आपल्या दैनंदिन जीवनात पेट्रोलियम जेलीचा वापर नक्कीच केला जातो. काहींच्या बॅगमध्ये तर बारामहीने पेट्रोलियम जेलीची डबी असते. थोडक्यात थंडी असो वा नसो प्रत्येकाच्या घरात पेट्रोलियम जेली ही असतेच. या पेट्रोलियम जेलीला वॅसलिन असं म्हणण्याची पद्धत आहे. फुटलेले ओठ, त्वचेचा कोरडेपणा, अंगावरील काळे डाग असो अथवा कपड्यांवरील एखादा डाग काढायचा असो वॅसलिन तुमच्या उपयोगाची वस्तू आहे. वॅसलिनचे अनेक सौंदर्य फायदे आहेत. शिवाय वॅसलिन हे त्वचेच्या अनेक समस्या दूर करणारं बहुगुणी औषधदेखील आहे. यासाठीच जाणून घ्या वॅसलिनचे फायदे आणि घरच्या घरी वॅसलिन तयार करण्याची सोपी पद्धत.
पेट्रोलियम जेली ही पांढरट, पारदर्शक रंगाचा एक चिकट पदार्थ असतो. मात्र या पेट्रोलियम जेलीत अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. पेट्रोलियम जेलीचा शोध 1859 मध्ये अमेरिकेत लागला. अमेरिकेत राहणाऱ्या रॉबर्ट चेसब्रो या रसायनतज्ज्ञाने या जेलीचा शोध लावला. खनिज तेलाचे उत्खनन करत असताना वापरण्यात येणाऱ्या एका चिकट पदार्थांतून वॅसलिनची निर्मिती झाली. पूर्वी फक्त या जेलीचा वापर फक्त जखमा बऱ्या करण्यासाठी केला जायचा मात्र आता शुद्ध स्वरूपात उपलब्ध असणारं वॅसलिन तुम्ही अनेक गोष्टींसाठी वापरू शकता. थंड अथवा कोरड्या हवामानाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांकडे पेट्रोलियम जेली असायलाच हवी. कारण या जेलीमुळे तुम्ही तुमच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत स्वतःचं संरक्षण करू शकता. शिवाय सौंदर्याव्यतिरिक्त अनेक गोष्टींसाठी तुम्हाला वॅसलिन उपयोगी पडू शकतं. आम्ही तुम्हाला पेट्रोलियम जेली स्वतःच घरच्या घरी कशी तयार करायची हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कधीही या पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता.
वॅसलिनचा वापर विविध गोष्टींसाठी केला जातो. जखम बरी करण्यापासून ते वस्तूंना गंज पकडू नये अशा कोणत्याही गोष्टीसाठी वॅसलिन वापरलं जातं. वॅसलिन प्रामुख्याने थंडीत हात, पाय आणि ओठांची निगा राखण्यासाठी वापरलं जातं. यासाठीच जाणून घ्या वॅसलिनचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही कसा करू शकता.
थंडीत ओठ फुटण्याची समस्या नेहमीच आहे. मात्र आजकाल वाढते प्रदूषण आणि वातावरणात होणारे बदल याचा परिणाम तुमच्या ओठांवर होत असतो. कोरड्या वातावरणामुळे ओठ फुटतात आणि त्यातून रक्त येऊ लागतं. तुम्हालाही असा त्रास होत असेल. तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर वॅसलिन नक्कीच लावू शकता. दररोज अगदी एखादी छोटीशी वॅसलिनची डबी बॅगेत ठेवून तुम्ही तुमच्या ओठांचे सतत संरक्षण करू शकता.
कोरडी त्वचा असल्यास वातावरणातील बदलाचा तुमच्यावर लगेच परिणाम होतो. त्वचेवर साधे नख फिरवलं तरी त्यावर ओरखडा दिसू लागतो. अशा त्वचेचं रक्षण करण्यासाठी दररोज सकाळी अंघोळीनंतर हाता-पायांवर वॅसलिन जरूर लावा. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होईल.
डोळांच्या पापण्यांना नित्यनेमाने वॅसलिन लावल्यामुळे त्यांच्यात चांगले बदल दिसू लागतात. म्हणूनच जर तुम्हाला काळ्याभोर आणि दाट पापण्या हव्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या पापण्यांवर पेट्रोलियम जेली जरूर लावा.
