Shravan Month 2020 Dates - श्रावण महिन्यात येणारे सण, उपवास आणि त्याचे महत्त्व घ्या जाणून | POPxo

श्रावण महिन्याचे महत्त्व आणि यातील महत्त्वाचे उपवास (List of Festivals In Shravan Month)

श्रावण महिन्याचे महत्त्व आणि यातील महत्त्वाचे उपवास (List of Festivals In Shravan Month)

श्रावण महिना म्हटला की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. देवीची पूजा, मंगळागौर, श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, श्रावण महिन्याची माहिती तशी तरी सगळ्यांनाच असते. पण त्यातही मंगळागौर म्हटलं की मंगळागौर माहिती, मंगळागौरीची आरती ही सगळी मजा कशी डोळ्यासमोर येते. पण खरं तर श्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे व्हायला लागतात आणि श्रावण महिना सुरू झाला की वर्ष पटापट संपायला सुरूवात होते अशी सर्वांचीच भावना असते. या महिन्यापासून अनेक उपवास सुरू होतात. अगदी श्रावणी सोमवार, मंगळागौरीचा उपवास, श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण एकापाठोपाठ एक लागून येतात. यावर्षी श्रावण चालू होत आहे तो 21 जुलैपासून (Shravan Month 2020) आणि पहिलाच येत आहे मंगळागौरीचा वार तर श्रावण महिना संपेल 19 ऑगस्ट रोजी.. या महिन्यातील प्रत्येक सणाला एक वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी वेगळे व्रत आणि वेगळी पूजा असते. या महिन्यात प्रत्येकाच्या घरी लगबग चालू असते आणि सर्वात महत्त्वाचं  म्हणजे श्रावणात सहसा मांसाहार केला जाता नाही. पूजाअर्चा आणि हा कालावधी माशांच्या पैदास होण्याचा असल्यामुळे या काळात मांसाहार शक्यतो टाळला जातो. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे श्रावणातील वेगवेगळ्या पूजा साजऱ्या होतात. त्याआधी आपण पाहूया श्रावण महिन्याचे नक्की काय महत्त्व आहे. 

Table of Contents

  श्रावण महिन्याचे महत्त्व (Importance of Shravan)

  श्रावण महिन्याचे महत्त्व-Importance-of shravan month in marathi
  Instagram

  श्रावण महिना (shravan month) हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना असून या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असल्यामुळे या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो.  वास्तविक या महिन्यात खूपच उपवास केले जातात. त्यापैकी महत्त्वाचा  उपास म्हणजे  श्रावणी सोमवार. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा आणि सणांचा राजा असे म्हटले जाते. श्रावण महिन्यात प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या तरी देवतेची पूजा अथवा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे. या महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. श्रावण हा चतुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने या महिन्याला अधिक महत्त्व आहे. यामध्ये अनेक धनवान व्यक्तीही प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत गोरगरिबांना भोजन देतात आणि पुण्य मिळवतात असे मानले जाते. दान करण्यासाठी हा महिना  उत्कृष्ट समजला जातो. तसंच या महिन्यात ब्राह्मणांकडून अनेक ठिकाणी अनेक व्रत करून पूजा करून घेण्यात येतात. त्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येते. 

  तारीख आणि उपवासांसह श्रावण महिन्यातील सणांची यादी (List of Festivals In Shravan Month 2020 & Dates)

  तारीख सण
  21 जुलै मंगळागौर व्रत आरंभ
  24 जुलै नाग चतुर्थी उपवास
  25 जुलै नागपंचमी
  27 जुलै श्रावणी सोमवार आरंभ आणि दुर्गाष्टमी
  28 जुलै कुमारिका देव पूजा
  1 ऑगस्ट शनि त्रयोदशी
  3 ऑगस्ट नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन
  7 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी
  11 ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमी
  12 ऑगस्ट गोपाळकाला (दहीहंडी)
  18 ऑगस्ट दर्श पिठोरी अमावास्या

  श्रावण महिन्याच्या खरं तर प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा आणि सण साजरे करण्यात येतात. हा महिना संपूर्ण व्रतवैकल्यांनी भरलेला आहे. मात्र याचे नक्की महत्त्व काय  आहे हे आताच्या पिढीला माहीत नसते. त्यांना माहीत करून देण्यासाठी आम्ही हा लेख लिहित आहोत. श्रावण महिन्यातील सण आणि त्यांचे महत्त्व इथे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 

  श्रावणी सोमवार

  श्रावणी सोमवार
  instagram

  या वर्षी श्रावणी सोमवार - 27 जुलै, 3 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट

  सोमवार हा शंकर देवाचा वार समजण्यात येतो. श्रावण महिन्यातील सोमवारी शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात आणि देवांचा देव असणाऱ्या महादेवाला प्रसन्न करून आयुष्यात चांगला नवरा मिळावा यासाठी उपवास करण्यात  येतो. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव अर्थात शंकराच्या मंदिरांमध्ये विशिष्ट पद्धतीने पूजा आणि अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यातील शंकराच्या पूजेला खूपच फलदायी मानण्यात  आले आहे. श्रावण महिना म्हणजे महादेवाच्या उपासनेचा महिना मानण्यात येतो. त्यामुळे या महिन्यात महादेवाची भक्ती केल्यास त्याची चांगली फलप्राप्ती होते असा समज आहे. 

