हे पदार्थ खाणं टाळलंत तर आपोआप कमी होईल पोट

हे पदार्थ खाणं टाळलंत तर आपोआप कमी होईल पोट

वाढते वजन ही आजकाल अनेकांच्या आयुष्यातील मोठी समस्या आहे. वजनासोबत पोटाची चरबी वाढत जाते आणि तुमचे शरीर बेढब दिसू लागते. बेली फॅट वाढण्यामागे तुमच्या जीवनशैलीतील अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. सर्वात आधी यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावर योग्य नियंत्रण ठेवायला हवं. कारण चुकीच्या आणि अपथ्यकारक आहारामुळे तुमच्या पोटाची चरबी मोठ्या प्रमाणावर वाढत असते. तुम्ही जे खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होत असतो. काही खाद्यपदार्थ जसे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, बेकरी प्रॉडक्ट, तळलेले पदार्थ तुमच्या वजनात वाढ करू शकतात. यासाठी जाणून घ्या बेली फॅट कमी करण्यासाठी कोणते खाद्यपदार्थ तुमच्या आहारात मुळीच असू नये. 

फ्रेंच फ्राईज अथवा चिप्स -

बटाटा खाणं कितीही आरोग्यदायी असलं तरी त्यापासून तयार केलेले फ्रेंच फ्राईज आणि चिप्स मात्र तुमच्या आहारासाठी मुळीच चांगले नाहीत. कारण त्यामध्ये अती कॅलरिज असतात ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहणे कठीण आहे. आजकाल फ्रेंच फ्राईज सर्वत्र आणि सहज उपलब्ध असल्यामुळे अनेकांना ते खाण्याची सवयच लागली आहे. मात्र जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला या खाद्यपदार्थापासून जरा दूरच राहवं लागेल. कारण अनेक संशोधनात असं दिसून आलं आहे की फ्रेंच फ्राईज खाण्यामुळे वजनात वाढ होते. 

Shutterstock

साखरेपासून तयार केलेले गोड पदार्थ -

गोड पदार्थ खाणं कोणाला नाही आवडत. मात्र जर तुम्ही सतत गोडाचे पदार्थ खात असाल तर तुम्हाला आता त्यावर आवर खालता आली पाहिजे. कारण त्यामधून तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर कॅलरिज जात असतात. गोड खाण्याच्या इच्छेवर मात करण्यासाठी असे पदार्थ हळू हळू कमी करा. आठवड्यातून एकदा साखरेचे पदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र ते ही जरा बेतानेच खा. गोड पदार्थ कमी केल्यामुळे तुमच्या वजनावर त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसेल.

बेकरीयुक्त खाद्यपदार्थ -

अनेकांच्या दिवसांची सुरूवातच ब्रेड, बिस्किट, पाव, केक यापासून होत असते. मात्र जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर शक्य तितकं या खाद्यपदार्थांपासून दूर राहा. गरज असल्यास गव्हापासून तयार केलेले बेक पदार्थ खा. मात्र लक्षात ठेवा गव्हापासून तयार केलेल्या बेकरी प्रोडक्टमध्येदेखील थोड्या प्रमाणात मैद्याचा वापर हा केलेलाच असतो. त्यामुळे अशा पदार्थात वापरण्यात आलेला मैदा आणि साखर तुमच्या वजनात वाढ करू शकतात. तेव्हा वजन कमी करायचं की हे पदार्थ खाणं सोडायचं हे तुमच्या हातात आहे. 

Shutterstock

प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ -

प्रकिया केलेल्या खाद्यपदार्थ जसे की ज्यूस, जेली, जॅम यांच्यामध्ये ते टिकण्यासाठी साखर आणि मीठ मोठ्याप्रमाणावर वापरण्यात आलेली असते. ज्यामुळे असे पदार्थ तुमच्या आहारात असतील तर ते त्वरीत बंद करा. कारण या पदार्थांमुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडचणी येऊ शकतात. 

आयस्क्रीम -

आयस्क्रीम नुसतं म्हटलं तरी आता अनेकांच्या तोंडाला पाणीच सुटलं असेल. कारण उन्हाळा असो वा हिवाळा प्रत्येकाला गारोगार आयस्क्रीम खाण्याची आवड सर्वांनाच असते. मात्र आयस्क्रीम सतत खाण्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरिज नक्कीच वाढू शकतात. आयस्क्रीमसाठी साखर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कधी तरी थोडंसं आयस्क्रीम खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र जर तुम्हाला सतत आयस्क्रीम खाण्याची सवय असेल तर वजन कमी करण्यासाठी ती वेळीच बदला. नाहीतर तुमच्या पोटाची चरबी कमी होणं यामुळे मुळीच शक्य होणार नाही. 

 

हे काही खाद्यपदार्थ आहारातून टाळून आणि योग्य आहार, नियमित व्यायाम करून तुम्ही तुमचे वजन नक्कीच नियंत्रणात आणू शकता. 

Shutterstock