निरोगी जीवनशैलीमध्ये व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6) नेहमीच एक महत्त्वाची भूमिका निभावत असते. पण तरीही आपल्या आहारातून हे व्हिटॅमिन घेण्याकडे अनेकजण दुर्लक्षच करतात. जोपर्यंत शरीरात व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता जाणवत नाही तोपर्यंत उपचार केले जात नाहीत. ही आरोग्याबाबत केली जाणारी एक अतिशय दुर्देवाची गोष्ट आहे. खरंतर आहारातून घेतलेल्या सर्वच प्रकारच्या व्हिटॅमिन बी मुळे तुमच्या शरीरातील मॅटॉबॉलिझम सुधारत असते. यामुळे तुमच्या शरीरातील फॅट्स आणि प्रोटिन्सदेखील नियंत्रित राहतात. मात्र तरीही व्हिटॅमिन बी 6 ची तुमच्या शरीराला खास गरज असते. कारण यामुळे तुमच्या शरीरातील हॉर्मोनल संतुलन कायम राहण्यास मदत होते. विशेषतः महिलांच्या शरीराला व्हिटॅमिन बी 6 ची जास्त गरज असते. यासाठीच जाणून घ्या या व्हिटॅमिन बी 6 चे फायदे, दुष्परिणाम आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी.
जाणून घ्या व्हिटॅमिन बी 6 शरीरासाठी का गरजेचं आहे आणि त्याचे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतात.
होमोसिस्टीन हे असे एक अमिनो अॅसिड आहे ज्याचा पूरवठा शरीराला प्रोटिनयुक्त आहारातून मिळत असतो. पण जेव्हा शरीरात अमिनो अॅसिडचे प्रमाण वाढते तेव्हा छातीत जळजळ, ह्रदयविकार अथवा रक्तवाहिन्यांचे विकार होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच एका संशोधनानुसार शरीराला फॉलेटसह व्हिटॅमिन बी 6 चीदेखील फार गरज असते. ज्यामुळे होमोसिस्टीन संतुलित राहण्यास मदत होते. म्हणूनच आहारातून व्हिटॅमिन बी 6 घ्यायलाच हवे.
एका संशोनधनानुसार मेंदूचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठीदेखील शरीराला व्हिटॅमिन बी 6 ची गरज असते असं सिद्ध झालं आहे. कारण व्हिटॅमिन बी 6 मुळे मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्याचा विकास होण्यास मदत होते. तसंच काही संशोधनानुसार या व्हिटॅमिनमुळे अल्झायमर आणि डिमेन्शिया सारखे मेंंदू आणि स्मरणशक्तीशी निगडीत विकार होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
वाचा - व्हिटॅमिन D पुरेपूर मिळाले तर तुम्ही कायम राहाल निरोगी
व्हिटॅमिन बी 6 हे विशेषतः हॉर्मोन्स संतुलित करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. कारण यामुळे शरीरातील प्रोजेस्टेरॉन (Progesterone) या हॉर्मोन्सला चालना मिळते. शिवाय ज्यामुळे (Estrogen) एस्ट्रोजीनची निर्मिती कमी प्रमाणात निर्माण होते. या गोष्टीमुळे तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स संतुलित राहतात आणि याचा सकारात्मक परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होतो.
आधीच सांगितल्याप्रमाणे व्हिटॅमिन बी 6 मुळे तुमच्या मेंदूचे कार्य सुरळीत सुरू राहते. ज्याचा परिणाम तुमच्या विचार, भावना, कल्पना यांच्यावर होतो. मन शांत आणि निवांत राहण्यास मदत झाल्यामुळे तुमचा मूड सुधारतो. ज्यांना सतत नैराश्य, शारीरिक वेदना, थकवा, चिडचि़ड, उदासिनता, अशक्तपणा, अंगदुखी जाणवत असेल अशा लोकांसाठी व्हिटॅमिन बी 6 फारच उपयुक्त ठरू शकते.
