धुतल्यानंतर अशी सुकवा पालेभाजी, नाही होणार लवकर खराब

धुतल्यानंतर अशी सुकवा पालेभाजी, नाही होणार लवकर खराब

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने सर्वजण घरात अडकून पडले होते. या काळात भाजीबाजार करणं एक अतिशय कठीण काम झालं होतं. कारण एकतर बाजारात भाज्या उपलब्ध नव्हत्या शिवाय त्या घरी आणून स्वच्छ धुवून अथवा निर्जंतूक करून घ्यावा लागत होत्या. आता अनलॉकमुळे बाजारात भाज्या सहज उपलब्ध होत असल्या तरी कोरोनाचा कहर काही कमी झालेला नाही. त्यामुळे आठवडा भरासाठी एकदाच भाजी आणि फळं विकत आणून ती स्वच्छ आणि निर्जंतूक करून ठेवण्याची सवयच सर्वांना लागली आहे. फळं, फळभाज्या आणि कडधान्य स्वच्छ करून फ्रीजमध्ये टिकवणं त्यामानाने सोपं आहे. मात्र पालेभाजी कशी टिकवून ठेवावी हा एक मोठा गहन प्रश्नच आहे. कारण पालेभाजी धुतली की ती लवकर खराब होते. अशा प्रकारे धुतलेली पालेभाजी आठवडाभर फ्रीजमध्ये कशी टिकवून ठेवायची हे जाणून घेण्यासाठी ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरू शकते.

पालेभाजी धुण्यासाठी आणि सुकवण्यासाठी टिप्स

पावसाळ्यात पालेभाजीमध्ये चिखल आणि माती अधिक प्रमाणात असते. शिवाय कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सध्या घरात बाहेरून आणलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ धुवून अथवा निर्जंतूक करूनच घ्यावी लागते. पालेभाजी घरात आणल्यावर ती मीठाच्या अथवा खाण्याच्या सोडा घातलेल्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे तिच्या मुळांमधील चिखल आणि माती निघून जाईल शिवाय मीठ अथवा सोड्यामुळे ती निर्जंतूक होईल. पाणी निथळून पालेभाजी थोडी सुकल्यावर ती निवडून घ्या आणि थंड पाण्याने पुन्हा धुवून एखाद्या कोरड्या, स्वच्छ आणि सुती कापडावर पसरवून ठेवा. लक्षात ठेवा पालेभाजी फारच नाजूक असल्यामुळे ती रगडून अथवा खसखसून धुवू नका नाहीतर ती लवकर खराब होऊ शकते. निवडलेली पालेभाजी फॅनखाली अथवा वाऱ्यावर कापडावर पसरवून ठेवा. थोड्यावेळाने भाजीच्या पानांवरील पाणी सुकून ती कोरडी होईल. पावसाळी दिवसांमध्ये पूर्ण दिवसभर अशाप्रकारे तुम्ही भाजी सुकवू शकता. सुकलेली पालेभाजी कापड, कागद  अथवा फ्रीजमध्ये भाजी स्टोअर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅग अथवा डब्ब्यात भरून ठेवा. अशी सुकवलेली पालेभाजी दोन ते तीन दिवस चांगली राहू शकते.

Instagram

वॉशिंग मशीनमध्ये भाजी कशी सुकवावी

तुम्हाला जर पालेभाजी एक आठवडाभर टिकवायची असेल तर तुम्ही ती वॉशिंग मशीनमध्ये टिकवून शकता. यासाठी एका भांड्यात मीठ अथवा सोडा टाका आणि त्यात भाजी स्वच्छ धुवून घ्या. एका सुती कापडामध्ये धुतलेली पालेभाजी गुंडाळा आणि वरच्या बाजूने कापडाच्या गाठोड्याला सैलसर गाठ मारा. वॉशिंगमशीन स्पीन मोडवर ठेवा. पाच ते दहा मिनीटांसाठी वॉशिंग मशीनमध्ये पालेभाजी गुंडाळलेले गाठोडे ठेवून द्या. वेळ वाचवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या पालेभाज्या धुवून ही गाठोडी तुम्ही एकाच वेळी वॉशिंग मशीनमध्ये स्पीन करू शकता. वॉशिंग मशीनमध्ये सुकवलेली पालेभाजी अतिशय कोरडी आणि सुटसुटीत होते. अशा प्रकारे सुकवलेली पालेभाजी फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकू शकते. पालेभाजी सुकवण्याची ही पद्धत कितीही सोपी असली तरी ती सुरक्षित आहे का हे मात्र प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर ठरवावे. कारण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत असल्यामुळे ती भाजी सुकवताना निर्जंतूक असेलच असं नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा उपाय करायचा का नाही हे प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीवर ठरवावे. 

Instagram