लॉकडाऊनदरम्यान मुलांवर करा चांगले संस्कार

लॉकडाऊनदरम्यान मुलांवर करा चांगले संस्कार

भारतातील लॉकडाऊनच्या काळात फक्त मोठेच नाहीतर लहान मुलंही मोठ्या आवडीने टीव्हीवर दाखविण्यात येणाऱ्या जुन्या मालिका आवडीने पाहत आहेत. जसं रामायण आणि महाभारत. आपल्या परंपरा आणि संस्कृतीबद्दल आपल्याला माहिती असलीच पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात घरातील मोठ्यांच्या सोबतीने तुम्ही नव्या पिढीवर संस्कार आणि नैतिकतेची बीजं रूजवू शकता. चला जाणून घ्या कसं ते.

जेवणाआधी प्रार्थना किंवा श्लोक इतरवेळी आपण रोजच्या घाईगडबडीत असतो. पण आता आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. मग अशावेळी मुलांना जेवणाआधी वदनी कवळ घेता किंवा देवाचे आभार मानून जेवायला सुरूवात करण्याची सवय लावण्याची ही चांगली संधी आहे. 

झाडांची निगा मुलांना तुम्ही रोज झाडांना पाणी घालण्याची सवय लावू शकता. त्यांना झाडं नेमून त्यांची देखभाल घ्यायची जबाबदारी द्या. मुलं ती नक्कीच आवडीने करतील. आपण लावलेल्या झाडाला आलेलं छोटसं फुलं त्यांना अगणित आनंद देऊन जाईल. 

पक्ष्यांना दाणापाणी ही अगदी साधी गोष्ट आहे की, चिमण्या-पाखरांसाठी गॅलरीत पाणी आणि दाणे ठेवणं. पण हीच गोष्ट मुलांना आपल्यांसोबतच इतर जीवांची काळजी घ्यायची हा धडा देऊन जाते. प्राण्यांपक्ष्यांवर प्रेम करण्याचे संस्कार मुलांवर लहानपणापासूनच करणं आवश्यक आहे.

Shutterstock

सकाळी उठून मोठ्यांना नमस्कार करणे किंवा मुलांच्या बोबड्या भाषेत प्रार्थना म्हणून घेणे. यासारख्या गोष्टींमुळे घरात नक्कीच आनंदाचं वातावरण निर्माण होईल. निराशेच्या या काळात या गोष्टी तुम्हाला निश्चितच आनंद देऊ शकतात.

मुलांना आपल्या परंपरा आणि सणांशी निगडीत पुस्तक किंवा इंटरनेटवरील साहित्य वाचायला द्या. त्यांच्याशी बोला. मुलंही मग आपल्या मनातलं तुमच्याशी शेअर करतील. मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यांची न कंटाळता उत्तर देण्याचा प्रयत्न करा. वेळ नक्कीच चांगला जाईल.

रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला मुलांकडून शुभंकरोती आणि रामरक्षा म्हणून घ्या. यामुळे त्यांचे उच्चारही शुद्ध होतील आणि त्यांना शिस्तही लागेल. 

 

Shutterstock

मुलांना काही गोष्टी शिकवण्याची जबाबदारी घरातल्या वृद्धांनाही आवर्जून द्या. मुलांनी काही प्रश्न विचारल्यास कुटुंबातील काही किस्से सांगूनही तुम्ही त्यांना समजवू शकता. कुटुंबातील वरिष्ठांचे किस्से, ज्यामध्ये मानवतेची गोष्ट असेल. अशामुळे मुलांनाही चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. जी त्यांना भविष्यात उपयोगी पडेल. 

आपल्या संस्कृतीशी जुळवून घेणं हे आपल्याला आपल्या मूळाशी जोडतं. खासकरून लहान मुलांचा या गोष्टींमुळे आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा असा सदुपयोग नक्की करा आणि पुढच्या पिढीला घडवा.

मग लॉकडाऊनच्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग नक्की करा आणि मुलांच्या आयुष्यााला चांगलं वळण द्या.