चेहऱ्यावर 'फेसपॅक'चा अती वापर केल्यामुळे होतात हे दुष्परिणाम

चेहऱ्यावर 'फेसपॅक'चा अती वापर केल्यामुळे होतात हे दुष्परिणाम

जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या भितीचा परिणाम सध्या आरोग्याप्रमाणाच प्रत्येकाच्या मानसिक स्थितीवरही होत आहे. मनात ताणतणावाचे प्रमाण वाढू लागले की त्याचे दुष्परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही दिसू लागतात. चेहऱ्यावर दिसणारा हा ताण कमी करण्यासाठी बऱ्याचदा ब्युटी थेरपीजचा आधार घेतला जातो. सध्या पार्लरमध्ये जाणे सोयीचे नसल्यामुळे घरातच काहीतरी घरगुती उपाय यासाठी केले जातात. शिवाय बाजारात अथवा मेडिकलमध्ये यासाठी तयार फेसमास्क उपलब्ध असतातच. ज्यांचा अशा वेळी आवर्जून वापर केला जातो. ब्युटी ट्रिटमेंटविषयी असलेल्या अपूऱ्या ज्ञानातून जेव्हा फेसमास्क अथवा फेसपॅक लावले जातात तेव्हा त्याचा त्वचेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. असे अती प्रमाणात चुकीचे फेसपॅक अथवाा फेसमास्क लावणं तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. यासाठी जाणून घ्या जास्त प्रमाणात चेहऱ्यावर फेसपॅकचा वापर केल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. 

चेहऱ्यावर या कारणासाठी लावू नये अती प्रमाणात फेसपॅक -

चेहऱ्यावर कोणता फेसपॅक आणि तो कधी लावावा हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. कारण जेव्हा तुम्ही चुकीचा फेसपॅक चेहऱ्यावर अती प्रमाणात लावता तेव्हा तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. 

चेहऱ्यावर एक्ने येण्याची शक्यता वाढते -

कोणताही फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्याची पॅचटेस्ट घेणं गरजेचं आहे. आजकाल बाजारात नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले फॅसपॅक मिळतात.  घरच्या घरी आणि पटकन करता येण्यासारखा सौंदर्योपचार असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र कोणताही फॅसपॅक लावण्यापूर्वी त्याच्यामध्ये असलेले घटक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही त्वचा तेलकट असेल आणि तुम्ही त्वचेतील तेलाच्या निर्मितीला पोषक घटक असलेला फेसपॅक लावला तर त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स अथवा एक्ने येण्याची शक्यता वाढते.

Shutterstock

पील ऑफ मास्कमुळे होऊ शकतं त्वचेचं नुकसान -

पील ऑफ मास्क सारखे रेडिमेड फेसमास्क वापरणं सोयीचं आणि मजेशीर असलं तरी त्याचा तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो. कारण असे मास्क सतत वापरणं योग्य नाही. कारण त्यामुळे तुमची त्वचा ओढली जाऊन तिचं नुकसान होण्याची शक्यता वाढते. पील ऑफ मास्कमुळे तुमच्या त्वचेच्या वरच्या थरातील पेशींचे नुकसान होऊ शकते. यासाठी असे मास्क महिन्यातून एकदाच वापरावेत.  

Shutterstock

त्वचा राठ होऊ शकते -

फेसमास्कचे अनेक प्रकार आजकाल बाजारात मिळतात. त्यापैकी क्ले मास्क हा एक लोकप्रिय प्रकार आहे. क्ले मास्क तेलकट आणि एक्ने असलेल्या त्वचेसाठी उत्तम असले तरी त्यामुळे तुमची त्वचा राठ होऊ शकते. कारण अतीप्रमाणात वापरलेल्या क्ले मास्कमुळे तुमच्या त्वचेतील मऊपणा कमी होऊ शकतो. 

Shutterstock

त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता वाढते -

फेसमास्कमधील घटक जर तुमच्या त्वचेसाठी पोषक नसतील तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे तुमचा संपूर्ण चेहराच लालसर दिसू लागतो. यासाठीच सतत चेहऱ्यावर निरनिराळे फेसमास्क लावणे कमी करा. 

त्वचा निस्तेज दिसू लागते -

तुमच्या त्वचेला निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात नैसर्गिक तेल  आणि चांगल्या जीवाणूंची आवशक्ता असते. मात्र जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर सतत निरनिराळे फेसमास्क लावता. तेव्हा तुमच्या  चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल हळूहळू कमी होऊ लागते. त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यामुळे तुमचा चेहरा फ्रेश दिसत नाही. 

Shutterstock