अभिनेत्री काजोल शाहरूख खानच्या या गोष्टींवर आहे फिदा

अभिनेत्री काजोल शाहरूख खानच्या या गोष्टींवर आहे फिदा

देशभरातील लॉकडाऊन आता पुन्हा 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व जनजीवनच जणू ठप्प झालं आहे. मात्र सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्यावरून सर्वजण दूर असूनही सतत संपर्कात राहू शकतात. सेलिब्रेटीजदेखील घरातूनच आणि  या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत.  #Ask या हॅशटॅगचा वापर करत चाहते सध्या त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटीजच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेत आहेत. काही चाहत्यांनी #AskKajol हॅशटॅगच्या माध्यमातून अभिनेत्री काजोलला सोशल मीडियावर काही प्रश्न विचारले होते. ज्याची काजोलने तिच्या बिनधास्त स्वभावाप्रमाणे बेधडक शैलीत उत्तरेदेखील दिली आहेत. मात्र यात काजोलला शाहरूखबाबत विचारलेल्या काही  प्रश्नामुळे पुन्हा एकदा काजोल आणि शाहरूखच्या मैत्रीविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. 

काजोल काय म्हणाली शाहरूख बाबत

#AskKajol च्या माध्यमातून चाहत्यांनी काजोलला अनेक प्रश्न विचारले. ज्यापैकी काही प्रश्न  किंग खान शाहरूखबाबत होते. चाहत्यांनी काजोलला प्रश्न केला होता की तिला शाहरूख मधील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते. यावर काजोलने उत्तर दिलं की, तिला शाहरूखचा उत्साहीपणा आणि त्याची काम करण्याची ऊर्जा फार आवडते. याचप्रमाणे काजोलला आणखी एक प्रश्न  विचारण्यात आला होता. ज्यातही तिचं शाहरूख प्रेम दिसून आलं आहे. काजोलला विचारण्यात आलं होतं की तिला आतापर्यंत तिने साकारलेली कोणती भूमिका सर्वात जास्त आवडली आहे. त्यावर काजोलने उत्तर दिलं आहे की तिला ‘कुछ कुछ होता है मधील ‘अंजली’ आजही खूप आवडते कारण तिच्यामते अंजली थोडीफार काजोल सारखीच आहे. ‘कुछ कुछ होता है’ मध्येही काजोलने शाहरूखसोबत काम केलं होतं. या चित्रपटातील अंजलीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली  होती. काजोलला विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरं तिने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काजोलने दिलेली ही उत्तरं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा काजोल आणि शाहरूखची घट्ट मैत्री आणि केमिस्ट्री जगासमोर आली आहे.

काजोल आणि शाहरूखची केमिस्ट्री

काजोल आणि शाहरूख यांनी अनेक चित्रपटांमधून काम केलं आहे. कुछ कुछ होता है, दिलवाले, कभी खुशी कभी गम, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे अशा अनेक चित्रपटांमधील या दोघांच्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. या दोघांच्या सुपरहिट जोडीला प्रेक्षक नेहमीच चांगला  प्रतिसाद देतात. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर बेस्ट आहेच पण खऱ्या आयुष्यातदेखील ते दोघं एकमेकांचे चांगले आणि जवळचे मित्र आहेत. एकमेकांच्या सुखदुःखात ते दोघंही नेहमी सहभागी होतात. वास्तविक दोघंही आपापल्या संसारात सुखी आणि समाधानी आहेत. मात्र जेव्हा प्रश्न ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचा येतो तेव्हा प्रेक्षकांना काजोल आणि शाहरूखलाच एकत्र पाहायला जास्त आवडतं.