कसा साधावा माहेर आणि सासरमध्ये समतोल

कसा साधावा माहेर आणि सासरमध्ये समतोल

प्रत्येक मुलीचं आयुष्य लग्नानंतर बदलतं. त्यातीलच महत्त्वाचा बदल म्हणजे लग्न झाल्यानंतर सासर-माहेर यामध्ये समतोल बाळगणं. तर सर्वात द्विधा मनस्थिती निर्माण करणारी गोष्ट म्हणजे माहेर आणि सासरमध्ये ताळमेळ साधणं. लग्नानंतर बऱ्याचदा मुलीची अर्धी एनर्जी सासर आणि माहेर यांच्यामधील गैरसमज दूर करण्यात निघून जाते. तिला सतत हीच भीती असते की, सासरी झालेल्या एखाद्या छोट्याश्या चुकीनेही सासरकडचे तिच्या आईबाबांना दोष देतील. त्यामुळे तिला दोन्ही कुटुंबांच्या बाबतीत बरेचदा सामंजस्याने वागावं लागतं. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन #POPxoMarathi काही गोष्ट तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करू इच्छितं. ज्यामुळे तुम्ही सासर आणि माहेरच्यांना जवळ आणू शकता.

Instagram

  • दोन्ही परिवारांचा मेळ आवश्यक

अनेकदा असं होतं की, विनाकारण दोन्ही कुटुंबात छोटे छोटे गैरसमज निर्माण होतात. जसं लग्नाच्या शॉपिंग किंवा अगदी लग्नाचा मेन्यू ठरवणं यावरूनही गैरसमज होतात. उगाच तणाव निर्माण होतो. जे दूर करणं कठीण जातं. त्यामुळे काही दिवसांच्या अंतराने माहेर आणि सासरच्या लोकांची भेट नक्की घडवून द्या. या भेटीदरम्यान निसंकोचपणे एकमेकांतील गैरसमज दूर करा. तुम्ही आणि तुमच्या नवऱ्याने पुढाकार घेऊन ते दूर करा. ज्यामुळे दोन्ही कुटुंबात सलोख्याचे संबंध राहतील. 

  • दोन्ही कुटुंबाना द्या समान मान 

कधीही सासर आणि माहेरच्यांमध्ये भेदभाव किंवा तुलना करू नका. एकसारखाच मान-सन्मान द्या. ज्यामुळे त्यांच्या मनातही भावना निर्माण होईल की, तुम्ही दोन्ही कुटुंबाना समान महत्त्व देता. 

  • सणावाराच्या निमित्ताने गाठीभेटी 

सासर असो वा माहेर असो घरातील सणसमारंभाला दोन्ही कुटुंबाची भेट होऊ द्यावी. ज्यामुळे समोरासमोर भेट झाल्याने आपापसात चांगला वेळ घालवला जातो आणि संवादही निर्माण होतो. दोन्ही कुटुंबाना घेऊन जेवणाचा प्लॅन करा किंवा पिकनिक प्लॅन करा. ज्यामुळे दोन्ही कुटुंबातील दुरावा कमी होईल. 

  • योग्य वेळ साधा

जर तुम्हाला असं वाटत असेल की, माहेर आणि सासरच्यांमध्ये काही भांडण आहे. तर त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. योग्य वेळेची वाट पाहा. दोन्हीकडचं ऐकून घ्या आणि आपापसातील संमतीने एकत्र बसून समस्या सोडवा.

  • गोष्टी सांभाळून घेणं शिका

जर तुम्ही सासर आणि माहेरच्यांसोबत बसला आहात आणि तुम्हाला वाटलं की, एखाद्या गोष्टीवरून त्यांच्यात एकमत झालं नाहीयं. तर तेव्हा ती गोष्ट टाळून एखाद्या दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधा. नंतर शांतपणे त्यावर चर्चा करा. गोष्टी शेवटच्या थराला जाऊ देऊ नका.

Instagram

असं म्हणतात की, मुलगी लग्न झाल्यावर परक्याचं धन होते. पण आता काळ बदलला आहे. आज मुली आपल्या आईबाबांचा आणि सासूसासऱ्यांचाही आनंदाने संभाळ करतात. खरंतर मुलगी आता लग्नानंतर दोन कुटुंबाना जोडणारा धागा बनते. ती दोन्ही कुटुंबाना जोडून ठेवू शकते आणि प्रत्येक कुटुंबात वाद होणं साहजिक आहे पण ते सोडवून संवाद साधणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आनंदी राहा, सकारात्मक विचार करा. ज्याने तुम्ही आणि तुमचं कुटुंबही खूष राहील.