दिवाळीचा सण संपूर्ण जगाला उजळवून टाकतो. प्रत्येक घर आणि बाजारपेठा दिवाळीच्या निमित्ताने सजल्या आहेत. सगळीकडे तोरणं, दिवे आणि लाईटींगने रोषणाई केलेली दिसून येत आहे. आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना भेटून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ आणि मस्तपैकी फराळाचा आनंद घेऊ. पारंपारिक दिवाळीच्या या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत आणि बदलूही नयेत. पण दिवाळीच्या निमित्ताने आपण अजून एका चांगल्या गोष्टीची सुरूवात करू शकतो ती म्हणजे इकोफ्रेंडली दिवाळी साजरी करून. हो...इकोफ्रेंडली दिवाळी. निसर्गाला पूरक आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार करूया.
मग कसा करता येईल हा निसर्गदायी, स्वच्छतापूरक आणि आरोग्यदायी बदल चला जाणून घेऊया.
दर दिवाळीला आपण नवीन कपडे तर आवर्जून घेतोच पण यंदाच्या दिवाळीत जुन्या कपड्यांचं दानही करूया. एखाद्या एनजीओमध्ये किंवा गरजू व्यक्तींना तुमचे जुने कपडे द्या. शक्य असल्यास तुम्ही त्यांना नवीन कपडेही घेऊन देऊ शकता. कपडे दान करणं शक्य नसल्यास तुम्ही तुमच्याजवळची जुनी पुस्तकं एखाद्या एनजीओच्या लायब्ररीला द्या.
यंदाच्या दिवाळीत इलेक्ट्रीक माळा किंवा कंदीलाने रोषणाई करण्याऐवजी वापर करा मातीच्या पणत्यांचा. ज्यामुळे तुमचं लाईट बिलही कमी येईल आणि मातीच्या पणत्या बनवणाऱ्या कुंभारांच्या रोजगारालाही हातभार लागेल. मातीच्या पणत्या लावणं शक्य नसल्यास त्याऐवजी सेंटेड कँडल्सचा वापर करा. ज्यामुळे तुमचं घर उजळेल आणि सुगंधितही होईल.
इकोफ्रेंडली दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रांगोळीसाठी करा नैसर्गिक रंगांचा वापर. तुम्ही रंगांऐवजी फुलांची रांगोळी किंवा तांदूळाच्या पिठीनेही रांगोळी काढू शकता. अगदी पारंपारिक रांगोळी पाहायला गेल्यास हळदी-कुंकूवाचाही रांगोळीत रंग भरण्यासाठी वापर करू शकता.
यंदाच्या दिवाळीत प्लास्टीकच्या तोरणांऐवजी करा फुलांच्या तोरणांचा वापर. झेंडू आणि इतर फुलांचा वापर करून घराची सजावट करा. यामुळे घर सुंदर तर दिसेलच पण फुलांचा गोड सुगंधही घरात दरवळेल.
फटाके हा दिवाळीचा अविभाज्य भाग असला तरी फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे तुमच्या आनंदामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्या. सजग नागरिक बना आणि फटाक्यांना नाही म्हणा. कारण फटाक्यांमुळे फक्त पर्यावरणाचाच नाही तर अनेक अस्थमा रूग्णांना आणि आपल्याला श्वासोश्वासाचा त्रास होऊ शकतो.
दिवाळीमध्ये भेटवस्तू देणं हे अपरिहार्य आहे. पण यंदाच्या दिवाळीत तुमच्या जवळच्यांना द्या अर्थपूर्ण आणि उपयोगी पडणाऱ्या भेटवस्तू. मिठाई किंवा इतर गोष्टींऐवजी तुम्ही एखादं झाडं, सुकामेव्याचा किंवा हेल्दी स्नॅक्सचा बॉक्स तुमच्या जवळच्यांना द्या. एखादं पुस्तक द्या. ज्यांना बरेच दिवसात भेटला नसाल त्यांना वेळात वेळ काढून भेटा आणि क्वालिटी टाईमची भेट आवर्जून द्या.
परफेक्ट भेटवस्तू तर घेतली पण त्याला रॅपिंग करणं हे आलंच. पण या दिवाळीत गिफ्ट पेपर रॅपऐवजी वापरा वर्तमान पत्र किंवा हँडमेड पेपरचा वापर करा आणि पर्यावरणाला वाचवा. डेकोरेटीव्ह पेपर किंवा प्लास्टिक गिफ्ट रॅपिंग टाळा.
मग यंदाच्या दिवाळीत जे हवं तेच खरेदी करा. सगळेकडी भरपूर ऑफर्स आहेत पण त्या नादात जास्त खर्च करू नका. तुमच्याकडे जर जास्त मिठाई बॉक्सेस किंवा इतर खाण्याच्या गोष्टी आल्या असतील तर त्या टाकून न देता गरजूंना द्या.
सर्वांना POPxoMarathi कडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.