गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा या स्टेप बाय स्टेप टिप्स

गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा या स्टेप बाय स्टेप टिप्स

स्वयंपाक घर हा घराचा आरसा असतो असं म्हणतात.  स्वयंपाक घर जितकं स्वच्छ तितकंच घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. सहाजिकच घरातील इतर स्वच्छतेसोबत किचन वेळोवेळी स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. मात्र अनेकांना किचनच्या ओटा आणि इतर गोष्टी स्वच्छ करण्यात इतक्या अडचणी येत नाहीत जितक्या शेगडी आणि गॅसचे बर्नर स्वच्छ करताना येतात. एकतर गॅस बर्नर स्वच्छ करण्याची सवय सर्वांनाच असते असं नाही. त्यामुळे गॅस बर्नर स्वच्छ करणं हा थोडा किचकट प्रकार आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. स्वंयपाक करताना सतत वापर झाल्यामुळे गॅस बर्नरच्या आतील आणि वरील बाजूने काजळी जमा होते. ज्यामुळे गॅस व्यवस्थित प्रज्वलित होत नाही. बऱ्यादचा उतू गेलेल्या दूधाचे अथवा फोडणीचे कण बर्नरमध्ये अडकतात. जर हे कण बर्नरमध्ये आत खोलवर गेले तर त्यामुळे बर्नरमधून प्रज्वलित होणारी ज्योत कमी होत जाते. स्वयंपाक करताना बऱ्याचदा निरनिराळ्या खाद्यपदार्थांसाठी गॅस कमी, मध्यम आणि मोठ्या आचेवर ठेवावा लागतो. मात्र जर गॅस बर्नर व्यवस्थित कार्यरत नसतील तर त्यामुळे स्वयंपाक करणं कठीण जातं. आता लॉकडाऊनमध्ये शेगडी स्वच्छ करण्यासाठी मॅकेनिकला बोलावणंही शक्य नाही. म्हणूनच घरातील गॅस बर्नर स्वतःच स्वच्छ करण्यास शिका. यासाठी या सोप्या टिप्स जरूर फॉलो करा. आम्ही दिलेल्या या स्टेप बाय स्टेप तुम्हाला यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

instagram

गॅस बर्नर डिप क्लीन करण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

 • सर्वात आधी तुमच्या शेगडीसोबत जोडलेलं गॅसच्या प्रवाहाचं मुख्य बटण बंद करा. ज्यामुळे गॅस प्रवाह खंडीत होईल आणि तुम्हाला शेगडी व्यवस्थित स्वच्छ करता येईल. 
 • शेगडीवरील गॅस बर्नरचा वरचा भाग काढा आणि थोड्यावेळ गरम पाण्यात बूडवून ठेवा. 
 • एखाद्या टोकदार वस्तूने बर्नरच्या आत अडकलेली घाण बाहेर काढा. गरम पाण्यात बूडवून ठेवल्यामुळे त्यातील अडकलेले चिकट अन्नकण निघून जाण्यास मदत होईल. 
 • गॅस बर्नर पुन्हा एकदा थंड पाण्यात क्लिंझर, व्हाईट व्हिनेगर अथवा सोडा टाकून बूडवून ठेवा. क्लिंझिंगसाठी तुमच्या घरात ज्या नैसर्गिक वस्तू उपलब्ध असतील त्याचा वापर तुम्ही करू शकता. काही मिनीटे असं पाण्यात बूडवून ठेवल्यामुळे बर्नर आतूनदेखील स्वच्छ होतील.
 • भांडी घासण्याच्या घासणीने बर्नरवर जमा झालेली काजळी घासून स्वच्छ करा. तुम्ही यासाठी तुमच्या जुन्या वापरात नसलेल्या टूथब्रशचा वापरदेखील करू शकता. 
 • घासून स्वच्छ केलेले बर्नर पुन्हा साध्या पाण्याने धुवून घ्या आणि कोरड्या कापडाने पुसून ठेवा. 
 • बर्नर स्वच्छ केल्यावर ते कोरडे करूनच मगच पुन्हा तुमच्या शेगडीवर ठेवा. नाहीतर त्यात पाण्याचे थेंब राहीले तर त्यातून आग प्रज्वलित होणार नाही.
 • गॅस बर्नर कोरडे होण्यासाठी अर्धा तास थांबा आणि मगच ते शेगडीवर ठेवा ज्यामुळे ते व्यवस्थित सुकतील.
 • स्वयंपाक झाल्यावर जर दररोज गॅस शेगडी व्यवस्थित स्वच्छ केली आणि महिन्यातून एकदा असे गॅसचे बर्नर स्वच्छ केले तर शेगडी लवकर खराब होणार नाही. 
 • गॅस बर्नर स्वच्छ असतील तर गॅसची बचतदेखील होऊ शकते. शिवाय अशा स्वच्छ शेगडीवर केलेला स्वयंपाक लवकर होत असल्याने तुमचा वेळही वाचेल.
 • तेव्हा लॉकडाऊनमध्ये स्वतःच या सोप्या टिप्स वापरून तुमच्या घरातील शेगडीचे गॅस बर्नर स्वच्छ करा आणि स्वयंपाक घर चमकवा.
instagram