प्रत्येक घरात तळलेला पदार्थ केल्यास त्याला लगेच पसंती मिळते. मग भजी असो वा कटलेट्स असो वा पापड असो. भाजलेल्या पापडापेक्षाही तळलेला पापड आवडीने खाल्ला जातो. एकदा तळण्यासाठी तेल काढलं की, ते काही एकदा वापरून संपत नाही. मग त्याचा पुन्हा पुन्हा नाही पण निदान दोनदा तरी नक्कीच वापर केला जातो. जर असं वापरलं नाहीतर त्या तेलाचा कसा वापर करायचा हा प्रत्येक गृहिणीपुढे प्रश्न असतो. बरेचदा दुसऱ्या एखाद्या भाजीला फोडणी देण्यासाठी किंवा आमटीसाठी या तेलाचा वापर केला जातो. पण खरं पाहता हे चुकीचं आहे. हे जर तुमच्या तेलाची बचत करणार असलं तरी आरोग्यासाठी मात्र नक्कीच हानीकारक आहे.
संशोधनानुसार, एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरल्याने शरीरात जास्त फ्री रॅडिकल्स बनू लागतात. जे आपल्या शरीरात इंफ्लमेटरी डिसऑर्डर्स, हृदयाशी निगडीत समस्या आणि एवढंच नाहीतर कॅन्सरसारख्या गंभीर समस्यांना जन्म देतात. प्रत्येक तेलाचा एका स्मोकिंग पाॅइंट असतो तोपर्यंत तेल खराब होत नाही. ज्या तेलाचा स्मोकिंग पाॅइंट जास्त तेवढं ते तेल तुम्ही जास्त काळापर्यंत वापरू शकता. (स्मोक पाॅइंट म्हणजे गरम केल्यावर जास्त धूर येणारं तेल) लो स्मोक पाॅइंट असलेलं तेल कधीच पुन्हा वापरू नये. रिफाइंड ऑईलच्या तुलनेत व्हेजीटेबल ऑईलचा स्मोकिंग पाॅइंट जास्त असतो. जर तेलाच्या स्मोक पाॅइंटपेक्षा ते जास्त गरम केल्यास ते हानीकारक असतं. कारण त्यामुळे तेल ऑक्सीडाईज होऊन फ्री रॅडीकल्स आणि 4-हायड्रॉक्सी-2-नॉनएनलसारखे कंपाउंडस रिलीज करायला लागतं.
फ्री रॅडिकल्स त्वचेला लवकर म्हातारं भासवतात. यामुळे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग वाढतात. फ्री रॅडीकल्स वाढत्या वयात अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या आजारांना जन्म देतात. त्यामुळे भलेही फ्राईड ऑईल पुन्हा वापरणं तुमच्या खिश्यासाठी चांगलं असलं तरी तुमच्या भविष्यातील आरोग्यासाठी मात्र हे महाग पडेल. तसंही आपण नेहमी म्हणतोच की, प्रिकॉशन इज बेटर दॅन द क्योर म्हणजे इलाजापेक्षा काळजी घेतलेली बरी. मग तुमची ही किचनमधील सवय बदलण्याचा प्रयत्न करा. पुढच्यावेळी जेव्हा एखादा पदार्थ तळाल तेव्हा तेल कोणत्याही डब्यात स्टोर करण्याऐवजी ते फेकून द्या किंवा तळताना तेलाचा कमीतकमी वापर करा. ज्यामुळे तुमचं तेल उरणारही नाही आणि उरलेलं तेल वाया जाण्याचं दुःखही होणार नाही.