एखाद्या स्त्रीसाठी आई होण्याचा आनंद हा सर्वात मोठा आनंद असतो. ही गूडन्यूज मिळाल्यानंतर प्रत्येक स्त्री आपल्या होणाऱ्या बाळासाठी योग्य आहार आणि आरोग्याची अधिक काळजी घेऊ लागते. पण जस जसे दिवस महिन्यांमध्ये बदलतात तसतसे त्या स्त्रीला गरोदरपणात काही त्रासही होऊ लागतात. आता त्रास म्हटल्यावर घाबरुन जाण्यासारखे असे काही नाही. काही त्रास असे असतात की, जे प्रत्येक स्त्रीला सहन करावे लागतात. त्यापैकीच एक त्रास आहे तो म्हणजे ‘बद्धकोष्ठता’. बद्धकोष्ठतेचा त्रास साधारण पहिल्या 3 महिन्यामध्येच गरोदर महिलेला जाणवू लागतो. पण याला घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठतेची कारणं तुम्हाला माहीत हवीत. ती तुम्हाला कळली की, बद्धकोष्ठतेवर काय सोपे उपाय करता येतील हे देखील तुम्हाला कळेल. म्हणूनच आई होणाऱ्या महिलांसाठी आजचा विषय फार महत्वाचा आहे. जाणून घेऊया बद्धकोष्ठता कारणे आणि बद्धकोष्ठता उपाय. मग करुया सुरुवात
बद्धकोष्ठतेचा त्रास हा गरोदरपणात होणे हे स्वाभाविक आहे हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. पण गरोदरपणातील बद्धकोष्ठतेच्या कारणांबाबत अधिक सविस्तरपणे आपण जाणून घेऊया.
स्त्रियांमध्ये ठराविक वयांमध्ये शरीरात बदल व्हायला सुरुवात होते. मासिक पाळी येण्याची सुरुवात झाली की, त्यांच्या शरीरात बदल होऊ लागतात. शरीरातील हार्मोन्स बदलू लागतात. प्रत्येक मुलीचे शरीर वेगळे दिसायला लागते. गरोदरपणातही महिलांच्या शरीरात असेच बदल होतात. हा बदल तुमच्या पचनसंस्थेवरही परिणाम करतो. गरोदरपणात ‘प्रोजेस्टेरॉन’ नीवाचे हार्मोन्स पचनावर परिणाम करते आणि त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होण्यास या काळात सुरुवात होते.
वाचा - प्रेगन्सीमध्ये कशी घ्याल तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी
गरोदरपणात प्रत्येक महिलेला योग्य प्रमाणात पोषकतत्वे मिळावी म्हणून काही औषधे दिली जातात. यामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांचा, डोसचा समावेश असतो. अशा गोळ्यांचा सेवनामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. त्यामुळे शौचाला कडक होते. रक्त वाढण्यासाठी दिलेल्या या गोळ्या तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतात आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो.
गरोदरपणात साधारण तीन महिन्यानंतर पोट दिसू लागते. शरीराचा आकार बदलू लागतो. वाढत्या वजनामुळे तुम्हाला सतत पोट भरल्यासारखे वाटते. सतत शरीर जड वाटत राहते. गर्भाशयावर सतत दाब निर्माण होतो. हा दाब लघवीच्या जागीही निर्माण होतो. पाण्याचे सेवन कमी केले तर आपोआपच पोटात खडे होतात आणि मग बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो.
वाचा - ‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा
इतरवेळी आपण चालतो, धावतो सतत काम करतो त्यामुळे आपसुकच तुमची हालचाल होते. पण गरोदरपणात तसे होत नाही. तुमच्या शारीरिक क्रिया इतक्या मंदावलेल्या असतात साहजिकच तुमच्या आतड्यांची हालचाल मंदावते. त्यामुळे तुमचे पोट साफ होण्याची क्रियाही मंदावते. तुमच्या आतड्यांमधून तुमचे मल बाहेर निघण्यास अडथळा निर्माण होतो. आणि त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो.
पाळी येण्याच्या आधी अनेक महिलांना पोट फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे पोट फुगणे काय असते हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल. जेव्हा तुमची मासिक पाळी चुकते आणि तुम्ही आई होणार हे नक्की होते. तेव्हा तुम्हाला अशीच पोट फुगल्याची जाणीव होते. जसंजसे दिवस जातात तसे तुम्हाला तुम्ही खाल्लेले अन्न पचायला फार वेळ घेत आहे याची जाणीव होऊ लागते. अन्न पचनासाठी लागणारा वेळ बद्धकोष्ठतेमध्ये बदलतो.
