घरी पूजा असली की, हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे प्रसादाचा शिरा. इतरवेळी केला जाणारा शिरा आणि खास पूजेवेळी बनवला जाणारा शिरा काहीही म्हणा वेगळाच लागतो. तसा शिरा खाल्ल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा शिरा खाण्याची इच्छा होत नाही. तुम्ही ही अगदी तशाच प्रकारचा शिरा करुन पाहिला असेल आणि तुमचा प्रयोग फसला असेल तर तुमच्याकडून काही टिपिकल चुका होत असतील. मी जेव्हा पहिल्यांदा काही पद्धती अवलंबून शिरा केला त्यावेळो तो इतका चांगला झाला नाही. पण नंतर माझ्या चुका लक्षात आल्यानंतर मी खास पद्धतीने शिरा करुन पाहिला आणि तो छान जमला… अगदी तसाच जसा मला हवा होता. तुम्हालाही शिरा तसाच परफेक्ट व्हायला हवा असेल तर तुम्ही या टीप्स फॉलो करुन पाहा.
प्रसादाचा शिरा तुम्ही सगळ्यांनीच कधीतरी बनवला असेल. यासाठी लागणारे साहित्य ही सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहीत असते.
जर तुम्ही घरी चार जणांसाठी शिरा बनवत असाल तर तुम्हाला एक वाटी बारीक रवा,1 ½ वाटी साजूक तूप, ½ वाटी साखर,2 वाट्या दूध, दोन वाट्या पाणी एखादं पिकलेलं केळ, जायफळ पूड, वेलची पावडर,आवडीनुसार ड्रायफ्रुट (मनुके, बदामाचे काप,चारोळ्या,काजू) हे साहित्य तुमच्यासाठी पुरेसे आहेत.
आता तुम्हाला तुमच्या गरजेनुसार हे प्रमाण वाढवायचे आहे.
आता मला जी पद्धत आवडली त्यामध्ये एका पिकलेल्या केळ्याचा वापर केला जातो. ती तुम्हाला मी आज सांगणार आहे. पण तुम्हाला केळं नको असेल तर तुम्ही ते वगळले तरी चालेल.
सगळ्यात आधी एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करा. त्यामध्ये केळ्याचे तुकडे छान तळून घ्या. केळं पिकलेलं असल्यामुळे ते छान मऊ पडतं ते तुम्ही बाजूला काढून ठेवा. किंवा गॅस मंद करुन तसेच ठेवा.
शिऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो रवा. तुम्ही रवा छान भाजला तरच तो फुलतो आणि तो फुलला तरच छान लागतो. तूपात आता रवा टाकण्याची वेळ आली आहे. रवा घातल्यानंतर तुम्हाला तो सतत परतत राहावे लागते. जर रवा एकाच जागी भाजत राहिला तर तो जळण्याची शक्यता असते.
एका बाजूला रवा भाजत असताना तुम्हाला दोन वाट्या दूध आणि पाणी एकत्र करुन गरम करायला ठेवावे.
रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये उकळलेले दूध घालावे. गरम दूध घातल्यामुळे रवा फुलण्याची प्रक्रिया पटकन होते.
शिरा छान फुलून आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये वेलची पूड किंवा जायफळ पूड घालायची आहे. याच दरम्यान तुम्ही ड्रायफ्रुट घालू शकता. जर तुम्ही तूपात ड्रायफ्रुट परतून घेतले तर उत्तम. पण ते फार जाळू नका.
शिरा छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला साखर घालायची आहे. साखर तुम्ही परतून घेतली नाही तरी चालेल.
झाकण बंद करुन तुम्हाला साखर छान विरघळू द्यायची आहे. या सगळ्यावेळी तुमचा गॅस मंद हवा. साखर विरघळल्यानंतर तुमच्या शिरा छान लाईट,ओलसर होतो.
प्रसादाचा शिरा हा रव्याचा बनवला जातो. शिऱ्यासाठी आपण नेहमी बारीक रवा वापरावा. जर तुम्ही जाड रवा वापरत असाल तर शिरा झाल्यानंतर तो चवीला तितकासा चांगला लागत नाही. तुम्हाला दाताखाली जाडं भरडं आल्यासांरखे काहीतरी वाटत असेल.
दूधाचा उपयोग करताना तुम्हाला त्यामध्ये पाणी घालणंही गरजेचे असते. कारण नुसते दूध घालते तर त्यात फक्त दुधाची चव येईल.
अनेकांना रवा भाजला की नाही ते कळत नाही. पण रवा चांगला भाजला असेल तर त्याचा रंग गुलाबी होतो. पण हा एकसारखा भाजला जावा असे वाटत असेल तर गॅस मंद ठेवा. रवा भाजण्याचा कालावधी हा नेहमीच थोडा जास्त असतो त्यामुळे थोडा संयम ठेवा कारण त्यामुळेच तुमचा शिरा चांगला होईल.
तूप आणि डालडा यामध्ये बराच फरक आहे. अनेक जण बजेटमध्ये काम करण्यासाठी डालड्याचा वापर करतात पण असे करु नका. डालडा आणि तूपाची चव ही फारच वेगळी असते. जर तुम्हाला खूप तूप वापरणे शक्य नसेल तर तुम्ही कमी तूप वापरा चालेल पण तुपाची चव ही तुपाची असते.
रवा फुलवण्यासाठी एक वाटी रवा तर चार वाट्या दूध लागते. पण दुधाऐवजी आम्हाला दोन वाट्या दूध आणि दोन वाट्या पाणी हे महत्वाचे वाटते.
जर तुम्हाला केशर, केवडा किंवा गुलाबपाणी असे काही इसेन्स वापरायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये घालू शकता.
आता शिरा करताना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा शिराही एकदम परफेक्ट होईल.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.