या कारणांसाठी स्वयंपाकात केला जातो आमसुलाचा वापर

या कारणांसाठी स्वयंपाकात केला जातो आमसुलाचा वापर

कोकम हे एक आंबट फळ असून ते कोकण, केरळ, गोवा आणि कर्नाटकात आढळते. त्यामुळे या प्रांतातील खाद्यशैलीत कोकमचा म्हणजेच आमसुलाचा वापर आवर्जून केला जातो. कोकमाची फळं सुकवून त्याच्या सालीपासून आमसूल आणि रसापासून आगळ तयार केलं जातं. कोकमाच फळ आहार आणि औषध अशा दोन्ही गोष्टींसाठी वापरलं जाते. कोकमाची सुकवलेली साल आणि रसाचा वापर भाजी, चटणी, सोलकढी, कोकमाचे सार अशा अनेक खाद्यपदार्थात केला जातो. आंबट असूनही आमसूल हे आरोग्यासाठी चांगले असल्यामुळे आहारात त्याचा प्रमाणात वापर केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. याचं कारण कोकम हे एक पाचक फळ असून त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अपचन, मूळव्याधी, जुलाब, अंगाचा दाह अशा अनेक त्रासांमध्ये कोकम खाण्याचे फायदे होतात. एवढंच नाही तर कोकमापासून तयार केलेल्या क्रीमचा वापर तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील करू शकता. यासाठीच जाणून घ्या आमसुलाचे फायदे 

Shutterstock

कोकमातील अॅंटि फंगल आणि अॅंटि ऑक्सिडंट घटक-

कोकमातील अॅंटि फंगल आणि अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे कोणत्याही इनफेक्शनपासून तुमचे रक्षण होते. शिवाय कोकम टिकवून ठेवता येत असल्यामुळे तुम्ही वर्षाचे बारा महिने त्याचा वापर करू शकता. ज्यामुळे वर्षभर तुम्हाला आहारात कोकमाचा वापर करता येतो. कोकमाचा वापर करून तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता. 

केसांसाठी तुपाचे फायदे (Benefits Of Ghee For Hair In Marathi)

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर -

कोकमाच्या फळात कोणतेही सॅच्युरेटेड फॅट्स नाहीत शिवाय त्याच्यामधील कॅलरिजचे प्रमाणही इतर फळांच्या मानाने कमी आहे. म्हणूनच कोकमाचा आहारात समावेश केल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

shutterstock

कोकमातील पोषक घटक -

कोकमात अनेक पोषक घटक असतात. ज्याचा तुमच्या शरीरावर चांगला फायदा होतो. कोकमातील व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर्स आणि पाचक घटकांमुळे आहारात त्याचा वापर करणं फारच गरजेचं ठरतं. आमसुलातील हे पोषक घटक सर्वांप्रमाणेच गरोदर महिला आणि त्यांच्या गर्भाच्या वाढीसाठीदेखील फायदेशीर ठरतात. 

पचनशक्ती वाढते -

आजकाल चुकीच्या आहारशैलीमुळे अनेकांना अपचनाच्या समस्या जाणवतात. मात्र जर तुमच्या आहारात कोकमाचा समावेश असेल तर तुमचा अपचन, मुळव्याधी, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. यासाठी दररोज आहारात सोलकढी, कोकमाचं सार यांचा समावेश जरूर करा. 

shutterstock

एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी उपयुक्त -

कोकमातील अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे तुम्ही याचा वापर केस आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी नक्कीच वापरू शकता. कोकमाच्या तेलामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायमपणा होते. विशेषतः थंडीच्या दिवसात कोकमतेलाचा वापर जरूर करावा. कोकम तेलाला काही लोक मुठीया असंही म्हणतात. ते वितळवून ते त्वचेवर लावलं जातं. 

शरीराचा दाह कमी होतो -

शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना पित्ताचा त्रास जाणवतो. मात्र जर तुमच्या अंगावर पित्ताचे चट्टे, पुरळ उठत असेल आणि त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर कोकम तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. कोकमाचं सरबत पिण्यामुळे तुमची पित्ताची  समस्या कमी होऊ शकते.

मात्र असं असलं तरी कोकमाचे काही दुष्पपरिणाम देखील नक्कीच आहेत. जर तुम्हाला आमसुलाची अॅलर्जी असेल तर त्वचेवर कोकमतेलाचा वापर करणं टाळा. त्याचप्रमाणे कोकमाचे अती प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या शरीरावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. शिवाय ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी कोकमाचा वापर कमी प्रमाणात केलेलाच बरा.