दही अथवा ताक शरीरासाठी उत्तम आहे हे तर आपल्याला माहीतच असेलच. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत दही अथवा ताक वाढण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. दह्यात भरपूर पाणी टाकून घुसळून ताक केलं जातं. जरी दह्यापासून ताक तयार होत असलं तरी दही आणि ताक यांचे शरीरावर होणारे फायदे वेगवेगळे असतात. ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. ज्यामुळे शरीराची पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.यासाठीच ताकाचे फायदे जरूर जाणून घ्या. त्यासोबतच जाणून घ्या सकाळी ताक पिण्याचे फायदे (tak pinyache fayde) काय होतात.
ताक पिण्याचे अनेक फायदे आरोग्यावर होतात. यासाठी आरोग्य तज्ञ नेहमी एक ग्लास ताक पिण्याचा सल्ला देतात. यासाठीच जाणून घेऊ या ताक पिण्यामुळे आरोग्यावर काय चांगला परिणाम होतो.
ताक हे थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्यामुळे शरीराला त्वरीत थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. एक ग्लास ताकात जिरे पावडर, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्यामुळे तुमची तहान लगेच भागते. शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते. तुम्ही ताकात एखादा बर्फाचा तुकडा टाकू शकता. मात्र बर्फ न टाकाताही ताक पिण्यामुळे तुमच्या शरीराला त्वरीत थंडावा मिळू शकतो. बाजारातील कोल्ड ड्रिंकपेक्षा हे नैसर्गिक पेय नियमित पिणे शरीरासाठी नक्कीच लाभदाययक ठरू शकते. ज्या महिलांना मॅनोपॉजच्या काळात अंगातून दाह जाणवतो त्यांनी नियमित ताप पिल्यास त्यांना नक्कीच आराम मिळू शकतो. सकाळी ताक पिण्याचे फायदे चांगले होत असल्यामुळे रात्रीपेक्षा सकाळी ताक पिणे फायदेशीर ठरते.
दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळण्यामुळे ताक निर्माण होते. त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ताकामध्ये नव्वद टक्के पाणी आणि पोटॅशिअमसारखे इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही नियमित ताप पित असाल तर तुमचे शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहाड्रेशन होत नाही.
ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. कारण यामध्ये दह्यातील शरीरासाठी उत्तम असे बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि तुमची पचनशक्ती वाढते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते. कारण ताकामुळे तुमच्या आतड्यांचे कार्य सुरळीत होते. अपचन आणि पोटाच्या समस्या असलेल्या लोकांना ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताकामुळे तुम्हाला अन्नातून झालेले पोटाचे इनफेक्शन अथवा फूड पॉईझनिंगचा त्रास होत नाही.
ताक हे दह्यापासून तयार केले जाते. ज्यामुळे ताकात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. एक कप ताकामध्ये जवळ जवळ शंभर मिग्रॅ कॅल्शिअम असतात. तुमच्या हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी शरीराला सतत कॅल्शिअमची गरज असते. कारण त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. जे लोक नियमित ताक पितात त्यांना हाडांचे विकार अथवा दाताची दुखणी कमी प्रमाणात होतात. हाडे आणि दातांप्रमाणेच रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी, स्नायू मजबूत होण्यासाठी आणि ह्रदयाची स्पंदने व्यवस्थित चालू राहण्यासाठी शरीराला कॅल्शिअमची गरज असते. ताकामधून तुमच्या शरीराला लागणाऱ्या कॅल्शिअमचा योग्य पूरवठा केला जातो.
बऱ्याचदा बाहेरचे अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे अथवा अती प्रमाणात तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. मात्र यावर सोपा उपाय हा की एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धणे पावडर मिसळून पिणे. कारण ताकातील लॅक्टिक अॅसिड तुमच्या पोटातील अॅसिडिटी कमी करते आणि धणे पावडर आणि ताकाचा थंडावा छातीत होणारी जळजळ कमी करते. हिवाळ्यात ताक पिण्यामुळे काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का
शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे ह्रदयावर ताण येऊन ह्रदयविकार होतात. मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे ह्रदयविकारांचा धोका टाळता येतो. निरोगी ह्रदयासाठी नियमित एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरेल.
आजकाल कामाची दगदग, चिंता, काळजी याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत असतो. बऱ्याचदा मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो आणि हायपटेंशन, ह्रदयविकाराच्या समस्या वाढू लागतात. मात्र जर तुम्ही दररोज ताक पित असाल तर तुमचा रक्तदाब कमी होतो. कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारे पोटॅशिअम असते. यासाठीच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या आहारात ताक असायलाच हवे.
कोरोनाच्या भितीचा प्रभाव आजही कमी झालेला नाही. कोरोनाला बळी पडणाऱ्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी असल्याचं अनेक संशोधनात आढळलं आहे. यासाठी या काळात घरातील प्रत्येकाची प्रतिकारशक्ती मजबूत असायला हवी. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे. कारण ताकामुळे तुम्हाला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून वाचण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण होते.
ताक नियमित पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही चांगली आहे. कारण ताक पिण्यामिुळे तुमची पचनशक्ती सुधारते. ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स यामुळे बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे ताकामधील लॅक्टिक अॅसिड तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते. ताक पिण्यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंगचे डाग, काळे डाग, पिंपल्सचे व्रण आणि काळसरपणा कमी होतो. ताक तुमच्या त्वचेला आतून मॉस्चराईझ करते, त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला चिरतरूण ठेवते. ताकामुळे तुम्हाला डागविरहित त्वचा मिळू शकते जाणून घ्या कशी.