ही काही कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो.
गरोदरपणात होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास हा टाळता येत नाही. पण तो हमखास कमी करता येतो. डॉक्टर तुम्हाला काही गोष्टी सांगतीलच. पण आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे अगदी साधेसोपे आणि कोणताही त्रास देणारे नाहीत. त्यामुळे आता जाणून घेऊया बद्धकोष्ठता उपाय
तुमच्या शरीरात फळं जायला हवीत हे अगदी सगळ्यांनाच सांगितले जाते. गरोदरपणात तुमच्या शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राहावे म्हणून तुम्हाला फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही फळांचे सेवन केले तर तुमच्या पोटात खडे होणार नाही. शौचाला साफ होण्यास मदत होईल. आता तुम्हाला फळ खाण्याचा सल्ला आम्ही दिला असला तरीदेखील तुम्ही काही फळं या दिवसात खाऊ नका असे सांगितले जाते. यामध्ये पपई, फणस, अननस अशी काही फळं खाऊ नका असे सांगितले जाते. या फळांमध्ये उष्णता असल्याचे सांगितले जाते. या दिवसात तुम्ही सफरचंद, आंबा, पेरु, चिकू, केळी, द्राक्ष अशी फळ खाऊ शकता.
फळांसोबतच तुम्हाला पाणी आणि रसांचे सेवन करणे जास्त गरजेचे असते. तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर तुमच्या शरीरातून मल बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फळांचे रस, पाणी यांचे सेवन अधून मधून करत राहा. गरोदरपणात पोट सतत भरल्यासारखे वाटते ही गोष्ट खरी असली तरी तुम्हाला या काळात द्रव्य पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे असते. त्यामुळे तुम्ही याचे सेवन तासा तासाला करा. शरीराला योग्यवेळी पाणी पिण्याची किंवा फळांचा रस पिण्याची सवय लावून घ्या.
अनेकदा महिलांना गरोदरपणात काहीच खावेसे वाटत नाही. काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्याशा वाटतात असे असले तरी देखील या दिवसात तुम्ही चांगले खाणे आवश्यक असते. तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात असायला हवे. डाळी, भाज्या, पालेभाज्या, कडधान्य, गहू यांचा समावेश असायला हवा. एकूणच तुमचा आहार चौकस असेल तर तुम्हाला शौचाला साफ होईल आणि बद्धकोष्ठतेचा त्रास अजिबात होणार नाही.
खाण्याच्या सवयीतही तुम्हाला या कालावधीत थोडा बदल करावा लागतो. या दिवसात तुम्हाला योग्य आहार घ्यायचा तर असतोच. पण खाताना तुम्हाला अन्न चावून आणि अगदी सावकाश खायचे आहे. म्हणजे तुम्ही दिवसातून कितीही वेळा खा. पण हळूहळू खा. याचे कारण इतकेच आहे की, इतर दिवसांसारखी तुमच्या शरीराची स्थिती आता नाही. यामध्ये बदल झालेले असतात. त्यामुळे तुम्ही एकदम खाऊ नका. खाण्याचे भाग करा. थोड्या थोड्यावेळाने आणि थोडे थोडे खा. त्यामुळे तुमचे अन्न पचण्यास मदत होईल आणि बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला होणार नाही.
बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला असह्य असेल. सगळे इलाज करुनही तुम्हाला शौचाला साफ होत नसेल तर तुम्ही पोट साफ करणारी औषधे घेतली तरी चालतात. पण तुमच्यासाठी योग्य औषधे कोणती ही देखील तुम्हाला डॉक्टरच अधिक योग्यपद्धतीने सांगू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन तुम्ही शौचाला होणारी औषधे घ्या. तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून थोडा आराम केला.
गरोदरपणात तुम्ही अॅक्टीव्ह राहणेही फार महत्वाचे असते. आता अॅक्टिव्ह राहणे म्हणजे तुम्ही धावा असा आम्ही सल्ला देणार नाही. कारण ते चांगले नाही. एकाच जागी सतत बसून राहण्यापेक्षा उठा थोडे चाला. प्राणायाम, योगा असे सोपे करा. तुमच्या शरीराची हालचाल असू द्या. गरोदरपणात तुम्ही नेमका कोणता व्यायाम करावा हे देखील तुम्ही जाणून घ्यायला हवा. हल्ली अनेक ठिकाणी खास आई होणाऱ्या महिलांसाठी क्लासेस घेतले जातात. याची योग्य माहिती घेऊन घरी व्यायाम करणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी जा.
