गरोदर महिलांसाठी सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय

गरोदर महिलांसाठी सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय

वातावरणातील बदलांमुळे सर्दी- खोकला अशी आजारपणं येणं स्वाभाविक आहे. मात्र सध्या कोरोनामुळे साध्या सर्दी खोकल्याचीदेखील अनेकांना भिती वाटत आहे. जर तुम्ही गरोदर असाल आणि फक्त वातावरणातील बदलामुळे तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर घरीच काही सोपे उपाय करून तुम्ही तुमचा सर्दी खोकला बरा करू शकता. यासाठी जाणून घ्या गरोदर महिलांसाठी सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय. मात्र लक्षात ठेवा या उपायांनी एक ते दोन दिवसांमध्ये तुमचा सर्दी खोकला बरा झाला नाही तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 

आल्याचा चहा -

आपल्या प्रत्येकाच्या घरी आलं असतंच. आल्यामध्ये भरपूर अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्ही ते एखाद्या अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि व्हायरल, अॅंटिबायोटिकप्रमाणे वापरू शकता. जर तुम्हाला साधा सर्दी खोकला झाला असे तर तुम्ही आल्याचा रस घेऊन त्यावर उपचार करू शकता. याच प्रमाणे आजारी पडू नये यासाठी आहारात आल्याचा वापर जरूर करा. आल्याचा चहा घेतल्यामुळेदेखील तुम्हाला नक्कीच बरे वाटू लागेल. मात्र आल्याचा अती वापर करू नका. कारण आलं उष्ण गुणधर्माचे आहे.

मध आणि हळदीचे चाटण -

मध हे घरात खोकल्यावर उपाय करण्यासाठी हमखास वापरले जाते. कारण त्यामुळे कफ कमी होतो आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. बऱ्याचदा गरोदरपणात तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला खोकला अथवा सर्दी होण्याची शक्यता असते.  असं झाल्यास घरीच थोडसं हळद आणि मधाचे चाटण घ्या. ज्यामुळे तुम्हाला यातून नक्कीच आरााम मिळेल.

Shutterstock

लसूणाचा स्वयंपाकात वापर करा -

लसणामुळे तुमची सर्दी नक्कीच बरी होऊ शकते. कारण लसूण अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि सेप्टिक आहे. काही संशोधनानुसार लसणामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रक्तदाबाची समस्या कमी होते. म्हणूनच आहारात लसणाचा वापर जरूर करा ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही आणि तुमचा रक्तदाबही सुरळीत राहील. 

मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा -

मीठ हे निर्जंतूक असल्यामुळे तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या तुम्ही नक्कीच करू शकता. अशा प्रकारे केलेल्या गुळण्यांमधून तुमच्या घशातील कफ बाहेर पडतो. घसा निर्जंतूक झाल्यामुळे सर्दीमुळे घशात होणारी खवखव कमी होते. नाकाच्या आजूबाजूचा सायनसचा त्रास कमी झाल्यामुळे सर्दीमुळे होणारी डोकेदुखी कमी होते. यासाठी थोडासा खोकला जाणवू लागल्यास लगेच मीठाच्या पाण्याने गुळण्या करा.

गरम पाण्याची वाफ घ्या -

सर्दी झाल्यावर चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणं हा घरच्या घरी करण्यासारखा एक सोपा आणि साधा उपाय आहे. बऱ्याचदा नाकपुड्या, घसा अशा ठिकाणी कफ साठल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. मात्र चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे नाक आणि घसा  मोकळा होतो. यासाठीच त्वरीत हा उपाय करा ज्यामुळे तुमची सर्दी आणि खोकला वाढणार नाही. 

Shutterstock

सर्दी खोकल्यावर हे साधे आणि घरी करण्यासारखे उपाय करा. मात्र जर त्याने लवकर आराम मिळाला नाही तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जर साधे इनफेक्शन असेल तर या घरगुती उपायाने तुम्हाला एक ते दोन दिवसांमध्ये आराम मिळेल. मात्र जर आराम मिळाला नाही तर तुम्हाला त्याच्या मागील इतर कारणांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. गरोदरपणात कोणत्याही आजारपणात हलगर्जी पणा करू नये. कारण आजारपण अंगावर काढण्यामुळे तुमच्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो.