तुळशीच्या पानांनी खुलवा तुमचे सौदर्य, घरीच करा हा सोपा उपाय

तुळशीच्या पानांनी खुलवा तुमचे सौदर्य, घरीच करा हा सोपा उपाय

तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व असल्याने सर्वांच्या घरात तुळस असतेच. दररोज सकाळी तुळशी वृंदावनाची पूजा करून अनेकांच्या दिवसांची सुरूवात होते. मात्र तुळस जशी धार्मिक विधी,आरोग्य आणि औषधासाठी उपयुक्त आहे तशीच तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठीही फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचा वापर तुम्ही तुमच्या केस आणि त्वचेसाठी करू शकता. यासाठीच जाणून घ्या तुळशीचे सौंदर्यांवर होणारे विविध फायदे

त्वचा मुळापासून स्वच्छ होते -

धुळ, माती, प्रदूषणामुळे त्वचा निस्तेज आणि वयस्कर दिसू लागते. मात्र जर तुमच्या अंगणात  अथवा बाल्कनीमध्ये तुळशीचं रोप असेल तर तुम्हाला चिंता करण्याचं मुळीच कारण नाही. तुळशीच्या पानांमध्ये तुमची  त्वचा मुळापासून स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. तुळस एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे तुळशीच्या पानांचा वापर त्वचेवर केल्यामुळे कोणताही दुष्पपरिणाम होत नाही. उलट यामधील अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे त्वचा  स्वच्छ आणि निर्जंतूकही होते. यासाठी तुळशीची पानं आणि पाणी यांची वाटून चांगली पेस्ट तयार करा. या पानांची पेस्ट त्वचेवर लावा आणि पंधरा मिनीटांनी चेहऱ्या स्वच्छ धुवून टाका. पार्लरच्या कोणत्याही ट्रिटमेंटपेक्षा या उपायाने तुमची त्वचा  नितळ आणि चमकदार दिसू लागेल. 

Shutterstock

पिंपल्स कमी होण्यासाठी फायदेशीर -

एक्ने अथवा पिंपल्स ही तुमच्या सौंदर्यात बाधा आणणारी एक त्वचा समस्या आहे. मात्र आजकालच्या जीवनशैलीत घरातील एकाला तरी एक्नेचा त्रास सहन करावाच लागतो. शिवाय जर तुमची त्वचा तेलकट अथवा अती संवेदनशील असेल तर पिंपल्स दूर करणं एक कठीणच काम आहे. मात्र चिंता करू नका कारण आता तुळशीच्या पानांच्या फेसपॅकने तुम्ही तुमची ही समस्या दूर करू शकता. यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट, चंदन पावडर आणि गुलाबाचं पाणी एकत्र करा आणि छान फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता. 

चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी -

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरूणपणीच चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र जर तुम्हाला कोणत्याही वयात चिरतरूण दिसायचं असेल तर घरात तुळशीचं रोप नक्कीच लावा. कारण दररोज पाण्यातून तुळशीची पाने उकळून त्याचा रस दररोज घेतल्यास तुमची त्वचा डिटॉक्स होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील तारूण्य सदाबहार राहण्यास मदत होऊ शकते. शिवाय सकाळी उपाशीपोटी तुळशीचा काढा घेतल्याने तुमचे आरोग्यदेखील उत्तम राहील. 

केसांचे वाढ चांगली होते -

केस गळत असतील तर त्यामागे अनेक कारणे कारणीभूत असू शकतात. केसांंमधील कोंडा, कोरडे आणि निस्तेज केस, केसांना फाटे फुटणे अशी त्यामागची अनेक कारणे असू शकतात. यासाठी  केसांचे योग्य पोषण होणे फार गरजेचे आहे. केसांचे आरोग्य वाढवण्यासाठी आणि लांबसडक केस मिळवण्यासाठी तुम्ही केसांना तुळशीचे पानांचा रस लावू शकता. यासाठी वाटीभर तुळशीच्या पानांचा रस काढून घ्या. या रसात काही थेंब लिंबाचा रस टाका. हा रस केसांच्या मुळांना लावा आणि वीस ते तीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य नक्कीच चांगले होऊ शकते. 

Shutterstock

तोंडाची दुर्गंधी दूर होते -

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीची पानं खूप मदत करतात. ही एक प्रकारे नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचं काम करतात. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुळशीची काही पाने पाण्यात उकळून घ्या आणि मग पाणी थंड करून त्याने चूळ भरा. असं केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होईल. याचप्रमाणे दररोज सकाळी उठल्यावर तुळशीची पाने चघळल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.