पाणीपुरी #lover असणाऱ्यांची आता काय अवस्था आहे ती माझ्याशिवाय जास्त कोणीच समजू शकत नाही. दररोज रात्री मला मी पाणीपुरी खात असल्याचं स्वप्न या lockdown मध्ये पडत आहे. पाणीपुरीसाठी काय लागतं रगडा, पाणीपुरीचं चटपटीत पाणी आणि आंबट-गोड चटणी. बरोबर ना! हा आता काही जणांना सोबत बारीक चिरलेला कांदा लागतो. काय इतकं ऐकून तोंडाला पाणी आलं हो ना? अहो पण पाणीपुरीला मिस कशाला करता घरीच बनवा मस्त पाणीपुरीच्या पुऱ्या त्याही बाजारापेक्षा अधिक चांगल्या. माझी पाणीपुरीची हौस मी अशा पद्धतीने पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून पूर्ण केली. तुम्ही पण पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. चला करुया सुरुवात
साहित्य: 1 वाटी बारीक रवा, पाव वाटी मैदा, मीठ, अर्धा वाटी कोमट पाणी आणि तळण्यासाठी तेल
कृती :
या रेसिपीसाठी तुम्हाला बारीक रवा आवश्यक असतो. आता तुमच्या घरात जाड रवा असेल तरी चालेल. पण तुम्हाला आधी तो रवा मिक्सरमधून फिरवून घ्यावा लागेल. (आता लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर साधा रवा आणायला जाऊ नका)
वर सांगितलेले प्रमाण अगदी योग्य आहे. त्यामुळे फार गोंधळ घालू नका. माप तसेच्या तसे घ्या. आता एक वाटी बारीक रवा घेऊन त्यामध्ये पाव वाटी मैदा घाला.चवीपुरते मीठ घालून त्यात बरोबर अर्धा वाटी कोमट पाणी घाला. पीठ छान हलक्या हाताने मळा.
आता मळलेले पीठ किमान 10 मिनिटांसाठी झाकून तसेच ठेवा. कारण त्यामुळे रवा छान फुलेल.
आता साधारण 15 मिनिटांनंतर पुन्हा मळून घ्या. आता तुम्हाला याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. या पोळ्या फार पातळ व्हायला नको. आता तुम्ही एक मोठी पोळी लाटून घ्या.
आता छोट्आ छोट्ा गोल गोल पुऱ्यांचे छाप पाडण्यासाठी एखादे गोल झाकण पाहा. तुम्हाला बाजारातून आणलेल्या पाणीपुरीचा आकार माहीत असेल तर त्या अंदाजाने तुम्ही पाणी पुरीसाठी छाप शोधा.
आता सगळे छाप पाडून झाल्यानंतर जी बाजू लाटताना वर आहे तशीच ती तळताना आत जायला हवी म्हणून एका प्लेट किंवा पेपर वर दूर दूर या पुऱ्या ठेवा.
आता यामध्ये एक महत्वाची ट्रिक अशी आहे की, तुम्हाला या पुऱ्या लगेच तळायच्या नसतात. किमान 10 मिनिटं या पुऱ्या वाळू द्या.
आता तळण्यासाठी तुम्हाला तेल कडकडीत गरम करायचे आहे. पुऱ्या तळताना आच मध्यम करुन पुरीची वरील बाजू वर ठेवूनच पुऱ्या तेलात सोडायच्या आहेत.
पुऱ्या थोड्या दाबून तुम्हाला त्या फुलवून घ्यायच्या आहेत. टिश्यू पेपरवर या पुऱ्या काढून घ्या.
तुमच्या पाणीपुरीच्या पुरी एकदम तयार. हे सगळं करायला तुम्हाला तासभर पुरेसा आहे. हे करतानाच तुम्ही इतर तयारीही करुन ठेवा.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.