स्वतःची काळजी घेण्यासाठी करा हे सोपे उपाय

स्वतःची काळजी घेण्यासाठी करा हे सोपे उपाय

स्वतःची  काळजी अथवा सेल्फ केअर हे शब्द आपण नेहमीच ऐकतो. मात्र प्रत्यक्षात मात्र स्वतःची काळजी घेण्याकडे  नेहमीच दुर्लक्ष करतो. मानसशास्त्र असं सांगतं की, स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणं. बऱ्याचदा महिला इतरांची अथवा कुटूंबाची, सहकाऱ्यांची काळजी घेता घेता स्वतःच्या आरोग्य, इच्छा, महत्वकांक्षेकडे दुर्लक्ष करतात. मात्र असं केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर नकळत विपरित परिणाम होत जातो. शिवाय जर तुम्हीच मनातून दुःखी असाल तर तुम्ही इतरांना आनंदी कसं ठेवणार. म्हणूनच शरीरासोबतच तुमच्या मनाची आणि भावनांची काळजी कशी घ्यायची हे जरूर वाचा. आश्चर्य म्हणजे या टिप्स फॉलो  करण्यासाठी तुम्हाला एका पैशाचाही खर्च करावा लागणार नाही. 

श्वसनावर नियंत्रण ठेवा -

आपल्याला आपला श्वास सुरू आहे याचाच बऱ्याचदा विसर पडतो. मात्र लक्षात ठेवा आपलं जीवन हे या श्वासावर सुरू आहे. म्हणूनच श्वासावर नियंत्रण ठेवण्याची  कला आपल्याला अवगत करता आलीच पाहीजे. जर तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवता आले तर तुमच्यासाठी भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अगदी सोपं आहे. राग, चिडचिड, मूडस्वींग अशा अनेक गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमचं श्वसन सुधारणं फार गरजेचं आहे. योगासने, प्राणायम आणि मेडिटेशनचा सराव केल्यामुळे तुम्हाला तुमच्या श्वसनावर नियंत्रण ठेवता येतं. यासाठीच दिवसभरात कमीतत कमी अर्धा तास यासाठी द्या. ज्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक समस्या आपोआप दूर होतील. शिवाय यासाठी कोणताही खर्च करण्याची तुम्हाला गरज नाही. 

Shutterstock

डायरी लिहिण्याची सवय लावा -

तरूणपणी अनेकजणी नक्कीच डायरीत आपल्या भावना लिहीत असतात. चारोळ्या, कविता, मनाशी केलेला संवाद डायरीत लिहिण्यामुळे तुमच्या मनातील निराशाजनक विचारांचा निचरा होतो. शिवाय डायरीमधून स्वतःबद्दल, मदत करणाऱ्या लोकांबद्दल सहज कृतज्ञता व्यक्त करता येते. स्वतःची काळजी  घेण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. यासाठीच पुन्हा तुमच्या डायरी लिहिण्याच्या सवयीला चालना द्या.

सोशल मीडियाचा वापर कमी करा -

अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की सोशल मीडियाच्या वापरामुळे मनावर नकळत विपरित परिणाम होत असतात. जर तुम्ही नैराश्यात असाल अथवा एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला सतावत असेल तर अशा वेळी सोशल मीडिया पासून शक्य तितकं दूर राहा. खरंतर सोशल मीडियावरील सर्वच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही. त्यामुळे इतरांना सेलिब्रेट करताना पाहून मुळीत दुःखी होऊ नका. त्यापेक्षा अशा गोष्टींपासून  दूर राहा आणि स्वतःच्या आनंदांची काळजी घ्या. 

Shutterstock

झोप घेण्याची टाळाटाळ करू नका -

दिवसभराची दगदग, कामाची चिंता, नात्यातील ताणतणाव काहिही असलं तरी  झोप घेण्याची टाळाटाळ मुळीच करू नका. निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाल कमीत कमी आठ तास झोपणं फारच गरजेचं आहे. जर तुम्हाला आठ तासांची गाढ झोप मिळत नसेल तर तुम्हाला तुमच्या दिनक्रमात बदल करण्याची गरज आहे. कारण अपुऱ्या झोपेचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. यासाठीच लवकर झोपा आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करा. 

नियमित व्यायाम करा -

व्यायाम आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तर तुम्हाला  माहीतच असेल. म्हणूनच दररोज कमीत कमी अर्धा तास अथवा आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे असे व्यायाम करून तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. 

कृतज्ञता व्यक्त करा -

सकारात्मक विचार करण्यासाठी दररोज कृतज्ञतेची सवय स्वतःला लावणं गरजेचं आहे. वास्तविक आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सवयीयमुळे या गोष्टी तुमच्या सहज लक्षात येतात. कृतज्ञतेमुळे तुमचे मन आनंद आणि सकारात्मक विचारांनी भरून जाते. यासाठी दररोज सकाळी उठल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावा. 

दिवसभरात स्वतःसाठी थोडासा वेळ काढा -

दिवसभरातील कामं आणि टार्गेट यांच्यावर आपण एवढं लक्ष देतो की कधी कधी यामुळे आपल्या स्वतःकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. मात्र दिवसभरात कमीत कमी दहा मिनीटे स्वतःसाठी जरूर काढा. स्वतःचे छंद जपण्यासाठी, एखादं आवडतं पुस्तक वाचण्यासाठी, एखादं आवडतं गाणं गुणगुणण्यासाठी किंवा अगदी स्वतःचा आवडता पदार्थ करून खाण्यासाठी थोडासा वेळ तुम्ही नक्कीच काढू शकता. ज्यामुळे तुमच्या मनातील भावना आनंदी आणि समाधानाच्या होतील. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

आनंदी जीवन जगण्यासाठी या '10' गोष्टी अवश्य करा

तुमच्या भावनांचा तुमच्या आरोग्यावर होतो हा परिणाम

वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स (Quotes On Happiness)