शरीरातील कॅल्शिअमचेप्रमाण कमी होण्याची शक्यता गरोदरपणात असते. साधारण पंचविशीनंतर महिलांच्या शरीरातील कॅल्शिअम कमी होऊ लागते. करिअर आणि कामाच्या ताणात हल्ली अनेक महिला उशीराच आई होण्याचा निर्णय घेतात. हा उशीरा निर्णय घेणेही तितकेच त्रासदायक असते. शरीराला कॅल्शिअम योग्य प्रमाणात मिळेल याकडे लक्ष द्या.दूध, चीझ, दही, मासे यांचे योग्य प्रमाणात तुम्ही सेवन करा तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.
तुम्हाला पाणी पिणे किंवा द्रव्य पदार्थांचे सेवन करणे किती गरजेचे आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलेच. त्यात आणखी भर म्हणून तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर लिंबू पाणी आणि कोरफडीचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. लिंबू पाणी आणि कोरफडीचा रस तुमचा पचनाचा वेग वाढवतो. तुम्हाला या दिवसात होणारा पचनाचा त्रास कमी करते तुमचे अन्न योग्य पद्धतीने पचल्यामुळे तुम्हाला शौचाला साफ होते.
गरोदरपणात अनेकदा काहीही खाण्याची इच्छा नसते. सतत चीडचीड होत राहते. (काहींच्या बाबतीत कदाचित असे होत नसेल) पण अनेकदा असे होते की, खाण्याचा कंटाळा असतो. पण तुम्ही काय खाता किती खाता हे तुम्हाला आणि बाळाला पुरेसे आहे की नाही हे देखील तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच तुमचा आहार परिपूर्ण ठेवा. आता तुम्ही कोणताही डाएट करत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे अगदी भरपेट आणि योग्य जेवा. जर तुमचा आहार पूर्ण असेल तर तुमच्या आतड्यांचे कार्य अगदी सुरळीत राहील आणि तुम्हाला बद्धकोष्ठता होणार नाही.
खूप जणांना गरोदरपणातच नाही तर इतरवेळीही लघवीला किंवा शौचाला जाण्याचा कंटाळा असतो. टाळाटाळ करुन ते आलेली वेळ मारुन नेतात. गरोदरपणातही असेच काहीसे होते. लघवीला किंवा शौचला जायचे असते पण कंटाळा करुन ही वेळ मारुन नेली जाते. शिवाय पोट फुगल्यासारखे वाटते असे वाटून अनेक जण जातच नाही. ही सवय तुम्ही बदलायला हवी. तुम्ही सतत वॉशरुममध्ये जात असाल आणि तुम्हाला काहीच होत नसेल तरी कंटाळा करु नका. कारण तेवढीच तुमची हालचाल होईल.
या बद्धकोष्ठता उपाय यांचा उपयोग करुन तुम्ही बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करु शकता.
1. गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठतेचा त्रास हानिकारक असतो का?
बद्धकोष्ठतेचा त्रास खूप झाला तर मात्र हा त्रास सहन करण्याच्या पलीकडे निघून जातो. बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक झाल्यानंतर तुमच्या शौचाच्या जागेतून रक्त पडू लागते. जर तुम्हाला या ठिकाणी जखम झाली तर फार लक्ष देता येत नाही. आधीच शरीरात झालेल्या बदलांचा महिलेला त्रास होत असतो. त्यामुळे याचा त्रास होतो. पण तो हानिकारक होईपर्यंत तुम्ही थांबू नका.
2. बद्धकोष्ठतेचा त्रास साधारण कितव्या महिन्यात सुरु होतो?
साधारण तिसऱ्या महिन्यात बद्धकोष्ठतेचा त्रास हा गरोदरपणात सुरु होतो. त्यानंतर हा त्रास होत असला तरी याची सुरुवात ही तिसऱ्या महिन्यापासून होते. कारण तिसऱ्या महिन्यापासून तुमच्या शरीरात बदल होऊ लागतात. तुमचे पोट मोठे दिसू लागते. शरीरातील या बदलाचा परिणाम तुमच्या पचनावर होऊ लागतो आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो.
3. बद्धकोष्ठतेचा त्रास गरोदरपणात होणे स्वाभाविक आहे का?
हो, बद्धकोष्ठतेचा त्रास गरोदरपणात होणे अगदी स्वाभाविक आणि सर्वसाधारण आहे. असा त्रास झाल्यास घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. कारण हा त्रास तुम्हाला अगदी सहज कमी करता येऊ शकतो. पोट साफ होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही योग्य औषध घेतली आणि वेळोवेळी पोट साफ राहण्यासाठी पाणी, फळांचे सेवन केले तर तुम्हाला हा त्रास अगदी सहज टाळता येऊ शकतो.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.