आजकाल प्रत्येकीला निरनिराळ्या ब्रॅंडच्या ब्युटी प्रॉडक्टचं कलेक्शन करण्याची आवड असते. ब्युटी प्रॉडक्टमध्ये अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रॉडक्टचा उपयोग निरनिराळा असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी आजकाल सौंदर्य खुलवण्यासाठी गरजेच्या आहेत. शिवाय आम्हीदेखील तुम्हाला सतत ब्युटी प्रॉडक्टचे नवे ट्रेंड आणि ब्युटी टिप्स शेअर करत असतो. या साधनांची गरज आणि शॉपिंगच्या आवडीमुळे बऱ्याचदा आपल्याकडे इतके ब्युटी प्रॉडक्ट जमा होतात की त्यांचा वापर सतत केला जात नाही. मात्र ब्रॅंडेड ब्युटी प्रॉडक्टस महाग असतात त्यामुळे त्यांची नीट काळजी घ्यावी लागते. निरनिराळ्या शेडच्या लिपस्टिक, नेलपॉलिश, आय मेकअपचे साहित्य हे बरेच दिवस तसंच राहिल्यास वातावरणातील तापमान अथवा आर्द्रतेमुळे खराब होऊ शकतं. ब्युटी प्रॉडक्ट खराब होऊ नये यासाठी ते नेहमी फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. मात्र सर्वच ब्युटी प्रॉडक्ट फ्रीजमध्ये ठेवणं योग्य नसतं यासाठी जाणून घ्या कोणते ब्युटी प्रॉडक्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.
आय क्रीम हे नेहमीच थंड ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं. कारण जर तुमचं आयक्रीम थंडगार असेल तर तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं आणि पफीनेस लवकर कमी होऊ शकतो. यासाठी तुमचं आयक्रीम जास्त दिवस टिकवण्यासाठी आणि थंडगार होण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवा.
लिपस्टिकच्या विविध शेडसचे तुमच्याकडे कलेक्शनच असू शकतं. या सर्व लिपस्टिक तुम्ही एकाच वेळी नक्कीच वापरत नाही. त्यामुळे त्या फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगल्या स्थितीत राहू शकतात. बाहेरील वातावरणात उष्णतेमुळे त्यातील नैसर्गिक घटक लवकर खराब होण्याची शक्यता असते. एवढंच नाही फ्रीजमधली थंडगार लिपस्टिक लावल्यामुळे ती ओठांवरही जास्त काळ राहण्यास मदत होते.
थंडगार फेशिअल मिस्ट अथवा फेशिअल स्प्रे चेहऱ्यावर लावल्यामुळे तुम्हाला लवकर फ्रेश वाटू शकतं. कारण यामुळे तुमच्या त्वचेचा दाह आणि जळजळ कमी होते. शिवाय फ्रीजमध्ये अशी प्रकारची ब्युटी प्रॉडक्ट जास्त काळ टिकतात.
कडक ऊन अथवा उन्हाळा नसेल तर बऱ्याचदा आपल्याला सनस्क्रीन लावण्याचे लक्षात राहत नाही. त्यामुळे ड्रेसिंग टेबलवर महिनोंमहिने ठेवलेलं तुमचं आवडतं सनस्क्रीन खराब होण्याची शक्यता असते. तेव्हा जास्त वापर होत नसेल तेव्हा तुमचं सनस्क्रीन फ्रीजमध्ये ठेवून द्या.
लिक्विड स्वरूपात असलेलं मेकअपच्या साहित्य जास्त काळ उष्ण वातावरणात टिकू शकत नाही. मस्कारादेखील लिक्विड स्वरूपात असते. त्यामुळे जर ते बराच काळ उष्ण अथवा सामान्य तापमानात राहीलं तर खराब होऊ शकतं. डोळे हा एक नाजूक अवयव आहे त्यामुळे आय मेकअपसाठी वापरण्यात येणारा मस्कारा फ्रीजमध्ये सुरक्षित राहू शकतो.
सुर्यप्रकाश अथवा उष्णतेचा संपर्क झाल्यास तुमची फेव्हरेट नेल पॉलिश खराब होऊ शकते. यासाठीच ती जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. शिवाय फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तिचा ओरिजनल रंगदेखील फिका पडत नाही.
नैसर्गिक आणि आयुर्वेदिक घटक असलेले ब्युटी प्रॉडक्ट तुमच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. कारण त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र त्यात सर्व ऑर्गेनिक तत्त्व असल्यामुळे ते टिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केलेला नसतो. ज्यामुळे अशी उत्पादने लवकर खराब होऊ शकतात. यासाठीच ही ब्युटी प्रॉडक्टस नेहमी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त दिवस टिकतील. मात्र लक्षात ठेवा कोणतेही ब्युटी ऑईल अथवा नैसर्गिक तेल फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण तेल फ्रीजमध्ये गोठण्याची शक्यता असते.