तुम्ही कधी ज्योतिषीला हात दाखवला आहे का? जवळपास 99% लोकांना ज्योतिषी सांगतात की, तुम्ही पैसे तर खूप कमवाल पण ते वाचवता नाही येणार. हे एक कटू सत्य आहे. खरोखर तुमचं भविष्य पाहून ते हे सांगतात का? नाही. पण प्रत्येक माणसाच्या बाबतीत हीच सद्य परिस्थिती आङे. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना योग्य फायनॅन्शियल प्लॅनिंग करणं जमत नाही. पैशांचं असं सेव्हिंग ज्यात कमाई आणि खर्चाचा ताळमेळ योग्य असणं. जर तुम्हालाही तुमची बॅलन्सशीट स्टाँग बनवायची असेल तर काही चुका टाळाव्या लागतील. तरच तुम्हाला पैशांचं योग्य प्लॅनिंग करणं जमेल. आता तुम्ही म्हणाल कोणत्या चुका. त्याच चुका आम्ही या लेखात तुम्हाला सांगणार आहोत.
हर पल यहा जी भर जियो...या गाण्यांच्या ओळीप्रमाणे आपण बहुतेकदा फक्त काही दिवसांचा विचार करतो. जस महिन्याभराच्या पैशांचं प्लॅनिंग तुम्ही करता आणि फक्त 20 दिवसांतच तुमच्या अकाउंटमध्ये खडखडाट होतो. मग उरलेले 10 दिवस अगदी त्रासदायक वाटू लागतात. याबाबत तुम्हाला काय वाटतं? मग यावर उपाय काय...तर आजसाठी तुम्ही उद्याचा विचारही केलाच पाहिजे. जर महिन्याभराचे पैसे फक्त 20 दिवसांतच संपत असतील तर तुमच्या प्लॅनिंगमध्ये गफलत आहे. पुन्हा एकदा तुमच्या खर्चाचा आढावा घ्या. महिन्याभरातील किमान 12 टक्के भाग हा सेव्हिंग्ज्ससाठी वापरलाच पाहिजे. तसंच तुमच्याकडे कोणत्याही आपातकालीन परिस्थितीसाठी इमर्जंसी फंडही नक्की असावा.
आपल्या प्रत्येकाकडे आजकाल सर्व सुखवस्तू हमखास असतात. कमतरता आहे फक्त एका गोष्टीची पेशन्सची. नोकरी सुरू होताच आपण आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायला लागतो. ज्या बऱ्याच काळापासून आपल्या टार्गेटवर असतात. मग तो महागडा फोन असो, गाडी घेणं असो वा वेकेशनवर जाणं असो. अशावेळी आपल्या मदतीला येते बँक. जे लगेच आपल्याला लोन द्यायला तयार होतात. पण लोन हे आपल्या मदतीसाठी नाही. हे एक दुष्टचक्र आहे. कारण एकदा तुम्ही लोन घेतलं की, आयुष्य ते लोन फिटवण्यात निघून जातं. यावर उपाय म्हणजे अशा गोष्टींसाठी लोन घ्या ज्यांची किंमत भविष्यात वाढणार आहे. उदा. घर. लोनवर कधीही गाडी किंवा मोबाईलसारख्या वस्तू घेऊ नये. कारण घराची किंमत ही भविष्यात वाढते पण मोबाईल किंवा गाडीच्याबाबतीत असं होत नाही. पण घरासाठी लोन घेतानाही त्याचा ईएमआय तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 45% पेक्षा अधिक नसावा.
हा आपल्या मानवी विचाराबाबतची सर्वात मोठी चूक आहे की, आपल्याला पटतच नाही की, आपल्यासोबतही भविष्यात काही वाईट होऊ शकतं. यामुळे आपण कधी इन्श्युरन्स घेत नाही. परिणामी ऐनवेळी संकट आल्यावर आपण हताश होतो. या चुकीवरील उपाय म्हणजे इन्श्युरन्स पॉलिसी घेणं. यामुळे ना केवळ वाईट काळात तुम्हाला प्राथमिक मदत मिळते तर टॅक्सवरही सूट मिळते. विशेषज्ञानुसार तुमच्या कमाईच्या चार ते पाट पट इन्श्युरन्स असावा. तुम्ही जितक्या कमी वयात विमा काढाल तितके कमी प्रीमियम्स तुम्हाला भरावे लागतील.
तुम्ही उडत उडत ऐकलं असेलच की, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले की, फायदा होतो आणि रिटर्न्सही चांगले मिळतात. जर तुमची नोकरी आत्ताच सुरू झाली असेल तर गुंतवणूक करणं चांगला विचार आहे. पण पूर्ण माहिती घेतल्यावर एखाद्या गोष्टीत इन्व्हेस्ट करा. कारण वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या गरजा बदलत असतात. युवा असताना तुम्ही शेअर मार्केटची रिस्क घेऊ शकता. पण वयाच्या तिशीत घर खरेदीसारखे मोठे निर्णय घेणे आणि वयाच्या चाळीशीत तुम्ही गँरेटेड रिटर्न असणाऱ्या गोष्टीतच इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे.
हा लेख वाचून तुम्हाला पैशांबाबतच्या काही चुका नक्कीच कळल्या असतील. आता तुम्हाला कळलं असेल की, तुमच्याकडे पैसे तर खूप येतात पण ते टिकत का नाहीत. कारण हा तुमच्या नशिबाचा नाही, तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा प्रोब्लेम आहे. मग आता तुम्हाला कळलं असेल की, प्रोब्लेम कशात आहे.