जर तुम्ही अॅनिमियाचे रूग्ण असाल तर तुम्हाला व्हिटॅमिन बी 6 ची नककीच गरज आहे. कारण यामुळे तुम्हाला सतत जाणवणाऱ्या थकवा, अशक्तपणा, अंगदुखी सारख्या गोष्टींमधून आराम मिळू शकतो. ज्यांना अॅनिमिया आहे त्यांनी व्हिटॅमिन बी 6 चा पूरवठा होईल असा आहार घ्यायला हवा.
व्हिटॅमिन बी6 च्या अभावामुळे दृष्टीसमस्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे इतर व्हिटॅमिन्स प्रमाणे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन बी6 चीदेखील तितकीच आवशक्ता आहे हे मुळीच विसरू नका. डोळ्यांचे आरोग्य राखायचे असेल तर नियमित असाच आहार घ्या जो तुमच्या शरीरासाठी पोषक असेल.
काही संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता असेल तर तुम्हाला आर्थ्राटीस आणि इतर दुखणी वाढण्याचा धोका अधिक असू शकतो. त्याचप्रमाणे अशा आजारातील रुग्णांनी इतर सप्लीमेंट्स सोबत व्हिटॅमिन बी 6 घेतल्यास त्यांना हाडांमध्ये होणारा दाह, सूज अशी लक्षणे कमी करण्यास मदत होऊ शकते.
वाचा - जाणून घ्या केस आणि त्वचेवर होणारे 'व्हिटॅमिन ई' चे फायदे
व्हिटॅमिन बी 6 महिलांच्या हॉर्मोन्स संतुलनासाठी फार आवश्यक असते. सहाजिकच महिलांना मासिक पाळीच्या समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. मासिक पाळीत अनेक महिलांना पोटात दुखणे, छातीत दुखणे, डोकेदुखी, कंबर आणि पाठदुखी, मळमळ, उलटी, क्रॅम्प्स, थकवा अशा समस्या जाणवतात. मात्र या व्हिटॅमिनमुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. यासाठी या काळात महिलांना बी कॉम्लेक्स व्हिटॅमिन घेण्याचा सल्ला दिला जातो.
ज्यांना झोपेच्या समस्या असतात किंवा त्यांना झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपच येत नाही यांच्यासाठी हे फार महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. झोपेच्या गोळ्यांचा परिणाम हळू हळू त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दिसण्यास सुरूवात होते. पण जर तुमच्या शरीराला व्हिटॅमिन बी 6 चा योग्य पूरवठा झाला तर तुम्हाला झोपेच्या समस्या कमी जाणवतात.
एका संशोशनानुसार व्हिटॅमिन बी6 मुळे गरोदरपणी होणारा मॉर्निंग सिकनेस कमी होण्यास मदत होते. अनेक गरोदर महिलांचे याबाबत निरिक्षण केले असता व्हिटॅमिन बी6 घेणाऱ्या गरोदर महिलांवर याचा चांगला परिणाम झालेला दिसून आला आहे.
शरीराला व्हिटॅमिन बी 6 चा पूरवठा करण्यासाठी हाय क्वालिटी सप्लीमेंट घेणं जरी चुकीचं नसलं तरी ते योग्य आहेच असं नाही. कारण अन्नाच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी 6 चा पूरवठा नक्कीच करता येऊ शकतो. यासाठी जाणून घ्या यासाठी कोणता आहार घ्यावा.
जर तुमच्या शरीराला व्हिटॅमिन बी 6 चा योग्य पूरवठा नाही झाला तर याचे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येऊ शकतात. यासाठी आहारात दूधाचा वापर जरूर करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच नियमित दूध घेणं फार गरजेचं आहे. गाय, म्हैस आणि बकरीच्या दूधामध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12 आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोज सकाळी नाश्ता करताना आणि रात्री झोपताना दूध घेण्यास विसरू नका.
