महाराष्ट्रात नारळाला श्रीफळाचा मान दिला जातो. नारळातील खोबऱ्याचा स्वयंपाकासाठी वापर केला जातो. एवढंच नाही तर या खोबऱ्यापासून तेलदेखील काढलं जातं. नारळाचे तेल हे प्रामुख्याने दक्षिण भारतीय आणि कोकणामधील लोकांचे मुख्य खाद्यतेल आहे. नारळाच्या तेलामध्ये अनेक पोषक आणि नैसर्गिक घटक असतात. केस आणि त्वचेसाठी सामान्यतः नारळाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का ? दररोज एक चमचा नारळाचे तेल पिण्याने निरनिराळ्या इनफेक्शनपासून तुमचा बचाव होऊ शकतो. अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी नारळाचे तेल पिण्याचा सल्ला दिला जातो. थायरॉईड ग्रंथीचे असंतुलन, कंबरदुखी, मणक्याचे काही विकार, मधुमेह अशा आजारात दररोज सकाळी उपाशीपोटी नारळाचे तेल पिण्याने नक्कीच फायदा होऊ शकतो. शिवाय नारळाचे तेल नियमित पिण्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते. सुरूवातीला जर तुम्हाला याची सवय नसेल तर नारळाचे कच्चे तेल पिणं नकोसं वाटू शकतं. मात्र दररोज एक चमचा नारळाचे तेल पिण्याची सवय लावल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो. शिवाय सरावाने ते पिणं सोपंही जातं. जर तुम्हाला नारळाचे तेल पिणं कठीण वाटत असेल तर भाज्या अथवा सॅलेडमध्ये त्याचा वापर करा. पालेभाज्या शिजल्यावर वरून नारळाचे तेल सोडा. ज्यामुळे कच्चे नारळाचे तेल तुमच्या पोटात जाईल. मात्र हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या आहार तज्ञ्जांचा सल्ला जरूर घ्या.
Shutterstock
नारळाचे तेल कसे काढतात ?
आजकाल बाजारात विविध ब्रॅंडचं नारळाचे विकत मिळते. मात्र लाकडाच्या घाण्यावर काढलेलं अथवा कोल्ड प्रेस पद्धतीने नारळाचे तेल शुद्ध स्वरूपात असते. यासाठी ओल्या अथवा सुकलेल्या नारळाचे छोटे छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे लाकडी घाण्यावर क्रश करून त्यातून तेल काढले जाते. अनेक ठिकाणी नारळाचे तेल अशा पद्धतीने घरीच काढले जाते. घरी काढलेलं अथवा लाकडी घाण्यावरील शुद्ध आणि ताजे तेल पिणे आरोग्यासाठी हितकारक असते.
Shutterstock
नारळाच्या तेलाचा वापर –
उत्तम खाद्यतेल – नारळाचे तेल सामान्यपणे स्वयंपाकासाठी वापरले जाते. पदार्थ तळण्यासाठी, फोडणीसाठी अथवा शॅलो फ्राय करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल वापरू शकता. नारळाच्या ताज्या तेलामुळे पदार्थाला एक प्रकारचा सुंगध येतो.
त्वचेसाठी- नारळाच्या तेलाने केसांवर मसाज केल्यास केसांची वाढ चांगली होते. ताणतणावातुन मुक्त होण्यासाठी रात्री झोपताना नारळाच्या तेलाचा मसाज करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते.
बाळाच्या वाढ आणि विकासासाठी – लहान बाळाला नारळाच्या तेलाने मसाज केल्यामुळे बाळाच्या हाडांची वाढ आणि विकास चांगला होतो. नारळाच्या तेलात लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं. बाळाच्या नाजूक शरीराची वाढ होण्यासाठी त्याच्या त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा होणं फार गरजेचं असतं. यासाठी तुमच्या बाळाच्या नाजूक त्वचेला नारळाच्या तेलाने मालिश करा.
वजन कमी होते – सामान्यपणे खाद्यतेलामुळे शरीरात फॅट जमा होते. ज्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते. मात्र नारळाच्या तेलात बनवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये फॅट कमी असते. ज्यामुळे तुमचे वजन आपोआप नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय नारळाच्या तेलात तयार केलेल्या खाद्यपदार्थांना एक विशिष्ठ स्वाद देखील असतो.
मेटाबॉलिझम सुधारते – नारळाच्या तेलामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते. नारळाच्या तेलाने तयार केलेल्या पदार्थांतून शरीर तितकेच बॉडीफॅट घेते जितके शरीरासाठी गरजेचे असतात. त्यामुळे इतर खाद्यतेलांपेक्षा नारळाच्या तेलात स्वयंपाक करणे तुमच्या फायद्याचे ठरते.जर तुम्ही नास्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण नारळाच्या तेलात तयार करत असाल तर याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. यामुळे तुमची वारंवार खाण्याची सवय नक्कीच मोडू शकते. नारळाच्या तेलामुळे तुम्हाला वरचेवर भुक लागत नाही. शरीराला पूरेशी ऊर्जा मिळत असल्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते.