महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराबाबत जाणून घ्या 'या' रहस्यमय गोष्टी

महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराबाबत जाणून घ्या 'या' रहस्यमय गोष्टी

महाशिवरात्र संपूर्ण भारतात अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. असं म्हणतात की ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन देवांमुळे सृष्टीची निर्मिती झाली. सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय अशी सुंदर व्यवस्था यांच्या मार्फेत राखली जाते. आजच्या आधूनिक काळात आणि वैज्ञानिक युगात सृष्टीच्या निर्मितीवर विविध संशोधने जरी सुरू असली तरी या पौराणिक कथेचे महत्त्व आजही नाकारता येत नाही. त्यामुळे आजही या तिनही देवतांची उपासना मोठ्या श्रद्धेने केली जाते. शिवशंकराचे भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी कडक उपवास आणि रात्री जागरण करून रात्र जागवतात. खरंतर शिवरात्र प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशी येते मात्र माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असं म्हणतात. उत्तर भारतीयांमध्ये हा दिवस फाल्गुन महिन्यात येतो तर इंग्रजी महिन्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात महाशिववरात्र असते. शिवभक्तांसाठी या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच भगवान शिवशंकराबाबत या काही गोष्टी प्रत्येकाला माहीत असायलाच हव्या. या गोष्टी पौराणिक कथामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे यावर विश्वास ठेवणं हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. 

शंकराचा तिसरा डोळा आणि प्रलय

पुराणकथा असं सांगतात की, भगवान शिवशंकराला तीन डोळे आहेत.  म्हणूनच शंकराला ‘त्रिलोचन’ म्हणजेच ‘तीन डोळे असलेला’असंही म्हणतात. मात्र शंकराचा तिसरा डोळा नेहमीच बंद असतो आणि तो जेव्हा उघडतो तेव्हा प्रलय येतो असं म्हटलं जातं. भगवान शंकराने कधीच तिसरा डोळा उघडू नये असं भक्तांना नेहमीच वाटत असतं.

शिवशंकर का आहेत भोलानाथ

भगवान शिवशंकर स्वभावाने फार भोळे आहेत असं पुराणात सांगितलं आहे. ज्यामुळे शंकर त्यांच्या या स्वभावामुळे कोणालाही सारासार विचार न करता वर देत असत. ज्याचा दैत्य नेहमी फायदा घेत असत. पुढे इतर देवांना त्यांचे चातुर्य वापरून यापासून सुटका करून घ्यावी लागत असे. म्हणूनच शंकराला भोलानाथ असे म्हणतात.

 

शिवशंकराचे तांडवनृत्याचे रहस्य

बऱ्याच लोकांना नटराजाच्या मुर्तीचे महत्त्व नक्कीच माहीत नसतं. जे लोक नृत्याची उपासना करतात त्यांच्या घरी नटराजाची मुर्ती असतेच. नटराजाची मुर्ती शिवशंकराच्या नृत्य मुद्रेचं दर्शन घडवते. या नृत्याची दोन रूपं आहेत. एकातून शंकराचा क्रोध (तांडव नृत्य) तर दुसरं रूप शंकराचं आनंद (तांडव नृत्य) दर्शन घडवतो. म्हणूनच क्रोधाचं दर्शन घडवणाऱ्या शंकराला ‘रूद्र’ तर आनंदाचं दर्शन घडवणाऱ्या रूपाला ‘नटराज’ असं म्हणतात. 

Shutterstock

श्रावण महिना आणि शिवशंकर -

एका पौराणिक कथेनुसार शिवशंकर श्रावणात सासरी म्हणजेच पृथ्वीवर अवतरले होते. म्हणूनच श्रावणात श्रावणी सोमवार मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिवाय या महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवशंकराला शिवमूठही वाहिली जाते. ज्यामध्ये विविध धान्यांचा समावेश असतो. 

शिवशंकराला दोन नाही तर एकूण सहा मुलं आहेत -

शिवशंकराला गणपती बाप्पा आणि कार्तिकेय अशी दोन मुलं आहेत हे सर्वांना माहीत आहे. मात्र पुराणात शंकराच्या आणखी चार मुलांचे संदर्भ  मिळतात. ज्यांची नावे सुकेश, जलंधर, अयप्पा आणि भूमा अशी आहेत. 

Shutterstock

शिवशंकर आणि 12 ज्योतिर्लिंग -

शिवपूराणात अनेक प्राचीन कथांचे संदर्भ आढळतात. ज्यामध्ये भगवान शंकराचे वास्तव्य असलेली काही ठिकाणे आहेत. आज ही ठिकाणे बारा ज्योतिर्लिंग या नावाने प्रचलित आहेत. ज्यामध्ये सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओमकारेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर, विश्वनाथजी, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ आणि घृणेश्वर यांचा समावेश आहे. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खास शुभेच्छा (Happy Mahashivratri Wishes In Marathi)

महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या 'या' पौष्टिक रेसिपी

महाशिवरात्र - महाराष्ट्रातील कोणती आहेत खास प्राचीन शिवाची मंदिरे