहऱ्यावरील चरबी कमी होऊ शकते.
2. अॅप्पल साईड व्हिनेगर आणि चिमूटभर मीठ घेऊन त्यात दोन अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. नीट मिसळून येणारी पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. याचा परिणाम चांगला होतो.
मेलनमध्ये विटामिन सी असतं जे तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य ठरतं. तसंच तुमची त्वचा व्यवस्थित मॉईस्चराईज करून तुमच्या चेहऱ्यारील चरबी काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे. मेलनचा रस काढून कापसाच्या बोळ्याने तुम्ही चेहऱ्याला लावा. पाच मिनिट्स ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. तसंच तुम्ही मेलन ज्युस पिऊनदेखील शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकू शकता आणि एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होत असल्यास, या ज्युसने पोट व्यवस्थित भरतं.
बदामामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असल्याने पोट भरल्यासारखं राहातं. त्यामुळे जास्त भूक लागत नाही. जास्त खाल्लं जात नाही आणि वजनावर योग्य नियंत्रण राहातं. तसंच बादाम खाल्ल्याने तुमची त्वचा अधिक तजेलदारही राहाते.
अॅव्हाकॅडो हे नक्कीच वजन कमी करणाऱ्या फळांपैकी एक आहे. तुमचे फॅट्स बर्न करायला याचा उपयोग होतो. यामध्ये 20 विटामिन्स, मिनरल्स आणि पोषक तत्व असतात, जी तुमच्या शरीरातील कोणत्याही भागावरील चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. तुम्ही नियमित याचं सलाड खावं अथवा ज्युस प्यावा.
डार्क चॉकलेटदेखील वजन कमी करण्यासाठी चांगला उपाय समजण्यात येतो. यामध्ये जितकं जास्त कोको असेल तितका त्याचा उपयोग जास्त होतो. ज्या चॉकलेटमध्ये 75% कोकोचं प्रमाण असेल ते तुमची चरबी कमी करण्यासाठी जास्त चांगलं हे नेहमी लक्षात ठेवा.
तुमच्या त्वचेवरील चमक तशीच ठेवण्यासाठी कोको बटरचा उपयोग होतो. याशिवाय त्वचा टाईट करण्यासाठीही याचा उपयोग करण्यात येतो. तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी कोको बटरचा चांगला उपयोग होतो कारण तुमची त्वचा हायड्रेट करण्याचं काम कोको बटर चांगल्या तऱ्हेने करतं.
तुम्हाला तुमचा चेहरा टोन्ड हवा असेल तर तुम्ही एक चमचा ग्लिसरीन घेऊन त्यात काही थेंब पेपरमिंट ऑईल घाला आणि चिमूटभर मीठ. त्यानंतर तुमचा चेहरा आणि मान यावर कापसाने हे मिश्रण लावा. काही वेळानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून तुम्ही हे किमान 3 वेळा केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील फॅट्स कमी व्हायला मदत मिळते.
विटामिन ई ऑईलने मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी होते. चेहऱ्यावरील आर्द्रता नीट ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. शिवाय तुम्ही विटामिन ई साठी ब्राऊन राईस, नट्स, बीन्स आणि पालेभाज्यादेखील खाऊ शकता.
गरम टॉवेलच्या उपचाराने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याला येणारा घाम चरबी कमी करायला मदत करतो. तसंच तुमची त्वचा अधिक टाईट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. किमान एका दिवशी 5 वेळा तुम्ही हा प्रयोग करून बघायला हवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हे झोपायला जाण्यापूर्वी रात्री करून पाहा.
फुगलेल्या चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी काकडीचा खूपच चांगला उपयोग होतो. फायबर आणि पाण्याचं प्रमाण काकडीमध्ये जास्त प्रमाणात असतं. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि ताजीतवानीदेखील राहाते. तुमच्या चेहऱ्यावर याचा डायरेक्टली प्रयोग करू शकता. चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारची सूज कमी करायला काकडीचा उपयोग होतो.
नैसर्गिक फेशिअल मास्क म्हणून याचा उपयोग होतो. तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेऊन त्वरीत परिणामासाठी हे चांगलं आहे. आठवड्यातून दोन वेळा याचा उपयोग केल्यास चेहऱ्यावरील चरबी लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी काही व्यायामही करता येतात. तेदेखील तुम्ही घरच्याघरी कसे करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया हे सोपे व्यायाम प्रकार. तसंच चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी स्विमिंगचाही उपयोग होतो.
तुम्हाला तुमचे गाल कमी करायचे असतील तर तुम्हाला पहिला व्यायामप्रकार करायचा आहे तो म्हणजे स्माईलिंग फिश फेसचा. माशाप्रमाणे तोंड करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तुम्हाला तुमचे गाल आत ओढून ठेवायचे आहे. ही पोझीशन तुम्हाला साधारण एक मिनिटांसाठी तशीच रोखून धरायची आहे. असे तुम्हाला साधारण 5 ते 6 वेळा करायचे आहे. तुम्ही अगदी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या हा व्यायामप्रकार करु शकता.
चेहऱ्यावरील फॅट कमी करण्याचा हा दुसरा व्यायामप्रकार आहे. ब्लो किस म्हणजे आता तुम्हाला तुमच्या ओठांचा आकार किस करण्यासारखा करायचा आहे. पण यामध्ये थोडा ट्विल्ट आहे. तुम्हाला मान वर करुन मग किस करायची आहे. असे तुम्हाला 10 वेळा तरी करायचे आहे. हा व्यायामप्रकार करताना तुम्हाला तुमच्या मानेखाली ताण आलेला जाणवेल. यामुळे तुमचे गाल आणि डबलचीन कमी होईल.
सिंह ज्यापद्धतीने जांभई देतो अगदी तसाच हा व्यायाम प्रकार आहे. तुम्हाला तुमचे डोळे बंद करुन डोळे मोठे करायचे आहेत. जीभ जितकी बाहेर काढता येईल तितकी काढायची आहे. असे तुम्हाला किमान 10 वेळा तरी करायचे आहे. हा व्यायाम करताना तुम्हाला तुमच्या हनुवटीकडे आणि डोळ्यांच्या आजुबाजुला ताण जाणवेल. त्यामुळे तुमची डबलचीन आणि गाल कमी होतील. त्यामुळे तुम्ही हा व्यायाम एक दिवस आड करायला काहीच हरकत नाही.
आता तुम्हाला तुमची जॉ लाईन रेखीव करायची असेल. तर तुम्ही हा व्यायाम करायलाच हवा. तुम्हाला तुमचा जबडा डाव्या उजव्या बाजूला करायचा आहे. असे करताना तुम्हाला तुमच्या जॉ लाईनवर ताण जाणवेल. कालांतराने तुम्हाला तुमच्या कानापासून जबड्याचा आकार वेगळा दिसू लागेल. तेथील फॅट कमी झाल्यामुळे तुमचा चेहरा अधिक खुलून दिसेल.
बसल्या जागी करता येईल असा आणखी एक प्रकार म्हणजे मान खाली-वर करणं. या व्यायामप्रकाराचे इतरही फायदे असतील. पण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील फॅटही कमी होते. तुम्हाला खुर्चीवर किंवा एका ठिकाणी स्तब्ध बसून तुमची मान खाली आणि वर करायची आहे. तुम्हाला असेल करताना तुमच्या मानेखाली ताण जाणवेल.
तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर आम्ही सांगितलेले उपाय नक्की वापरून पाहा आणि नियमित हे उपाय केल्यास, तुम्हीदेखील दिसाल सुंदर.