पायांना भेगा पडल्यास त्यातून असह्य वेदना येऊ लागतात. शिवाय पायांच्या भेगांमुळे इतरांसमोर फारच संकोच वाटू लागतो. पाय सुंदर दिसावे असं वाटत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांवर वॅसलिन लावा आणि त्यावर मोजे घाला. ज्यामुळे रात्रभर तुमच्या पायांमध्ये ते चांगल्या पद्धतीने मुरेल.
जेव्हा तुम्ही नेलपेंट लावता तेव्हा नखांच्या बाहेरील क्युटीकल्सलाही ते लागतं. ज्यामुळे नंतर नेलपेंट लावूनही तुमची बोटे आकर्षक न दिसता खराब दिसतात. जर तुम्हाला असं होऊ नये असं वाटत असेल तर याकरता नेलपेंट लावताना थोडंसं व्हॅसलिन बडच्या मदतीने तुमच्या नखांच्या बाहेरील भागाला लावा आणि मग नेलपेंट लावा. ज्यामुळे नेलपेंट लावताना ते पसरणार नाही.
बऱ्याचदा नखांवर सातत्याने नेलपेंट लावल्यामुळे नखांमधून चमकदारपणा कमी होतो. नखं निस्तेज आणि कोरडी दिसू लागतात. यासाठी नेलपॉलिश काढल्यावर नखांवर वॅसलिन लावा ज्यामुळे त्यांना पुन्हा नैसर्गिक चमक मिळेल. नियमित हा उपाय केला तर तुमच्या नखांमधील नैसर्गिक चमकदारपणा टिकून राहील.
बरेचदा मेकअप करताना तुमच्या भुवया मात्र विरळ आणि फिक्या दिसतात. असं नको असेल तर मेकअपनंतर भुवयांवरून वॅसलिनचा हात फिरवा ज्यामुळे त्या हायलाईट होतील. ज्यामुळे तुमच्या लुकमध्ये नक्कीच चांगला बदल दिसून येईल. रोज रात्री झोपताना हा उपाय केला तर तुमच्या भुवयांचे केस दाट आणि काळेभोर होतील.
बऱ्याचदा आपल्या हाताचे कोपर काळे आणि कडक होते. जर तुम्हाला हाताच्या कोपरांचा काळेपणा दूर करायचा असेल तर दररोज रात्री झोपण्याआधी दोन्ही कोपरांना वॅसलीनने चांगला मसाज करा. असं केल्यास 2-3 आठवड्यातच तुम्हाला कोपरांचा रंग उजळलेला दिसेल.
व्हॅसलिनचा वापर तुम्ही चेहऱ्यावर मेकअप करतानान शिमर म्हणूनही करू शकता. पूर्ण मेकअप करून झाल्यावर चेहऱ्यावरील उठावदार पॉईंट्सवर उदा. चीक बोन, नाक, कपाळ आणि हनुवटीवर थोडंसं वॅसलीन लावून हाईलाईट करू शकता.
मेकअप काढणं हे एक खूप मोठं टास्कच असतं. कारण बऱ्याचदा मेकअप रिमूव्ह करण्यासाठी नेमकं काय वापरावं हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र जर असं असेल तर तुम्ही वॅसलीनचा वापर मेकअप काढण्यासाठी नक्कीच करू शकता. वॅसलीनमुळे तुमची त्वचा खराब देखील होणार नाही.
बऱ्याचदा केस व्यवस्थित सेट नाही झाले तर तुमची हेअरस्टाईल लुक अगदी खराब दिसू शकतो. यासाठीच हेअरस्टाईल करताना केस सेट करण्यासाठी तुम्ही वॅसलीन वापरू शकता. ज्यामुळे केस सेट होतोत शिवाय त्यांचे नुकसान कमी होते.
जर तुमच्या कपड्यांवर नेलपेंट काजळ, लिपस्टीक किंवा दुसऱ्या कोणत्या प्रकारचे डाग लागले असतील तर वॅसलीनच्या मदतीने तुम्ही ते आरामात दूर करू शकता. डाग लागलेल्या भागावर व्हॅसलिन लावा आणि चोळा. मग पाण्याने स्वच्छ धुवा. डाग गायब होतील.
