गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. मासिक पाळी चुकल्यानंतर पुढील दोन आठवड्यामध्ये कोणत्याही क्षणी गर्भधारणा राहण्याची शक्यता असते. सेक्सनंतर शूक्राणू स्त्रीच्या गर्भाशयातून स्त्रीबीजापर्यंत पोहचतात आणि त्यांच्या मिलनातून 'गर्भधारणा' होते. गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात बाळाची वाढ आणि विकास टप्प्या टप्प्याने होऊ लागतो. यासाठीच प्रत्येक महिन्यात गर्भात होणारे बदल प्रत्येक स्त्रीला माहीत असायलाच हवे. गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते हे जाणून घेण्यासाठी ही माहिती जरूर वाचा.
पाळी चुकल्यानंतर एक आठवड्याच्या आत तुम्हाला तुम्ही गरोदर आहे हे समजते. याचा अर्थ पहिल्या महिन्यात गर्भ दोन आठवड्यांचा झालेला असतो. जरी घरगुती प्रेगन्सी टेस्ट करून तुम्ही गरोदर आहात हे तपासता येत असले तरी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्वरीत डॉक्टरांकडून टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात महिलांनी काही बाबतीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात गर्भ तुमच्या गर्भाशयात रूजत असतो. ज्यामुळे या काळात गर्भपेशींचे वर्गीकरण वेगाने होत असते. एका पेशीतून अनेक पेशी दुपट्टीने वाढत जातात. ज्यातून पुढे बाळाचे शरीर आणि अवयव निर्माण होणार असतात. हळू हळू या पेशींच्या वर्गीकरणातून भृणाचा आकार तयार होतो.
दुसऱ्या महिन्यापर्यंत बाळाची वाढ जवळजवळ एक इंच इतकी झालेली असते. दुसऱ्या महिन्यानंतर ही वाढ आणखी झपाट्याने होऊ लागते. या काळात बाळाचे डोके, हात, पाय बोटे, डोळे, मेंदू, पाठीचा कणा असे महत्त्वाचे भाग निर्माण होत असतात. दुसऱ्या महिन्यात बाळाचं छोटंसं ह्रदयदेखील गर्भात तयार होतं. ज्यामुळे सोनोग्राफीत तुमच्या बाळाचे ठोकेदेखील तुम्हाला ऐकू येऊ शकतात.
वाचा - नॉर्मल डिलिव्हरीसाठी सोपे उपाय (Tips For Normal Delivery In Marathi)
तिसऱ्या महिन्यात बाळाच्या अवयवांची वाढ अधिक जोमाने होऊ लागते. हातापायाची बोटे आता आकार घेऊ लागतात. ज्यामुळे बाळ गर्भात हालचाल करू लागते. या कालावधीत त्यांच्या तोंडाची उघडझाप सुरू असते. एवढंच नाही तर त्यांच्या तोंडातील हिरड्यांचा विकास सुरू होतो. त्याचे प्रजनन अवयवदेखील याच काळात विकसित होऊ लागतात. मात्र असं असलं तरी सोनोग्राफीमधून तुम्हाला बाळ मुलगा आहे की मुलगी हे समजू शकत नाही. थोडक्यात तिसऱ्या महिन्याच्या शेवटापर्यंत बाळाचे जवळजवळ सर्व अवयव हळूहळू निर्माण होतात. शिवाय या काळात गर्भ जवळजवळ चार इंचापर्यंत विकसित होतो.
गरोदरपणातील चौथा महिना अतिशय सावधगिरीने राहण्याचा आहे. पहिल्या एक ते तीन महिन्यांच्या कालावधीला पहिली तिमाही असं म्हणतात. चौथ्या महिन्यात तुम्ही पहिल्या तिमाहीमधून दुसऱ्या तिमाहीत प्रवेश करता. दुसरी तिमाही चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या महिन्यापर्यंत असते. चौथ्या महिन्यात तुमच्या बाळाचा आकार वाढू लागतो. ज्यामुळे तुमच्या पोटाच्या आकारातही आता झपाट्याने वाढ होऊ लागते. या काळात बाळाच्या मेंदूच्या कवठीचा विकास होत असतो. शिवाय ह्रदयाचा आकारही मोठा होऊ लागतो. ज्यामुळे चौथ्या महिन्याच्या सोनोग्राफीत तुम्हाला बाळाच्या ठोक्यांचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागतो. तुम्ही या काळात तुमच्या बाळाशी मनातून संवाददेखील साधू शकता.
पाचव्या महिन्यात तुमच्या बाळाच्या चेहऱ्याचा पूर्ण विकास होतो. ज्यामुळे त्याचे डोळे, पापण्या, भूवया विकसित होतात. एव्हाना तुमच्या बाळाच्या हात आणि पायांमध्येही वाढ झाल्यामुळे बाळ हातपायाची हालचाल करू लागते. गर्भात होणारी तुमच्या बाळाची हालचाल आता तुम्हाला व्यवस्थितपणे जाणवू लागते.
