दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणं का आहे गरजेचं

दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणं का आहे गरजेचं

दिवसभर काम करून थकल्यावर कधी एकदा झोपतो असं प्रत्येकाला होत असतं. बऱ्याचदा थकव्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याचाही कंटाळा केला जातो. एवढंच नाही तर कधी कधी तुम्हाला अगदी साधा चेहरा धुणंही नकोसं वाटत असतं. तुम्हाला अशी सवय असेल तर ती वेळीच बदला. कारण हा आळस तुम्हाला भविष्यात महागात पडू शकतो. यासाठीच कितीही कंटाळा आला तरी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुण्यास मुळीच विसरू नका. आजपासूनच तुमच्या डेली स्कीन केअर रूटीनमध्ये या गोष्टीचा अवश्य समावेश करा. कारण या सवयीमुळे तुमच्या सौंदर्यात आश्चर्यकारक बदल होतील. जाणून घ्या दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ केल्यामुळे काय होऊ शकतं.

Shutterstock

त्वचा मुळापासून स्वच्छ होते -

जर तुम्ही रात्री झोपताना नियमित तुमचा चेहरा स्वच्छ केला तर तुमच्या चेहऱ्याची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. आपल्या त्वचेमध्ये अनेक रोमछिद्रे असतात. ज्यामध्ये दिवसभरात धुळ, माती, प्रदूषण आणि मेकअपचे कण अडकून बसतात. याशिवाय दिवसभर मोबाईल तुमच्या चेहऱ्याच्या सतत संपर्कात येत असतो. असं म्हणतात या मोबाईलवर टॉयलेट कमोडपेक्षा जास्त जीवजंतू टिकून राहू शकतात. सहाजिकच मोबाईलमुळे हे जीवजंतू तुमच्या चेहऱ्याच्या संपर्कात येत असतात. रात्री चेहरा स्वच्छ केल्यामुळे या इनफेक्शनचा धोका नक्कीच कमी करता येऊ शकतो.  

पिंपल्सपासून सुटका होऊ शकते -

चेहऱ्यावरच्या ओपन पोअर्ससोबत जीवजंतूंची संपर्क होतो आणि इनफेक्शन होऊन तुम्हाला पिंपल्सचा त्रास सहन करावा लागतो. तेलकट त्वचेच्या लोकांना  हा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो. मात्र जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी नियमित चेहरा धुण्याची सवय स्वतःला लावली तर यापासून तुमची नक्कीच सुटका होऊ शकते. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेटकटपणा आणि जीवजंतू आपोआप कमी होतील.

Shutterstock

त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो -

झोपण्यापूर्वी चेहरा नियमित धुतल्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. सहाजिकच यामुळे चेहऱ्यावरची रोमछिद्रे मोकळी होतात. या रोमछिद्रांच्या माध्यमातून त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. त्वचेला ऑक्सिजन मिळाल्यामुळे त्वचा फ्रेश दिसते. म्हणून दररोज रात्री आणि सकाळी चेहरा धुण्यामुळे तुम्हाला सकाळी ताजे आणि उत्साही वाटू लागते.

डोळ्यांच्या पापण्या स्वच्छ होतात -

आजकाल आय मेकअपसाठी डोळ्यांवर काजळ, आयलायनर, मस्कारा, आयशॅडो अशा अनेक सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो. या गोष्टी डोळ्यांवर तशाच राहील्या तर डोळ्यांच्या पापण्यांना इनफेक्शन होऊ शकतं. बऱ्याचदा क्लिंझर्सचा वापर करूनही मेकअप व्यवस्थित निघून जात नाही. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा धुण्यास विसरू नका. यामुळे तुमच्या पापण्यांची स्वच्छता देखील राखता येईल.

Shutterstock

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते -

दिवसभरात त्वचेचा धुळ, माती, प्रदूषण, मेकअप, सौंदर्यप्रसाधने अशा अनेक हानिकारक गोष्टींसोबत संपर्क होत असतो. ज्यामुळे त्वचेचं मुळ स्वरूप झाकलं जातं. मात्र रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही चेहरा पाण्याने स्वच्छ करता तेव्हा तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. त्वचेला नैसर्गिक क्लिझिंग, टोनिंग आणि मॉश्चराईझिंग ट्रिटमेंट मिळाल्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते. 

त्वचेला पुर्नजीवन मिळतं -

असं म्हणतात की रात्री त्वचेची पुर्ननिर्मिती होत असते. डेड स्कीन निघून जाणे आणि नवीन त्वचापेशी निर्माण होण्यासाठी आपण शांत आणि निवांत असणं गरजेचं असतं. रात्रीच्या वेळी शांत झोपेत निसर्ग आपले काम करत असतो. मात्र त्यासाठी तुम्ही तुमची त्वचा तयार ठेवणं गरजेचं आहे. रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यामुळे ही प्रक्रिया उत्तम पद्धतीने होऊ शकते.  डेली स्कीन रूटीन फॉलो केल्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजे आणि उत्साही वाटते.