स्वादिष्ट रेसिपीजसाठी घरीच असं तयार करा पनीर

स्वादिष्ट रेसिपीजसाठी घरीच असं तयार करा पनीर

लॉकडाऊनमुळे सध्या घरी दररोज नवनवीन पदार्थ तयार करण्याची चंगळ सुरू आहे. सर्वजण सध्या घरातील शेफ झाले आहेत. ज्यामुळे कधीही स्वयंपाकघराकडे न फिरकणाऱ्या लोकांना आता दररोज काहीतरी नवीन पदार्थ शिकण्याची लहर आली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद आहेत. ज्यामुळे स्विगी, झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी अॅप्सचाही काहीच उपयोग करता येत नाही. सहाजिकच घरातच हॉटेलसारखं जेवण करणं हाच यावर एक सोपा मार्ग आहे. हॉटेलच्या जेवणात सर्वात जास्त वापर केला जातो तो पनीरचा. त्यामुळे पनीरपासून निरनिराळे पदार्थ करून तुम्ही हॉटेल सारखं जेवण तयार करू शकता. शिवाय मांसाहारी लोकांचा सध्या मांसाहारही बंद आहे. त्यामुळे त्यांनादेखील शरीराची प्रोटीनची गरज भागवण्यासाठी पनीरची गरज आहे. शाकाहारी लोकांसाठी तर पनीर हाच प्रोटीनचा पूरवठा करणारा एक मुख्य घटक आहे. मात्र सध्या जीवनावश्यक अनेक गोष्टींचा बाजारात तुटवडा आहे. त्यामुळे बाजारात पनीर सहज मिळेल असं मुळीच नाही. पण तुम्ही यावर उपाय करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि बाजारासारखं पनीर तयार करू शकता. जाणून घ्या कसं ते

घरीच पनीर तयार करण्याची सोपी पद्धत

एका स्वच्छ भांड्यांमध्ये एक लिटर दूध घ्या. दूध मध्यम आचेवर कमीत कमी दहा मिनीटे गरम करा. दूध उकळू लागल्यावर एका वाटीत थोडं दूध काढून घ्या. वाटीतील दुधामध्ये एक मोठा चमचा सायट्रीक अॅसिड अथवा लिंबाचा रस टाका. ज्यामुळे वाटीतील दूध फाटेल. वाटीमधलं फाटलेले दूध हळू हळू पातेल्यामधील उकळत्या दूधात टाका. दूधाखालील गॅस सुरूच राहू द्या. दूध पूर्णपणे फाटून त्यातून पारदर्शक पाणी वेगळं दिसू लागलं की गॅस बंद करा. पातेल्यामधील मिश्रण मलमलच्या स्वच्छ कापडाने गाळून घ्या. गाळून काढलेले पनीर नळाच्या वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या आणि स्वयंपाकासाठी वापरा. या पनीरचा वापर पनीच्या निरनिराळ्या मिठाई, पनीर भुर्जी, पनीर पराठा आणि भाजीसाठी नक्कीच करता येईल. पनीरपासून मटर पनीर, पनीर टिक्का, आलू पनीर, पालक पनीर असे अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात. मात्र यासाठी पनीरचे क्युब्स अथवा वड्या वापरल्या जातात. यासाठी बाजारात पनीर चौकोनी आकाराच्या वडीप्रमाणे विकत मिळतं. ज्यामुळे तुम्ही ते छोट्या छोट्या क्युब्समध्ये कापू शकता.

Instagram

पनीरच्या क्युब्स तयार करण्यासाठी फॉलो करा ही सोपी पद्धत -

पनीरचा गोळा एका उलट्या ताटावर ठेवा आणि त्यावर दुसरे ताट उलटे करा. ताटाच्या वरच्या बाजूने वजनदार वस्तू ठेवा ज्यामुळे पनीरमधील पाणी निघून जाईल. अर्धा तासाने पनीर काढून काही मिनीटे थंड पाण्यात बुडवून ठेवा.  पाण्यातून बाहेर काढलेल्या पनीरचे सोयीप्रमाणे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवा. बाजारात पनीर तयार करण्यासाठी लाकडाची दाबपेटी विकत मिळते शक्य असल्यास तिचा वापर करा. मात्र ते शक्य नसेल तर ही सोपी पद्धत वापरून पनीर तयार करा आणि स्वादिष्ट रेसिपीज घरीच तयार करा. 

Instagram