  तसेच या सोमवारीच एक कहाणीदेखील सांगितली जाते. देवी सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला आणि त्यापूर्वी देवी सतीन शंकराला प्रत्येक जन्मात पती मिळविण्यासाठी प्रण केला होता. दुसऱ्या जन्मात तिने पार्वतीच्या रूपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न्  केले आणि विवाह केला. त्यामुळेच श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करता येणे सोपे आहे असं मानले जाते.  या महिन्यात सुयोग्य वरप्राप्तीसाठी अनेक कुमारिका व्रत करतात. 

  वाचा - विविध सण आणि पूजेसाठी खास उखाणे (Marathi Ukhane For Pooja)

  श्रावणी मंगळवार अर्थात मंगळागौर

  या वर्षी श्रावणी मंगळवार - 21 जुलै, 28 जुलै, 4 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 18 ऑगस्ट

  नव्या लग्न झालेल्या अर्थात नववधू हे मंगळागौरीची आरती करून मंगळागौरीची पूजा करतात. आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे यासाठी हे व्रत करण्यात येते. लग्न झाल्यानंतर पहिले पाच वर्ष हे व्रत करून नंतर त्याची सांगता करायची असते. इतर सौभाग्यवती महिलांना बोलावून एकत्रित पूजा करण्यात येते आणि रात्री जागर करून हे व्रत करतात. जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळले जातात. लाट्या बाई लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं अशी प्रचलित गाणी म्हणत वेगवेगळ्या गाण्यांनी हा खेळ रंगतो. नऊवारी साडी नेसून, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून ही पूजा केली जाते. अगदी नटूनथटून एकत्र जमून मंगळागौरीची पूजा साजरी करण्यात येते. सकाळी आंघोळ करून ही पूजा करण्यात येते. यामध्ये पार्वतीच्या धातूच्या मूर्तीची पूजा मांडण्यात येते. मंगळागौरीची षोडषोपचारे पूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटण्यात  येतो. त्यानंतर सर्व सवाष्णींना भोजन देण्यात येते. शंकर आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानण्यात येते.  'गौरी गौरी सौभाग्य दे ' अशी प्रार्थना करतात .सामूहिकरीत्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो आणि सगळेच एकत्र येऊन मजा करतात. 

  श्रावणी शुक्रवार

  श्रावणी सोमवार
  instagram

  या वर्षी श्रावणी शुक्रवार - 24 जुलै, 31 जुलै, 7 ऑगस्ट, 14 ऑगस्ट

  श्रावणी शुक्रवारालाही तितकेच महत्त्व आहे. दर शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे वस्त्र, दुर्वा वाहून त्यांची माळ करतात.  पूजा करून पुरणाचा नेवैद्य दाखवण्यात येतो आणि आरती म्हटली जाते. संपूर्ण श्रावणात जिवतीची पूजा करण्यात येते. तर घरातील लहान मुलांना औक्षण करण्यात येते. सुवासिनी आणि माहेरवाशिणींनाही घरी बोलावण्यात येऊन हळदीकुंकू वाहून त्यांची पूजा करण्यात येते. तिची खणानारळाने ओटी भरून लक्ष्मीसमान पूजा करण्यात येते. तर यामध्ये घरात दूध - साखर, साखरफुटाणे, गूळ - चणे वाटण्यात येते. तसंच काही ठिकाणी ओला हरभरा आणि ओल्या खोबऱ्याच्या तुकड्यांची खिरापत देण्याचीही पद्धत आहे. ही पूजा  मुलांच्या सुखरूपतेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी करण्यात येते. 

  हरिपूरची श्रावणी यात्रा

  श्रीरामचंद्राच्या पावन स्पर्शाने समृद्ध झालेल्या कृष्णा आणि वारणेच्या संगमाच्या तिरावर श्रीक्षेत्र हरिपूरमध्ये श्रावणी यात्रा भरते.  हरिपूर हे निसर्गाने नटलेले सांगली नजीकचे टुमदार गाव आहे. या यात्रेची महती गेले कित्येक वर्ष सांगितली जाते. टांग्यातून जाणे या जत्रेचे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील चारही सोमवारी ही जत्रा भरते. यासाठी सांगली,  सातारा, कोल्हापूर या अनेक ठिकाणाहून भक्त येतात. तर तरूणवर्गासाठीही ही यात्रा खास आकर्षण असते. संगमावर नौकाविहार करणं हादेखील एक सुखद अनुभव आहे. कृष्णेतून संथ आणि वारणेच्या जोरदार प्रवाहातून पुढे जाणारी होडी असं हे अप्रतिम आकर्षण असतं. तसंच साखरेची खेळणी हेदेखील येथील वैशिष्ट्य आहे. इथे असणारी महादेवाची  पिंड ही खूपच प्रसिद्ध असल्याने श्रावण महिन्यात या यात्रेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर इथे यात्रेचा जल्लोष असून दर सोमवारी अगदी शाळा - महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात  येते. 