फक्त कापडापासून बनवलेल्या चपला सोडल्यास पॉलीश चालणाऱ्या चपला, सँडल्स आणि बूटांना चमकवण्यासाठी वॅसलीन हा उत्तम पर्याय आहे. थोडीशी पेट्रोलियम जेली घ्या आणि तुमच्या बूटांवर लावा, मग एखाद्या कपड्याने ती चांगली घासा. बघा तुमचे शूज एकदम चमकतील.
जर तुमच्या घरातील दरवाज्यांचा उघडझाप करताना आवाज होत असल्यास दरवाज्याच्या कडांवर वॅसलीन लावा. असं केल्यास दरवाज्याचा आवाज येणार नाही.
जर तुम्हाला स्प्लीट एंड अथवा केसांना फाटे फुटण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही वॅसलीनचा वापर करू शकता. यासाठी तुमच्या केसांच्या टोकांना व्हॅसलिन लावा आणि काही वेळाने शँपू करा. लवकरच स्प्लीट एंड नाहीसे होतील.
बाजारात तयार वॅसलिन नक्कीच मिळते. मात्र जर तुम्हाला केमिकल विरहित पेट्रोलियम जेली वापरण्याची इच्छा असेल तर ती तुम्ही अगदी तुमच्या घरी तयार करू शकता. शिवाय स्वतःच्या हाताने तयार केलेल्या गोष्टी वापरण्यात एक वेगळंच समाधान असतं. या होममेड वॅसलिनमुळे तुमच्या त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही. पेट्रोलियम जेली घरच्या घरी तयार करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी फार वेळ लागत नाही. अगदी लहान मुलंदेखील ती स्वतः तयार करू शकतात.
साहित्य - मेण, नारळाचे तेल, ग्लिसरिन
स्टेप 1 - दोन चमचे मेण, दोन चमचे नारळाचे तेल एका डबल बॉयलर मध्ये वितळवून घ्या.
स्टेप 2 - वितळलेल्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा ग्लिसरिन मिसळा आणि चांगले एकजीव करून घ्या.
स्टेप 3 - मिश्रण एका छोट्या डबीत भरून सेट करण्यासाठी एकाजागी ठेवून द्या. पंधरा ते वीस मिनीटांनी ते चांगल्या पद्धतीने तयार होते.
साहित्य - एक चमचा नारळाचे तेल, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, एक चमचा एरंडेल तेल, व्हिटॅमिन ई ऑईल, दोन चमचे Beeswax
स्टेप 1 - नारळाचे तेल आणि Beeswax एकत्र करून डबल बॉयलरमध्ये ठेवा. तुम्ही मायक्रोव्हेवमध्येदेखील ते गरम करू शकता.
स्टेप 2- मिश्रण वितळल्यानंतर त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल, एरंडेल तेल आणि व्हिटॅमिन ई ऑईल मिसळा.
स्टेप 3 - मिश्रण चांगले एकजीव करा आणि एका छोट्याशा डबीत भरून सेट करण्यासाठी ठेवा. पंधरा ते वीस मिनीटांनी तुमचे होममेड वॅसलिन तयार होईल.
नक्कीच वॅसलिन जसे तुम्ही तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वापरू शकता तसंच त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. कपड्यांवरील डाग काढण्यासाठी, फूटवेअर पॉलिश करण्यासाठी, खिडक्या-दारांमधून येणारा बिजागरीचा आवाज कमी करण्यासाठी असं कशासाठीही तुम्ही वॅसलिन वापरू शकता.
मुळीच नाही. हिवाळ्यात वॅसलिन नक्की वापरावं. मात्र आजकाल हवामानात सतत बदल होत असतात. यासाठी वॅसलिन तुम्ही कोणत्याही ऋतूत वापरू शकता.
बाजारात मिळणार वॅसलिन हे नक्कीच चांगल्या स्वरूपाचं असतं. मात्र जर तुम्हाला केमिकलचा वापर कमी असलेलं अथवा होममेड गोष्टी वापरायला आवडत असेल तर तुम्ही आम्ही वर दिलेल्या पद्धतीने घरीत वॅसलिन स्वतः तयार करू शकता. तुम्ही या पद्धतीने होममेड वॅसलिन तयार केलं का ते आम्हाला जरूर कळवा.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
अधिक वाचा
ओठांशिवाय इतरही गोष्टींसाठीही होऊ शकतो व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचा वापर
चुकूनही तुमच्या चेहऱ्यावर लावू नका ‘या’ ७ गोष्टी, पडू शकतं महागात