आर्थ्रायटिसच्या रुग्णांनी घरीच घ्या अशी स्वतःची काळजी, आहाराकडे द्या लक्ष

आर्थ्रायटिसच्या रुग्णांनी घरीच घ्या अशी स्वतःची काळजी, आहाराकडे द्या लक्ष

लॉकडाऊनमुळे सध्या आर्थ्रायटिसचा त्रास असलेल्या रूग्णांचा त्रास नक्कीच वाढला असणार मात्र संधिवातावर घरगुती उपाय करून तुम्ही तुमची सांधेदुखी कमी करू शकता. दी नी क्लीनिकचे अस्थिविकार आणि गुडघेविकार शल्यविशारद, डॉ मितेन शेठ यांच्या सल्ल्यानुसार “आपला गुडघा हा चार वेगवेगळी हाडे मिळून तयार होतो. याबरोबर मांसपेशी, ‘टेंडन्स’, ‘कार्टीलेज’ आणि ‘लिगामेन्ट्स’ यांचाही गुडघा तयार होण्यात समावेश असतो. त्यावर एक ‘सायनोवीयल सॅक’ नावाचे आवरण असते व ते एक द्रव्य तयार करते. त्याला ‘सायनोवियल फ्लुईड’ म्हणतात. गुडघ्याच्या हालचालींसाठी हे द्रव्य अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या शरीराचे संपूर्ण वजन गुडघ्यावर असते. अनेक कारणांमुळे संधिवात निर्माण होतो. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थ्रायटिस असे म्हटले जाते. अनुवंशिकतेबरोबरच वाढलेले वजन, व्यायामाची कमतरता, अपुरे पोषण या गोष्टी देखील गुडघेदुखीला कारणीभूत ठरतात. लॉकडाऊनमध्ये असताना वैद्यकीय मदत न मिळाल्यास जीवनशैलीत असे काही बदल करा ज्यामुळे सांधेदुखीपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. 

Shutterstock

शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा -

अतिव्यायाम तसेच गुडघ्यावर ताण येईल अशा प्रकारचे व्यायाम करणे टाळा. परंतु घरच्या घरी शारीरीक हालचाली, सोपे व्यायाम प्रकार, एरोबिक्स तसेच योगाभ्यास करा. सुरुवातीला काही काही मिनीटे व्यायाम करा नंतर हळूहळू व्यायामाचा वेळ वाढवा. हल्ली सोशल मिडीयाचा वापर करूनही घरच्या घरी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम प्रकार शिकता येऊ शकतात. स्नांयुंना बळकटी आणणे, शारीरीक लवचिकता सुधारणे तसेच तंदुरुस्ती ही व्यायामाची मूळ उद्दीष्ट्ये आहेत.

Shutterstock

पुरेशी झोप घ्या –

शारीरीक थकवा दूर करण्यासाठी तसेच स्नायुंना आराम मिळावा याकरिता पुरेशी झोप घ्या. चांगल्या झोपेकरिता रात्री अंथरुणात पडण्यापुर्वी किमान दोन तास आधी स्मार्ट फोन्स, लॅपटॉपचा वापर करणे टाळा. रात्री उशीरा झोपू नका आणि सकाळी वेळेत उठा आणि शरीराला स्वच्छ सुर्यप्रकाश मिळू द्या.

Shutterstock

पोषक आहार –

आहारतज्ञांनी सुचविल्याप्रमाणे आपल्या आहारात संत्री, ब्रोकोली, फुलकोबी, काळे, बेल बेरी आणि किवीसारखे व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करा. ओमेगा-3 फॅटी एसिड (फिश-प्रेमींसाठी) समृद्ध असलेल्या पदार्थांची निवड करा. ताजी फळे आणि भाज्या, लो फॅट्स डेअरी उत्पादने खा आणि सुकामेवा आणि अवोकॅडोचा देखील आहारात समावेश करा. ग्रीन टी पिणे देखील उपयुक्त ठरेल कारण यामुळे सूज कमी होते. आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे, मैदयाचे पदार्थ, तांदूळ, सॅच्युरेटे आणि ट्रान्स-फॅट शक्यतो टाळाच.

Shutterstock

वजनावर नियंत्रण ठेवा –

झटकन वजन कमी करणे शक्य होत नसले तरी आहे त्या वजनावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. शारीरिक हलचालींकरिता आळस करू नका. घरातल्या घरात सतत कार्यक्षम राहण्याचा प्रयत्न करा. घरच्या घरी या सोप्या नियमांचे पालन करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा. कोविड 19 सारख्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी स्वतःचे संरक्षण करा आणि घरीच रहा.