Kitchen Tips : कांद्याशिवाय बनवा दाट रस्सा भाजी

Kitchen Tips : कांद्याशिवाय बनवा दाट रस्सा भाजी

काहीजणांना कांदा खाणं वर्ज्य असतं तर काहींना कांदा खायला आवडत नाही. याउलट गृहिणींना तर रस्सा भाजी म्हटल्यावर कांदा आणि टोमॅटोशिवाय पर्यायच दिसत नाही. मग अशावेळी नेमकं करायचं काय? त्यातच लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत असल्यावर रोज रोज कांदा कुठे मिळणार? अशावेळी तुम्हाला उपयोगी पडतील खालील टिप्स ज्यांचा वापर करून तुम्ही कांद्याशिवाय रस्सा भाजी करू शकता. 

Shutterstock

  • रस्सा दाटसर करण्यासाठी त्यात काजू, मखाना, शेंगदाण्याचं कूट, बदाम किंवा भोपळ्याच्या बियांची किंवा खसखस पेस्ट तुम्ही वापरू शकता. काजू पेस्ट घातल्याने भाजीची चव अजून चांगली होते आणि रंगही चांगला येतो. याशिवाय टोमॅटो परतताना त्यात तुम्ही दहीसुद्धा मिक्स करू शकता (शक्य असल्यास दही घालण्याआधी त्यात एक दोन चमचे बेसन घालून फेटून घ्या). यामुळे भाजीची चव वाढेल आणमि टोमॅटोमध्ये घातल्याने दही फाटणारही नाही. लाल सिमला मिरची, रताळं, गाजर आणि कोबी हेसुद्धा तुम्ही तेलावर परतून भाजीत वापरू शकता. भाज्या यामुळे जास्त पौष्टिक बनतील.
  • जेव्हा तुम्ही कांद्याशिवाय एखादी रस्सा भाजी बनवणार असाल तेव्हा ताज्या लाल टोमॅटोची प्युरी वापरा. रस्सा किंवा ग्रेव्ही बनवताना ती जास्त काळ टिकावी म्हणून त्यात तेल आणि मसाल्यांचा वापर करा. प्युरीमध्ये मसाले घालून चांगलं परतून घ्या. यामुळे त्याला रंगही चांगला येईल आणि चविष्टही लागेल. भाजीच्या शेवटी किंवा वाढताना त्यात कोथिंबीर घाला. 
  • कांद्याशिवाय भाजी बनवताना त्यात हिंग जरूर घाला. तसंच फोडणीसाठी जीरं, बडीशोप, मोहरी आणि मेथी अवश्य वापरा. 
  • पनीरचा वापरसुद्धा फ्रेश क्रिम आणि खव्यासोबत किंवा नारळाचा वापरही तुम्ही ग्रेव्ही भाजी बनविण्याकरिता करू शकता.

 

Canva

  • लक्षात घ्या. प्रत्येक भाजीत कांदा घातलाच पाहिजे असं काही नाही. प्रसिद्ध शेफ संजीव कपूरनुसार भारतातील दक्षिण भागात आणि इतरही काही भागात लोकं मोठ्या प्रमाणावर कांद्याशिवाय चविष्ट जेवण बनवतात. तसंही सगळ्या भाज्यांची चव कांदा घातल्याने वाढेलच असंही नाही.

मग पुढच्या वेळी तुम्हीही कांद्याशिवाय रस्सा भाजी बनवून पाहा आणि ती कशी झाली ती आम्हालाही नक्की सांगा. तुम्हाला POPxoMarathi वर कोणत्या रेसिपीज वाचायला आवडतील तेही आम्हाला सांगा. तोपर्यंत वाचा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका.