भोगीच्या भाजीचे आरोग्यदायी महत्त्व

भोगीच्या भाजीचे आरोग्यदायी महत्त्व

मकरसंक्रात हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस मकरसंक्रांत आणि तिसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा केला जातो. हा सण वर्षाचा पहिला सण असल्यामुळे या उत्साहाचा गोडवा काही औरच असतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेंकांना तिळगूळ देण्याची पद्धत आहे. यासोबत तिळगुळ घ्या आणि गोड बोला असंदेखील आवर्जून म्हटलं जातं. या प्रथेमागे सर्वांनी एकत्र येणं आणि तिळगुळाप्रमाणे गोडीनं राहणं हा हेतू आहे. एवढंच नाही तर मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी देवाला बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी असा नैवेद्य करून सर्वांनी एकत्र बसून खाणं हे देखील एका खास उद्देशाने केलं जातं. यासाठीच जाणून घ्या यामागचं खरं कारण 

भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी -

मकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा  वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण  आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भुक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास  शरीराला चांगला फायदा होतो. 

भोगीची भाजी कशी करतात -

वांगे, बटाटा. मटार, गाजर, शेंगदाणे, हरभरे अथवा या काळात उपलब्ध असणाऱ्या ताज्या फळभाज्या घ्या. स्वच्छ धुवून त्यांच्या एकसमान फोडी करा. शेंगदाणे, हरभरा, घेवडा सोलून उकडून घ्या. जिरे मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, तिखटाची फोडणी तयार करा आणि त्यात या भाज्या टाका. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. भाजी शिजल्यावर चिंच आणि गुळ टाका. भाजीत वरून तीळ अथवा शेंगदाण्याचा कूट अथवा खोबरं पेराआणि चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करा. तीळ लावून थापलेल्या गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत या भाजीची चव चाखा. अनेक ठिकाणी भोगीच्या दिवशी रात्री भात खाल्ला जात नाही. फक्त ही भाजी आणि भाकरीच खाण्याची पद्धत आहे.

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

मकरसंक्रांतीला संपूर्ण भारतात करण्यात येणारे ‘15’पदार्थ

मकर संक्रांत नक्की का साजरी करतात, जाणून घ्या अथपासून इतिपर्यंत

मकर संक्रांत स्पेशल: संक्रांतीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार (Black Saree For Sankranti In Marathi)