घरगुती सौंदर्यप्रसाधन वापरून घ्या त्वचेची काळजी - तज्ज्ञांचा सल्ला

घरगुती सौंदर्यप्रसाधन वापरून घ्या त्वचेची काळजी - तज्ज्ञांचा सल्ला

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारल्याचे दिसून येते. स्वच्छ आकाश, शुध्द हवा, भरपूर सुर्यप्रकाश या सा-या गोष्टी त्वचेच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. मात्र या लॉडाऊनमुळे घराबाहेर पडता न आल्याने लोकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. सतत टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप आदींच्या वापराने डोळ्यांवर ताण येऊन,त्वचा कोरडी पडणे, डोळ्या भोवती काळे वर्तुळ, थकवा जाणवणे आदी समस्या भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. पण  या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वतःसाठी पुरेसा वेळ काढू शकता आणि या वेळेचा सदुपयोग करून तुमची त्वचा आणखी तजेलदार करता येऊ शकते. तीव्र सूर्यप्रकाश, प्रदूषण, ताणतणावामुळे खराब झालेल्या त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्सचा वापर करता येऊ शकतो. या सोप्या उपायांचा वापर करून त्वचेचे तारुण्य टिकवण्यासाठी POPxo मराठीने डॉ रिंकी कपूर, द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या सल्लागार डरमॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटो सर्जन यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्याकडून योग्य सल्ला जाणून घेतला आहे. 

शारीरिक हलचाली महत्त्वाच्या

Shutterstock

लॉकडाऊनमध्ये केवळ आराम केल्यास शरीर आणखी सुस्तावण्याची शक्यता आहे. शारीरिक हलचाली न झाल्याने शरीराची चयापचय क्रिया मंदावते, यामुळे त्वचा आणि केसही निस्तेज होतात. आपल्या त्वचेची चमक पुन्हा आणण्यासाठी विविध घरगुती पर्यायांचा वापर करा. आपल्याला जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही, घरीदेखील बरेच व्यायामप्रकार करता येऊ शकतात. धावणे, दोरी उड्या खेळणे, नृत्य करणे, योगा अशा व्यायाम प्रकाराचा आधार घ्या. सुडौल बांध्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. किमान 20 मिनिटे कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.

उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार

आहाराकडे विशेष लक्ष द्या

Shutterstock

पचायला जड अन्न त्वचेसाठी चांगले नसते प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावे. दररोज ताजे आणि हलके अन्न तयार करा, आपल्या आहारामध्ये लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा कारण ते शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवतील. भरपूर पाणी प्या आणि जितके शक्य असेल तितकी फळं आणि कोशिंबीरी खा. आपण संतुलित आहाराचे सेवन केले तर त्वचेला तजेला येईल. चांगल्या त्वचेसाठी आपल्या आहारात काकडी आणि पुदीनाचे पाणी यासारखे काही डिटोक्स करणारे पेयांचे सेवन करू शकता.

गव्हाच्या पिठाच्या या तीन फेसपॅकमुळे त्वचा होईल अधिक चमकदार

नैसर्गिक प्रसाधनांचा वापर करून त्वचेची काळजी घ्या

Shutterstock

आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थ, मसाल्यापैकी काही गोष्टींचा वापर नक्कीच करता येऊ शकतो. बाजारातील सौंदर्यप्रसाधनाऐवजी आपण घरच्या घरी तयार केलेले लेप, उटणे, मॉइश्चरायझरचा वापर करू शकतो आणि या दिवसांमध्ये सौंदर्य उजळवू शकतो.

  • दिवसातून किमान दोन वेळा तरी त्वचेला स्वच्छ करणा-या पर्यायांचा वापर करा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर मात्र दिवसातून एकच वेळा अशा पर्यायांचा वापर करा. 
  • घरच्या घरी त्वचेला स्वच्छ करणारी उत्पादने तयार करा. एक चमचा रवा, एक चमचा बेसन, चिमूटभर हळद टाकून तुम्हाला घरच्या घरी उटणे तयार करता येईल. या मिश्रणाला तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून साठवू ठेवू शकता. 
  • अंघोळ करताना संपूर्ण शरीरासाठी या उटण्याचा वापर तुम्ही करू शकता. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर यामध्ये काही प्रमाणात गुलाबपाणी मिसळा. तर सर्वसामान्य त्वचेसाठी दह्याचा वापर करू शकता. तर कोरड्या त्वचेसाठी मोहरीचे तेल वापरू शकता. हे उटणे शरीरावरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत तर शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत करते.
  • चेह-याचा लेप तयार करण्यासाठी अर्धा कप ताक, 2 मोठे चमचे दही चेह-याला लावून काही तासांसाठी तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आणि चेह-याला मॉईश्चराईझ करा. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसेल.
  • त्वचेला त्वरीत चकाकी येण्यासाठी 3 मोठे चमचे संत्र्याचा रस आणि पाव कप मध घेऊन त्वचेला लावून बोटांनी मालिश करा आणि 15 मिनिट्स तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवून टाका. याने तुमच्या चेह-यावर चकाकी आल्याचे दिसून येईल.
  • कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी 1 मोठा चमचा मध आणि 1 चमचा दही घेऊन चेह-यावर लावा. यामुळे तुमच्या त्वचेचे झालेले नुकसान भरून येण्यास नक्कीच फायदा होईल.
  • संवेदनशील त्वचेकरिता 1 चमचा बेसन, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कुडुनिंबाची पावडर एकत्र करून दुधात मिसळा आणि हे फेस पॅक चेह-याला लावा. त्यानंतर हाताच्या बोटांनी हलकासा मसाज करून 15 मिनिट्स तसेच ठेवून द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मॉईश्चरायझरचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होईल, चेह-यावर चकाकी येईल तसेच पुरळ येण्याचे प्रमाण कमी होईल.
  • त्वचेला थंडावा देणारा स्प्रे तयार करण्यासाठी गुलाबपाणी, कोरफडीचा गर, काकडी तसेच लिंबाचा रस एकत्र करून एका बाटलीत भरा. ही बाटली फ्रिजमध्ये ठेवा आणि चेहरा धुतल्यानंतर या स्प्रे चा वापर करा आणि मग मॉईश्चरायझर वापरा.
  • तुम्ही दररोज क्लिन्झिंग, टोनिंग, मॉईश्चराईझिंग करत आहात याची खात्री करा. तसेच वारंवार चेह-याला स्पर्श करू नका.

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