ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
घर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय

घर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय

गेली अनेक वर्ष इंटिरियर डिझाईनर, होम स्टाईलिस्ट म्हणून कार्यरत असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे कविता भालेराव. POPxoMarathi सोबत त्यांनी शेअर केले घर सजावट आणि त्या निमित्ताने येणारे अनुभव.

मला डिझायनर म्हणून जागेला सुंदर आणि उपयुक्त बनवता येतेच. प्रत्येक जागेची आपली एक अशी ओळख असते. पण मला खरंतर मनापासूनच घर डिझाईन करायला आवडते. घरांच्या अंतरंगात शिरण्याचा अनुभव हा फारच वेगळा असतो. घर डिझाईन करताना नेहमीच नव्याने समजणाऱ्या काही गोष्टी,व्यवसाय म्हणून अपडेट राहणे या पलिकडेही मला भावते ते नवीन लोकांशी तयार होणारे ऋणानुबंध. त्यांचे आयुष्य अगदी जवळून बघता येते खरंतर अनुभवतच असते मी. अनुभवल्याखेरीज मी घरपण देऊच शकत नाही, फक्त सजवू शकते. घर बनवता-बनवता अनुभवणे हा एक सुखद, मजेशीर क्वचित खडबडीत असा प्रवास आहे. या सगळ्या प्रवासात मला माझी बुद्धी, माझे कौशल्य आणि त्यांच्या नजरेतून त्यांचं घर ,त्यांच्या अपेक्षा  बघाव्या लागतात आणि यांचा सुरेख मेळ बसवावा लागतो. खरंतर तारंबळच उडते माझी. माझ्याच नजरेतून मी दुसऱ्याचं घर बघू शकते, डिझाईन पण करू शकते पण ते त्यांचे घर त्यांच्यासारखं थोडी दिसणार मग.

घरात असताना दिसणार माणसांचं वेगळं रूप

घरात माणसाचं एक वेगळंच रूप बघायला आणि अनुभवायला मिळतं. मला बाहेर भेटणारी व्यक्ती ही घरात एकदम मनमोकळी असते. कुठलंच प्रेशर नसणारी आपल्याच विश्वात रमणारी माणसं ही फार आनंदी दिसतात आणि असतात. घर डिझाईन करताना त्यांच्या माझ्याकडून आणि त्यांच्या उपलब्ध जागेकडून असणाऱ्या अपेक्षा आणि स्वप्नं हे कदाचित जागा आणि स्वप्न यांचे न जुळणारे गणित असते आणि माझा रोल इथूनपुढे अजूनच कठीण होत जातो. कारण जागा तर वाढवता नाही येणार मग आपल्या जागेत बसतील एवढी स्वप्नं आणि प्रत्यक्षात कोणती पूर्ण होतील हे समजावून सांगणं हा टप्पा फारच कठीण असते. बरं.. गंमत अशी की, प्रत्येकाला अजिबात इमॅजिन होत नसते की, कसे दिसेल पूर्ण झालेलं घर. हो.. पण एक नक्की आपल्याला घर कसे हवे याबद्दल मात्र लोक अगदी आग्रही असतात आणि असायलाच पाहिजे. आपलं स्वतःचं मत नसणारा अगदीच विरळाच किंवा नसतातच बहुधा.

बहुरंगी घरे आणि राहणारे

बहुरंगी असतात घरे आणि त्यात राहणारे. आपल्या घरात लोकांचा कसा राबता असतो हे अभिमानाने सांगणारे. आजकाल आम्ही शनिवार रविवार घरीच असतो पण पार्टी ऍनिमल बरं का.नाही, आमच्याकडे वर्षातून एखादं वेळेला येतात लोक हे जरा हळूच पण सहमतीने सांगणारे लोक. विविध प्रकारचे आणि स्वभावाचे असतात लोक. पण एक गोष्ट अगदी समान असते ती म्हणजे आपल्या बालपणाशी असलेले न दिसणारे घट्ट नातं. कोणत्याही वयाची व्यक्ती असो. हे कधी चटकन लक्षात येते जेव्हा हीच लोक मुलांच्या रूमबद्दल बोलतात तेव्हा. मन अगदी मागे त्यांच्या बालपणात आणि डोळे मात्र पुढच्या पिढीच्या भविष्याची स्वप्नं बघत असतात. खरंच वेगळीच असतात घर आणि त्यांची माणसे.

ADVERTISEMENT

Home Decor Tips : घराला सजवताना लक्षात घ्या या गोष्टी

असंख्य प्रश्न …न संपणाऱ्या शंका

ब्लेझर आणि साड्या बसतील ना एका कपाटात इथं पासून ते आमच्याकडे ना जुनी पितळ्याची भांडी आहेत आणि  लागतात ही अधूनमधून तेव्हा त्याला पण जागा हवी. एवढ्यावर न थांबता…वडिलोपार्जित वस्तू, माहेरून आलेलं सामान. काय करू, किती ठेवू, काय टाकून देऊ या विचारात अनेक काळ भूतकाळात रमणारी माणसं. पण घर मात्र नवीन पद्धतीचं हवं. थोडक्यात काय तर जुन्याबरोबरच नवीन गोष्टीशी नातं सांगत असतात घर. मग बऱ्याचदा माझ्यावरच वेळ येते  निवड करायची. काय ठेवायचं आणि काय टाकायचं याची. फार अवघड काम असतं हे, कोणालाही न दुखावता आपली जबाबदारी पार पाडणे. हे सगळे मी अनुभवत असते…घरातलं झाल्याशिवाय हे अनुभवणं अवघड आहे. बाहेरून बघणाऱ्याला वाटतं की, एवढेच लोक राहतात, एवढे काय त्यात, राजमहाल बांधणार का? मग इतका का वेळ लागतो. जे बाहेरच्यांना दिसणार नसतं, पण जे मला दिसत असतं. ते असं की,    प्रत्यक्षात दिसणाऱ्या घरात लोक कमी आणि पिढ्या जास्त असतात. वास्तव्यास नसल्या तरी मनात असलेल्या, सामानातून आलेल्या. त्यांना पण न दुखावता सामावून घ्यायचं म्हणजे एवढा वेळ तर लागणार ना.

HouseTips : मुलांची खोली सजवताना लक्षात घ्या या गोष्टी

घराशी करा संवाद

घर हे त्यात राहणाऱ्यांचं अवकाश असतं, त्यांचं स्वतःचं असं. ज्याने त्याने स्वतः करीत बनविलेलं, स्वतःसाठी बनवलेलं असते…हे घर असतं. घराला खूपच बोलायचं असतं पण धावपळीत आपलंच ऐकायचं राहून जातं. एकदा निवांत क्षणी कधीतरी गप्पा मारा आपल्याच घराशी, भिंतीशी, वस्तूंशी किती प्रेमाने सजवले असते आपण. किती प्रेमाने विचारपूस करते घर ते एकदा अनुभवून घ्या. आपलं घर हे आपलं प्रतिबिंब असतं. थोडातरी वेळ काढाल त्याची मायेने विचारपूस करायला, मायेने हात फिरवायला.

ADVERTISEMENT

एक मात्र अगदी नक्की लक्षात ठेवा  आपले घर हे आपल्यासारखंच असावं. नाहीतर फार आरसे बसवावे लागतील स्वतःलाच बघायला आणि स्वतःचे प्रतिबिंब शोधायलाही.

– कविता भालेराव (इंटिरिअर डिझाईनर). 

Vaastu Tips : घरात बासरी ठेवण्याचे फायदे

01 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT