केस वाळवताना अशी घ्या काळजी, नाही होणार नुकसान

केस वाळवताना अशी घ्या काळजी, नाही होणार नुकसान

लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण घरात आहेत. पूर्वी नेहमी सकाळी ऑफिला जाण्याच्या घाईत केसांची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळे देणं शक्य होत नव्हतं. केस धुतल्यावर ते लवकर वाळावेत यासाठी आपण अक्षरशः निरनिराळे उपाय करायचो. मात्र आता प्रत्येकाजवळ केसांची काळजी घेण्यासाठी खूपच वेळ आहे. ज्यामुळे या काळात केसांची योग्य काळजी घेऊन तुम्ही तुमचे केस लांबसडक आणि मजबूत करू शकता. यासाठी केस वाळवताना या काही टिप्स फॉलो करा ज्यामुळे तुम्हाला केसांचं नुकसान टाळणं शक्य होईल. 

केस कोरडे करण्यासाठी टॉवेलचा वापर करताना काय काळजी घ्याल -

अंघोळीनंतर केसांना टॉवेल गुंडाळून ठेवणं अगदी सोपं काम असतं. ज्यामुळे केस आपोआप वाळतील असं तुम्हाला वाटतं. शिवाय केसांना टॉवेल गुंडाळून तुम्ही तुमची इतर कामं करू शकता. कधी कधी फारच घाई असेल तर तुम्ही केस कोरडे करण्यासाठी टॉवेल केसांवर घासून ते कोरडे करण्याचा प्रयत्न करता. मात्र ही अगदीच चुकीची पद्धत आहे. टर्कीश अथवा जाड टॉवेल केसांवर गुंडाळून ठेवल्यामुळे केसांच्या मुळांवर ताण येतो. ज्यामुळे केसांची मुळं दुखावली जातात आणि केसांचे नुकसान होते. शिवाय असा टॉवेल केसांवर रगडून केस पुसण्यामुळे तुमचे केस तुटतात देखील. यासाठीच केस पुसण्यासाठी एखादा सुती पंचा अथवा जुन्या टी शर्टचा वापर करा. ज्यामध्ये केसांमधील पाणी शोषून घेण्याची क्षमता असेल. कोणतेही कापड केसांवर रगडून केस पुसण्यापेक्षा त्या कापडाने केसांवरील पाणी टिपण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे केस दुखावले जाणार नाहीत. 

shutterstock

केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करताना काय काळजी घ्याल -

केस सुकवण्यासाठी केसांवर हेअर ड्रायरचा वापर करताना काय काळजी घ्याल -

बऱ्याच लोकांना सकाळी घाईत असल्यामुळे केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करण्याची सवय असते. मात्र केसांना उष्णता देऊन केस सुकवल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे केस कोरडे होतात आणि केसांच्या त्वचेचं खूप नुकसान होतं. वास्तविक केस सुती टॉवेलने कोरडे करणं हाच पर्याय खरंतर उत्तम आहे. मात्र जर तुम्हाला  फारच घाई असेल तर अगदी कधीतरी ड्रायरचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. मात्र ड्रायर वापरताना त्याचे तापमान कमी असेल याची काळजी घ्या. सेटींगमध्ये असे बदल करण्याची सोय असते. थोडक्यात जास्त उष्ण वाऱ्याने केस कोरडे करू नका. 

shutterstock

धुतलेल्या केसांवर स्टाईल करताना काय काळजी घ्याल -

खरंतर धुतलेले केस वाळेपर्यंत ते मोकळे ठेवणंच योग्य असतं. मात्र आजकालच्या घाईघाईच्या जीवनशैलीत तसं करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही. त्यामुळे केस अर्धवट वाळल्यावर ते लगेच बांधून ठेवले जातात. मात्र जर केस व्यवस्थित वाळले नाहीत तर त्यामुळे केसांमध्ये दुर्गंधी अथवा त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी धुतलेल्या केसांची स्टाईल करताना ते फार घट्ट बांधून ठेवू नका. त्यापेक्षा एखादी  सैल हेअरस्टाईल करून ते जास्तीत जास्त मोकळे राहतील याची काळजी घ्या. शिवाय यासाठी वापरण्यात येणारा कंगवा मोठ्या दातांचा असेल याचीही काळजी घ्या. ज्यामुळे केस जास्त प्रमाणात तुटणार नाहीत. 

या अगदी सोप्या आणि सहज करता येण्यासारख्या टीप्स फॉलो करा आणि तुमच्या केसांचं नुकसान टाळा. अशा पद्धतीने केस वाळवले तर ते लवकर लांबसडक आणि मजबूत होतील. 

 

 

shutterstock