फाटलेल्या दुधाचे पनीरच नाही तर येणारे पाणीही आहे फायदेशीर

फाटलेल्या दुधाचे पनीरच नाही तर येणारे पाणीही आहे फायदेशीर

घरात कधीतरी असं होतं की आपण दूध गरम करायला ठेवतो आणि विसरून जातो अथवा कधीतरी दूध गरम करायलाच विसरतो. त्यामुळे बरेचदा दूध गरम केल्यावर ते फाटतं. पण फाटलेलं दूध तुम्हाला टाकयची काहीच गरज नाही. आपण त्याचं पनीर बनवतोच. घरातील गृहिणीला याचं गणित व्यवस्थित माहीत असतं. पण या दुधातून पनीर काढल्यानंतरही बऱ्याचदा पाणी वाचतं. मग अशावेळी तुम्ही या पाण्याचा काय बरं वापर करता? की हे पाणी फेकून देता. जर तुम्ही हे पाणी फेकून देत असाल तर तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की या पाण्याचा आरोग्यासाठीही फायदा होतो. हो हे खरं आहे. दूध आपल्यासाठी एक पोषक आहार आहे मात्र ते फाटल्यानंतर आपण त्याचे पनीर बनवतो. पण पनीर केल्यानंतरही त्याचे काही पाणी उरते. जे तुम्ही फेकू नका. तुम्ही त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेऊ शकता. पण आता या पाण्याचा वापर कसा करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याची माहिती  आम्ही तुम्हाला देत आहोत. 

स्वादासह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते पनीर, जाणून घ्या फायदे

फाटलेल्या दुधाच्या पाण्याचे करा 5 उपयोग आणि फायदे

Shutterstock

1. फाटलेल्या दुधातील जे पाणी शिल्लक राहते त्यातून तुम्ही त्वचेची काळजी करू शकता. या पाण्यामुळे तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम तर राहतेच त्याशिवाय तुम्ही जेव्हा आंघोळ करणार असाल त्यातही तुम्ही हे पामी मिक्स करून घेऊ शकता. त्यामुळे तुमची त्वचा अधिक मॉईस्चराईज राहण्यास  मदत मिळते. साबणापेक्षाही याचा जास्त चांगला उपयोग तुमच्या त्वचेसाठी होतो. फाटलेल्या दुधाचे हे पाणी तुम्ही त्वचेसाठी वापरल्यास, तुमची त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसते. या पाण्यात मायक्रोबीएल गुणधर्म आढळतात. जे तुमच्या त्वचेतील आणि केसांमधील पीएच स्तर राखण्यास मदत करतात. तसंच या पाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणारी मुरुमं जाण्यासाठीही मदत मिळते. 

2. तुमचे केस कोरडे असतील आणि जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही फाटलेल्या दुधातून पनीर काढून घेतल्यानंतर जे  पाणी राहते त्याचा उपयोग करू शकता. केसांना शँपू करण्याआधी तुम्ही हे पाणी केसांना एकदम व्यवस्थित लावा आणि साधारण 10 - 15 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर तुम्ही गरम पाण्याने केस धुवा. यामध्ये थोडा तेलकटपणा असल्यामुळे थंड पाण्याने केस स्वच्छ न करता गरम पाण्याच उपयोग करा. यामुळे कोंडा जाण्यास आणि तुमचे केस मऊ  आणि मुलायम होण्यास मदत मिळते. 

पनीरच्या शोधाची ही रंजक कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

 

Shutterstock

3. तुम्ही जिममध्ये जात असाल आणि तुम्ही योग्य डाएट फॉलो करत असाल तर तुमच्यासाठी फाटलेल्या  दुधाचे हे पाणी उत्तम प्रोटीन आहे. कोणत्याही ज्युससह हे पाणी मिक्स करून तुम्ही पिऊ शकता. यातून तुमच्या शरीराला उत्कृष्ट प्रोटीन मिळते. 

4. तुम्हाला कणीक भिजवतानाही या पाण्याचा उपयोग करता येतो. पनीर काढून उरलेले पाणी तुम्ही फेकून देऊ नका तर तुम्ही या पाण्याने आपल्या पोळीसाठी लागणारी कणीकही भिजवू शकता. या पाण्याने भिजवलेल्या कणकेच्या पोळ्या या अधिक मऊ होतात आणि त्याशिवाय त्या अधिक पौष्टिक असतात. तुम्ही एकदा हा प्रयोग करून पाहा. तसं केल्यानंतर पुन्हा कधीही तुम्ही हे पाणी वाया जाऊ देणार नाही. कारण या पोळ्या अधिक सुंदर होतात. 

5. फाटलेल्या दुधातील पाणी तुम्ही भात शिजवण्यासाठी अथवा पास्ता बनविण्यासाठीही वापरू शकता. या पाण्याने तयार केलेला पास्ता हा उत्तम बनतो. कारण त्यामध्ये पनीरचा स्वादही उतरतो आणि पास्त्याचे क्रिम अधिक छान लागते. याची चव अधिक चांगली लागते. तुम्हाला जर सूप प्यायला आवडत असेल तर याचा वापर तुम्ही सूप तयार करण्यासाठीही करू शकता. 

स्वादिष्ट रेसिपीजसाठी घरीच असं तयार करा पनीर