नियमित दोन अंडी खाण्यामुळे तुमच्या शरीराला दररोज लागणाऱ्या व्हिटॅमिन बी 6 चा पूरवठा होऊ शकतो. शिवाय यामुळे तुमच्या शरिराला प्रोटिन्स आणि इतर पोषकमुल्येही मिळतात. अंडे हे एक सर्व पोषकमुल्यांचा खजिना असलेले एक सुपरफूड आहे. तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, ब्रंच अथवा डिनर कोणत्याही वेळी अंडे खाऊ शकता.
वाचा - शरीरात विटामिन सी ची असेल कमतरता, नियमित प्या हे ज्युस
एका मध्यम आकाराच्या गाजरामुळे तुम्हाला एक ग्लास दूधातुन मिळणाऱ्या पोषणा इतके पोषण मिळू शकते. यातून तुम्हाला व्हिटॅमिन बी 6 तर मिळतेच शिवाय फायबर्स आणि व्हिटॅमिन ए देखील मिळू शकते. तुम्ही गाजर कच्चे खाऊ शकता, त्याचा सलाड अथवा कोशिंबिरीसाठी वापर करू शकता किंवा ज्यूस, स्मूदी करूनही ते पिऊ शकता. गाजरापासून निरनिराळ्या रेसिपीज ट्राय करा आणि शरीराला लागणाऱ्या व्हिटॅमिन बी6 ची गरज भागवा.
व्हिटॅमिन बी 6 मुळे शरीरात अॅंटिबॉडीज निर्माण होतात. ज्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या इनफेक्शन आणि आजारांपासून संरक्षण मिळते. पालक मध्ये सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी 6 असतं. त्याचप्रमाणे पालकमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीदेखील असते. शिवाय पालकमध्ये लोहदेखील मुबलक असते. यासाठी आहारात नियमित पालकचा समावेश करा. भाजी, सूप, डाळ, सलाड, टिक्की, कबाब, भजी अशा विविध प्रकारे पालकचा तुम्ही स्वयंपाकासाठी वापर करू शकता.
रताळं हे बटाट्याप्रमाणेच एक कंदमुळ असूनही शरीरासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून तुम्हाला दिवसभरासाठी पुरेसे व्हिटॅमिन बी 6 मिळू शकते. शिवाय याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशियम असते. यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोनदा आहारात रताळ्याचा समावेश करा.
चिकनमधील यकृतचा भाग हा सर्वांना आवडत असेलच असं नाही. मात्र लक्षात ठेवा चिकन लिव्हर तुमच्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे. यामधुन तुम्हाला प्रोटिन्स, फोलॅट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटमिन बी 6 भरपूर प्रमाणात मिळते. चिकन लिव्हर परवडण्यासारखे तर आहेच शिवाय ते चवीलाही लज्जतदार लागते. यासाठी आहारात याचा समावेश करा.
मटारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. पण एवढंच नाही तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन बी 6 देखील असते. जर तुम्ही फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर मटार आणि गाजर साठवून ठेवले तर तुम्हाला कोणत्याही सिझनमध्ये याची भाजी मिळू शकते.
केळं हे असं एक फळ आहे जे कोणत्याही सिझनमध्ये उपलब्ध होऊ शकतं. शिवाय ते फार महागडेदेखील नाही. एका मध्यम आकाराच्या केळ्यातून तुमच्या शरीराला दिवसभर पुरेसे व्हिटॅमिन बी 6 मिळू शकते. त्यामुळे यापुढे तुम्हाला जेव्हा कधी भुक लागेल तेव्हा मधल्या वेळेत खाण्यासाठी केळं हा पर्याय निवडा. ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होईल.
काबुली चणे अथवा छोले सारख्या कडधान्यांमुळे तुम्हाला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन बी 6 मिळू शकते. शिवाय काबुली चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स आणि प्रोटिन्सदेखील असते. भारतीयांमध्ये या चण्यांचा भाजीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पंजाबी छोले ही अनेकांची आवडती डिश असू शकते. तेव्हा आहारात काबुली चणे असतील याची नियमित काळजी घ्या.