ताक हे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे खूप चांगले स्त्रोत आहे. शिवाय त्यात कॅलरिज आणि फॅट्स कमी असतात. ताक पिण्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते. शिवाय त्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड आणि उत्साही वाटू लागते. ज्यामुळे तुम्ही दिवसभरात अनावश्यक पदार्थ कमी प्रमाणात खाता. ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये ताकाचा समावेश जरूर करावा. कारण ताकामुळे तुमचे वजन तर कमी होतेच शिवाय तुमचे पोषणही योग्य प्रमाणात होते.
ताक पिणे आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे ताक पिण्याचे दुष्परिणाम तुलनेने कमी आहे. ताकाचे दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी ताक पिण्याची वेळ फार महत्त्वाची आहे. यासाठी रात्री उशीरा पिऊ नये. त्याचप्रमाणे अती आंबट दह्याचे ताक पिऊ नये कारण त्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो. कोणतीही गोष्ट शरीरासाठी उपयुक्त असली तरी ती अतिप्रमाणात मुळीच सेवन करू नये. त्याचप्रमाणात अती प्रमाणात ताक पिण्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठीच दूध आणि ताक पिताना हे नियम पाळावेत जसं की अती प्रमाणात ताक पिण्यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शिअम, प्रोटिन्सचे प्रमाण वाढू शकते. ज्यातून काही आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच दिवसभरात दोन ते तीन ग्लास ताजे ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरेल.
बाजारात विकतचे ताक मिळतं मात्र ताक घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने करता येऊ शकतं. जाणून घ्या कसं
साहित्य -
ताक बनवण्याची कृती -
विरझण लावल्यावर पहिल्याच दिवशीचे अथवा अधमुरे दही घ्यावे. कारण जास्त शिळे दही असेल तर ताक आंबट होते. ताक तयार करण्यासाठी ते घेऊ नये कारण आंबट दही अथवा ताक शरीरासाठी बाधक असते. यासाठीच शक्य असल्यास ताजे दही वापरावे. दह्याच्या तीनपट पाणी दह्यात मिसळावे. दही आणि पाणी एकजीव होईपर्यंत ते चांगले घुसळून घ्यावे. घुसळण्यासाठी मिक्सरचा अथवा घुसळणीचा वापर करावा. घुसळल्यामुळे ताक आणि पाणी एकत्र होऊन एक पाचक द्रव्य तयार होते त्याला ताक असं म्हणतात. चवीसाठी तुम्ही त्यामध्ये मीठ, साखर, जीरेपावडर, सैंधव, कोथिंबीर टाकू शकता. असे घरी तयार केलेले ताक शरीरासाठी अतिशय उत्तम असते. ताक शक्य असल्यास जेवताना अथवा दोन जेवणाच्या मधल्यावेळेत घ्यावे. रात्री उशीरा ताक पिऊ नये. कारण ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.
होय, तुम्ही नक्कीच दररोज ताक पिऊ शकता. कारण ताक पिण्याचे फायदे अनेक आहेत. शिवाय त्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला चांगला फायदा होतो. हाडांच्या वाढीसाठी, दातांच्या सुरक्षेसाठी, ह्रदय आणि पोटाच्या आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी ताक पिणे तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरेल. सकाळी ताक पिण्याचे फायदे अनेक असल्यामुळे तुम्ही सकाळी नाश्त्यासोबत ताक पिऊ शकता.
निरोगी राहण्यासाठी ताक पिण्याची वेळ फार महत्त्वाची आहे. यासाठी दिवसभरात तुम्ही कधीही पिऊ शकता. मात्र रात्री उशीरा ताक पिऊ नये रात्री ताक पिण्याचे फायदे तुलनेने कमी असतात. यासाठी जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर संध्याकाळी लवकर जेवा आणि त्यासोबत एक ग्लास ताक प्या. या शिवाय तुम्ही सकाळी नास्ता केल्यावर, दुपारी जेवताना अथवा दोन जेवणाच्या मध्ये असं दिवसभरात कधीही ताक पिऊ शकता.
नाही, ताक पिण्यामुळे तुमचे वजन मुळीच वाढत नाही. उलट जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही आहारात ताकाचा समावेश अवश्य करावा. कारण ताकात खूप कमी कॅलरिज आहेत. शिवाय त्यामध्ये फॅट्सही नगण्य असतात. ताक पिण्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटत असल्यामुळे तुम्ही इतर अपथ्यकारक पदार्थ कमी खाता.
होय नक्कीच, कारण भारतातील अनेक घरांमध्ये ताक स्वतः घरी तयार केले जाते. दिवसभर उत्साही राहण्यासाठी दिवसभरात ताक पिणे उत्तम मानले जाते. ताकात चांगले प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारते. दूध हे आरोग्यासाठी उत्तमच आहे मात्र दूधापासून तयार केलेल्या दह्याचे ताक हेही पौष्टिक मानले जाते. कारण ताक पिण्यामुळे तुमच्या अपचनाच्या समस्या कमी होतात.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक