हरवत चाललेलं प्रेमाचं पत्र...प्रिय...

हरवत चाललेलं प्रेमाचं पत्र...प्रिय...

आजकाल बाजारामध्ये आलेल्या अनेक विविध गिफ्टचा वापर करायचा आणि व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रिय वक्तीला गिफ्ट द्यायचं हे ठरून गेलेलं आहे. पण तुमच्या स्वतःच्या भावना आणि स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र देऊन कधी आपल्या प्रिय व्यक्तीला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी या खास दिवशी काही खास करायचं असेल तर स्वतःच्या हाताने तुमच्या भावना व्यक्त करून लिहा. तुम्हाला अगदी कविता किंवा भावनात्मक रितीनेच लिहिलं पाहिजे असं नाही. पण तुम्ही लिहिलेले तुमचे शब्द आणि तुमच्या भावना या नक्कीच तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी महत्त्वाच्या ठरतील. हे प्रेमाचं पत्र कुठेतरी हरवत चाललं आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच पुन्हा आपल्या भावना व्यक्त करून हे पत्र नक्कीच लिहू शकता. आता त्यासाठी प्रेम म्हणजे नक्की काय आणि आपल्या व्यक्तीसाठी आपल्या मनात नक्की काय भावना येतात हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. माझ्यासाठी प्रेम म्हणजे काय आणि मी कशाप्रकारे माझ्या प्रिय व्यक्तीसाठी भावना व्यक्त करेन हे इथे देत आहे. तुम्हीही करा अशा प्रकारे तुमच्या भावना व्यक्त - 

प्रिय…..

प्रत्येक माणसाचं एकमेकांशी खूप वेगळं नातं असतं. तू माझ्या आयुष्यात आलास आणि सगळंच बदललं. सुखी असणं आणि सुखी असण्याचं नाटक करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात.  तुझ्या येण्याने मी पूर्ण झाले. रक्ताचं नातं बनवता येत नाही पण प्रेमाचं नातं बनवता येतं आणि ते आपणच निवडत असतो. तुला मी आयुष्यात निवडलं हे माझ्यासाठी नक्कीच भाग्याचं आहे. गेल्या अनेक वर्षात अनेक चढउतार आले. अनेकदा भांडलो आणि तितक्यात प्रेमाने जवळ आलो. खरं तर तुझं माझं करमेना आणि तुझ्याशिवाय जमेना असं काहीसं झालं आहे आपलं. नेहमी व्हॅलेंटाईनला काय गिफ्ट हवं यावर विचार करून करून आणि तुला विचारून मी तुला भंडावून सोडते ना? यावर्षी इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा माझ्या भावना व्यक्त करतेय.

खूप वर्षांपूर्वी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा कदाचित वाटलंही नाही की मी तुझ्यावर इतकं प्रेम वगैरे करेन. कारण अगदी पहिल्या दिवसापासून मला तुझा खडूसपणाच पहिले दिसला. पण जसंजसं आपली मैत्री झाली मला तू कळायला लागलास. त्या खडूसपणामागचा तुझा हळवा स्वभाव त्याच्या मी प्रेमात पडले. आयुष्यात एक तरी व्यक्ती असते जिची आपल्याला सवय होते आणि माझ्यासाठी तू माझी सवय आहेस. सकाळी उठल्या उठल्या तुला बघितल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि तुला बघितल्याशिवाय माझे डोळेही मिटत नाहीत. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत कोणावर प्रेमच केलं नाही असा माणूस सापडणं विरळाच. जगण्यासाठी प्रेम खूप गरजेचं असतं. मग ते कोणत्याही नात्यातलं असो. प्रेमामुळंच नाती जोडली आणि तोडलीही जातात. कोणतंही नातं हे दोन्हीकडून जपणं गरजेचं असतं. पण वास्तविक नातं तुटायला सुरुवात होते ती 'गृहीत धरण्यामुळं'. नातं कोणतंही असो पण जेव्हा समोरचा व्यक्ती सतत गृहीत धरायला लागतो तेव्हा त्या नात्याला तडा जाणं साहजिकच आहे. अशी वेळही खूप वेळा आली. पण तुला सोडून जाणं कधी जमलचं नाही. 

आपल्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीबद्दल आपल्याला मनापासून काळजी असते. कितीही काहीही झालं तरीही ही काळजी दाखवण्याची गरज मात्र नक्की असते. ही काळजी दिसली नाही, तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नसतो. माझी नेहमीच तुझ्याकडून इतकीच अपेक्षा असते की तू माझी काळजी घ्यावी आणि माझ्यावर प्रेम करावं.  तुला ते व्यक्त करता येत नाही. पण तुझ्या वागण्यातून मला ते जाणवतं. तरीही मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं असतं. तुझ्या तोंडून मला स्वतःचं कौतुक आणि स्तुती पण ऐकायची असते. पण ती तू कधीच इतक्या वर्षात केली नाहीस. बस या एका गोष्टीसाठी मी नेहमीच तुझ्यावर रागावते. पण तरीही तू माझी ही इच्छा कधीच पूर्ण करत नाहीस. म्हणूनच यावर्षी व्हॅलेंटाईनला कसं व्यक्त व्हायला हवंस हे सांगण्यासाठी मी व्यक्त होऊन हे पत्र तुला लिहीत आहे. मी तर अगदी बोलून पण नेहमी व्यक्त होते. तू कधी होशील व्यक्त? 

नातं टिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गरज असते ती, विश्वासाची. कोणतंही नातं हे प्रेम आणि विश्वासावरच टिकत असतं. मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते हे तुलाही माहीत आहे. तू कितीही चुकीचा वागलास तरी रागावते चिडते पण तुझ्यावरचा विश्वास ढळू देत नाही. कदाचित म्हणूनच इतके वर्ष हे नातं टिकून आहे. या व्हॅलेंटाईनचं तुझं गिफ्ट म्हणजे हे पत्र. तू नक्की कसा आहेस आणि मला तुझ्याबद्दल इतक्या वर्षांच्या सहवासानंतर नक्की काय वाटतं हे यातून मी सांगितलं आहे. तुझ्यासाठी आतापर्यंत अनेक कविता लिहिल्या आहेत. कारण काही गोष्टी मला बोलून व्यक्त नाही करता येत त्या लिखाणातूनच व्यक्त करता येतात. पत्र संपताना तुझ्यासाठी केलेली अजून एक कविता इथे लिहून मी पत्र संपवणार आहे. तुला Valentine’s Day च्या शुभेच्छा. खूप खूप प्रेम. 

तुझीच

प्रिय…..


पाहता क्षणी तुला डोळयांत अश्रू नाही

तर गालावर हसू आलं पाहिजे

तर तुझं माझ्यावर खरं प्रेम 


भेटल्यावर मनात कटकट नाही

तर हृदयात धडधड वाढायला हवी

तर तुझं माझ्यावर खरं प्रेम


प्रेम तर सगळेच करतात

पण ते कायम निभावताना दिसायला हवं

तर तुझं माझ्यावर खरं प्रेम


आणाभाका तर सगळेच घेतात

पण त्या सांभाळायची हिंमत दिसायला पाहिजे

तर तुझं माझ्यावर खरं प्रेम


तुझ्यावर विश्वास ठेवून अतूट प्रेमाच्या बंधनात 

बांधले गेले

मग तो धागा जपून तर ठेवायला आला पाहिजे

तर तुझं माझ्यावर खरं प्रेम


दिपाली नाफडे

हेदेखील वाचा

Valentines Day: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट 

व्हॅलेंटाईनच्या खास दिवशी कसं कराल प्रपोज

20 हटके पद्धतींनी सेलिब्रेट करा व्हॅलेंटाईन डे (Valentines Day In Mumbai 2020)

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.