सहाव्या महिन्यामध्ये त्वचा, रंग, रक्तवाहिन्या विकसित होतात. त्याच्या हातापायांवरील ठसे या काळात दिसू लागतात. ते डोळ्यांची उघडझाप करू लागते. कानांचा विकास झाल्यामुळे तुमचे बाळ आवाजाला प्रतिसाद देऊ लागते. शिवाय या काळात बाळाच्या वजनातदेखील झपाट्याने वाढ होते.
सातव्या महिन्यापासून तुम्ही दुसऱ्या तिमाहीतून तिसऱ्या तिमाहीत प्रवेश करता. ज्यामध्ये सातव्या, आठव्या आणि नवव्या महिन्यांचा समावेश असू शकतो. सातव्या महिन्यात बाळाची वाढ आणि विकास वेगाने होत असतो. सातव्या महिन्यात बाळाच्या अवयवांची पूर्ण वाढ झालेली असते. मात्र असं अजूनही आणखी काही आठवडे त्याच्या शरीराच्या पूर्ण विकासासाठी गरजेचे असतात. या काळात तुमच्या प्रत्येक गोष्टीला बाळ प्रतिसाद देऊ लागते शिवाय त्याची हालचाल आता अती वेगाने आणि अचानक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते कधी कधी वेगाने फिरत आहे असं तुम्हाला वाटू शकतं.
गरोदरपणात आठवा महिना म्हणजे स्वतःच्या आणि बाळाच्या जपणूकीसाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे. कारण सातवा महिना पूर्ण झाल्यावर बाळाचा जन्म होण्याची शक्यता अधिक वाढते. ज्याला आपण मुदतपूर्व प्रसूती अथवा प्रिमॅच्युअर बेबी असं म्हणतो. मात्र अशा वेळेआधीच जन्मलेल्या बाळाची विशेष दक्षता घ्यावी लागते. म्हणूनच बाळाच्या पूर्ण विकास आणि वाढीनंतरच त्याचा जन्म होणं गरजेचं आहे. या काळात बाळाचे ह्रदय, फुफ्फुसे आणि मेंदूची अधिक चांगल्या पद्धतीने विकास होतो. यासाठी या काळात गरोदरपणात बाळाची हालचाल कशी आहे याकडेही नीट लक्ष असणं गरजेचं आहे.
गरोदरपणातील नववा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण बाळाच्या फुफ्फुसांची वाढ आता योग्य पद्धतीने पूर्ण झालेली असते ज्यामुळे बाळ आता कधीही जन्माला येऊ शकते. गर्भधारणेचा काळ, गर्भाचे वजन, आईची मनःस्थिती, गर्भाची वाढ आणि विकास यावरून ठरते की प्रसूती नेमकी कधी आणि कोणत्या पद्धतीने होणार. जर सर्व काही ठीक असेल तर पूर्ण वाढ झाल्यावर नवव्या महिन्यात तुमच्या बाळाचा जन्म कधीही नैसर्गिक प्रसूतीने होऊ शकतो. मात्र जर काही अडचणी अथवा आरोग्य समस्या असतील तर नवव्या महिन्यात बाळाची स्थिती पाहून सी- सेक्शनद्वारे डॉक्टर तुमची प्रसूती करू शकतात.
माझ्या बाळाची वाढ योग्य पद्धतीने होत आहे हे मला कसे समजेल ?
आजकाल डॉक्टरांच्या मदतीने सोनोग्राफीच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या बाळाची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होत आहे का हे सहज समजू शकते. त्यामुळे यासाठी योग्य तज्ञ्जांचा सल्ला घ्या.
कोणत्या महिन्यात बाळाचा विकास वेगाने होतो ?
गर्भधारणेपासून नवव्या महिन्यापर्यंत बाळाचा विकास टप्प्या टप्प्याने होत असतो. मात्र तिसरी तिमाही सुरू झाल्यावर म्हणजेच सातव्या आणि आठव्या महिन्यात बाळाचा विकास झपाट्याने होत असतो. म्हणूनच पहिल्या तिमाहीत आणि शेवटच्या तिमाहीत गरोदर स्त्रीने योग्य काळजी घ्यावी.
बाळाची वाढ खुंटण्यामागे काय कारणे असू शकतात ?
बाळाची वाढ कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की मातेचे अपूरे पोषण, गर्भाला पुरेसा ऑक्सिनज न मिळणे इ. मात्र याचा परिणाम गर्भावर विपरित होऊ शकतो. यासाठी अशा अवस्थेत त्वरीत तज्ञ्जांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.