जर तुम्हाला निरनिराळी फळं खाण्याची आवड असेल तर अॅव्होकॅडो हे फळ तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे. कारण यामध्ये अनेक पोषकमुल्यं दडलेली आहेत. एखाद्या क्रीमप्रमाणे दिसणाऱ्या या फळाच्या गरात व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी याचप्रमाणे फायबर्स आणि हेल्दी फॅट्सदेखील असतात. अॅव्हॉकॅडो तुम्ही सलाड, ज्युस आणि स्मूदीमध्ये वापरू शकता.
रावस अथवा Salmon या माशामध्ये व्हिटॅमिन बी 6 चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. शरीराच्या वाढीसाठी व्हिटॅमिन बी 6 खूप गरजेचे आहे. कारण शरीराच्या वाढीचा आणि शरीरातील हॉर्मोन्सचा जवळचा संबध असतो. अशा वेळी आहारात अशा प्रकारचे सर्व पदार्थ असतील याची काळजी घ्यायला हवी ज्यामुळे शरीराचे योग्य पोषण होईल.
व्हिटॅमिन बी 6 मदत करते. हिमोग्लोबिन म्हणजे असे एक प्रोटिन जे तुमच्या शरीरातील रक्ताला ऑक्सिजनचा पूरवठा करते. यासाठी आहारात व्हिटॅमिन बी 6 युक्त आहार असायला हवा, टुना या माशामध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 6 मिळते. यासाठी या माशाचाही आहारात समावेश करायला हवा.
आहारातून व्हिटॅमिन बी 6 चा पूरवठा होत नसेल अथवा व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता असेल तर डॉक्टर सप्लीमेंट स्वरूपात हे व्हिटॅमिनचा सल्ला देतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून व्हिटॅमिन बी 6 सप्लीमेंट घेऊ नये. कारण याचा तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. जर शरीरात याचे प्रमाण जास्त झाले तर त्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या कार्यावर आणि परिणामी संपूर्ण आरोग्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित आहारातून व्हिटॅमिन बी 6 घ्या. सप्लीमेंट स्वरूपात घ्यायचे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
व्हिटॅमिन बी 6 च्या अतिरेकामुळे तुमच्या शरीरात झोपेच्या समस्या, डोकेदुखी, पोट बिघडणे, भुक कमी लागणे, डोळे दुखणे, हातापायाची जळजळ अशी लक्षणे आढळू शकतात. या प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
व्हिटॅमिन बी 6 मुळे झोप न येण्याची समस्या कमी होते का ?
व्हिटॅमिन बी 6 चा अभाव असलेल्या लोकांना नैराश्य, झोपेच्या समस्या जाणवतात. ज्यामुळे अशा लोकांना आराम मिळण्यासाठी आणि त्यांच्या शरीरातील हॉर्मोन्स संतुलित करण्यासाठी व्हिटॅमिन बी 6 सप्लीमेंटचा उपचार देण्यात येतो. मात्र जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण त्यामागचे कारण समजून घेतल्याशिवाय कोणतेही सप्लीमेंट घेणे योग्य नाही.
पौढ व्यक्तीने किती प्रमाणात व्हिटॅमिन बी 6 घ्यावे?
अठरा वर्षांवरील पौढ पुरुषांना 1.3 मिग्रॅ आणि प्रौढ महिलेला 1.2 मिग्रॅ व्हिटॅमिन बी 6 ची गरज असते. गरोदर महिला, स्तनपान देणाऱ्या महिला आणि वृद्ध व्यक्तींमध्ये व्यक्तीनुसार याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.
आहारातून पुरेसे व्हिटॅमिन बी 6 मिळत आहे कसे समजते ?
वर दिलेल्या माहितीनुसार तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 6 युक्त पदार्थांचा समावेश करा. असे पदार्थ खाऊनदेखील जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 6 चा अभाव असलेली लक्षणे आढळत असतील तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ला घ्या.