सकाळच्या नाश्त्याला निवडा तांदळाच्या उकडीचा झटपट पर्याय

सकाळच्या नाश्त्याला निवडा तांदळाच्या उकडीचा झटपट पर्याय

सकाळी रोज नवा आणि पौष्टिक असा काय नाश्ता करायचा हा सगळ्यांना नेहमी पडलेला प्रश्न. सतत पोहे, उपमा, इडली आणि वडा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर सकाळच्या घाईत झटपट होणारा आणि पौष्टिक असा नाश्ता म्हणजे तांदळाची उकड अथवा ताकातली उकड. हा अतिशय सोपा आणि चविष्ट नाश्ता तुम्ही सकाळी पोटभर खाल्ला की लवकर भूकही लागत नाही आणि पोट बराच वेळ भरल्यासारखेही वाटते. त्याशिवाय नेहमीच्या नाश्त्यापेक्षा थोडी आंबट तिखट चवदेखील तुमचा मूड बदलून टाकते. तोच तोच नाश्ता टाळायचा असेल तर तुम्ही नक्की सकाळी हा नाश्ता तयार करून पाहा. तुम्हाला नक्कीच चवीला हा आवडेल आणि बनवायलादेखील तितकाच सोपा आहे. त्याशिवाय याची चव तुम्हाला नक्कीच या नाश्त्याच्या प्रेमात पाडेल.  अगदी साध्या साहित्यापासून हा नाश्ता बनवला जातो आणि त्याचीही चवही अप्रतिम असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा नाश्ता तयार होतो तो अगदी 10 मिनिट्समध्ये. त्यामुळे तुम्हाला जास्त कोणताही साग्रसंगीत पसारा घालून बसावा लागत नाही. अगदी घरी एखादे पाहुणे न सांगता आले तरीही झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे. पावसाळ्यात तर हा गरमागरम नाश्ता खायला अधिक मजा येते. जाणून घेऊया या नाश्त्यासाठी काय साहित्य लागतं आणि कशी तयार करायची उकड 

सकाळचा नाश्ता न केल्यास होऊ शकतात हे साईड इफेक्ट्स

उकड करण्यासाठी लागणारे साहित्य

उकड करण्यासाठी अगदी घरात नेहमी असणारेच साहित्य लागते. फक्त बऱ्याचदा तांदुळ पिठी घरात नसेल तर ती तुम्हाला उपलब्ध करून घ्यायला हवी. 

 • 1 कप तांदूळ पीठ
 • 1 कप दही
 • 5-6 लसूण पाकळ्या
 • अर्धा कप पाणी 
 • 3-4 हिरव्या बारीक कापलेल्या मिरच्या 
 • आल्याचे बारीक तुकडे 
 • चवीनुसार मीठ
 • कोथिंबीर

फोडणीसाठी 

 • तेल
 • मोहरी
 • जिरे
 • हिंग
 • हळद 
 • कडिपत्ता

सकाळच्या नाशत्याला असतील हे पदार्थ तर वाढणार नाही तुमचं वजन

उकड कशी तयार करावी

Instagram

स्टेप 1 - एका भांड्यात दही घालावे. ते घुसळून त्याचे पाणी घालून ताक करावे. त्यामध्ये तांदूळ पीठ,  मीठ, आलं-लसूण-मिरची (एकत्र ठेचून) घालून नीट गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण जास्त पातळ अथवा जास्त जाड असणार नाही याची काळजी घ्यावी.  यामध्ये पाणी अति प्रमाणात घालू नये. त्याचप्रमाणे मीठ घातल्यानंतर त्या मिश्रणाची चव व्यवस्थित घेऊन पाहावी. मीठ कमी वाटल्यास, त्यामध्ये पुन्हा घालावे. 

स्टेप 2 - एका कढईत साधारण दोन ते तीन चमचे तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता, हळद घालून त्यावर लगेच वरील तयार मिश्रण ओतावे आणि लगेच ढवळून त्यावर झाकण ठेवावे. अन्यथा ताक अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेच झाकून ठेवावे. गॅस मंद आचेवर ठेवावा.

स्टेप 3 - साधारण पाच ते सात मिनिट्स झाल्यानंतर झाकण काढावे आणि मिश्रण ढवळावे. ही उकड जास्त घट्ट अथवा जास्त पातळ होऊ देऊ नये.  त्यानंतर वरून चिरलेली कोथिंबीर घालावी.

टीप - उकड खायला देताना त्यावर अर्धा चमचा कच्चे तेल घालावे.  हे मिक्स करून खावे. याची चव अप्रतिम लागते. तसंच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आंब्याचे लोणचे अथवा फोडणीच्या मिरचीसह ही उकड खाऊ शकता. उकड गरम गरमच खावी. थंड झाल्यानंतर त्याची चव जास्त चांगली लागत नाही. त्याचप्रमाणे कढईमध्ये जर ताक आणि तांदुळाची करवड राहिली असेल तर ती अधिक चविष्ट लागते. 

सकाळच्या घाईत झटपट बनवा टेस्टी नाश्ता, जाणून घ्या रेसिपीज

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.