  हरियाली अमावस्या अर्थात श्रावण अमावास्या

  श्रावण अमावास्या अर्थात पिठोरी अमावास्या - 18 ऑगस्ट

  श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अमावस्येला हरियाली अमावस्या म्हटले जाते.  देशातील अनेक ठिकाणी या दिवसाला पर्यावरण संरक्षण दिवस म्हणूनही मानले जाते आणि हा दिवस साजरा करण्यात येतो. श्रावण महिना शंकराला प्रिय असल्याने या दिवशीदेखील शंकराची खास पूजा आणि आराधना करण्यात येते. तसंच हा दिवस शेती करणाऱ्या व्यक्तींसाठी अर्थात शेतकऱ्यांसाठी खूपच खास मानला जातो. या दिवशी लावलेल्या झाडांची वाढ चांगली होते असे समजण्यात येते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या दिवशी वृक्षारोपण करण्यात येते. या दिवसापासून शेतीची कामं चालू करण्यात येतात. तसंच ही अमावास्या पितरांसाठी महत्त्वाची मानण्यात येते. या दिवशी पितरांची पूजाही करण्यात येते. 

  हरियाली तीज

  हरियाली तीज - 23 जुलै 

  श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतियेला हा सण उत्तर भारतात साजरा केला जातो.  हा उत्सव विशेषतः महिलांसाठी असून श्रावण महिन्यात जेव्हा आपली संपूर्ण सृष्टी निसर्गाने आच्छादित असते तेव्हा त्याचे आभार मानण्यासाठी महिला नृत्य करतात. झाडांच्या शाखांमध्ये  जाऊन आपला आनंद व्यक्त केला जातो. सौभाग्यवती महिलांसाठी हा खूप मोठा  सण मानला जातो. शिव आणि पार्वतीच्या पुनर्मिलनाचा दिवस असा या दिवसाला समजण्यात येऊन प्रेम, सौंदर्य आणि आशादायी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सगळीकडेच हिरवळ अर्थात हरियाली असल्यामुळे या दिवसाला हरियाला तीज असे म्हटले जाते. लोकगीत गाऊन आणि झोपाळा तयार करून महिला हा सण साजरा करतात. 

  मकर संक्रांत नक्की का साजरी करतात, जाणून घ्या अथपासून इतिपर्यंत

  नागपंचमी

  श्रावणी सोमवार
  instagram

  नागपंचमी - 25 जुलै

  श्रावण महिन्यातील अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हा सण. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करून घेण्याची पद्धत आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी हा सण खूपच मोठा असतो. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून श्रीकृष्णाने सर्वांना मुक्त केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.  त्यामुळे या दिवशी नागपंचमी साजरी करून कृष्णाची आठवण करण्यात येते. तेव्हापासून नागाची पूजा प्रचलित झाले असा समज आहे. 

  तसंच दुसरी आख्यायिका अशी की,  एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत पावली त्यामुळे त्यावर नागदेवतेचा कोप झाला. तेव्हापासून शेतकरी या दिवशी शेतात नांगरत नाहीत, खणत नाही आणि भाजी चिरत नाहीत अथवा तव्याचा वापर करत नाहीत. या दिवशी दूध, लाह्या आणि गव्हाच्या खिरीचा नेवैद्य दाखवून आपले संरक्षण करण्यासाठी नागदेवतेला सांगण्यात येते. तसेच या सणाच्या निमित्ताने नवविवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन जाण्यासाठी पहिल्यांदा  येतो अशी पद्धत भारतामध्ये विशेषतः गावांमध्ये रूढ आहे.  कारण यानंतर पहिलाच सण येतो तो म्हणजे रक्षाबंधन. 

  रक्षाबंधन

  रक्षाबंधन - 3 ऑगस्ट

  भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण. ज्याची वर्षभर भाऊ आणि बहीण दोघेही आतुरतेने वाट पाहात असतात. श्रीकृष्णाच्या हाताच्या  बोटाला जखम झाली तेव्हा पांडवांची पत्नी असणारी मात्र श्रीकृष्णाची बहीण द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून त्याच्या बोटाला बांधली होती. तेव्हापासून श्रीकृष्णाने तिला बहीण मानून आजीवन तिची रक्षा केली, अशी आख्यायिका आहे. 

  हिंदू संस्कृतीनसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येतो. या  दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याला दीर्षायुष्य लाभो अशी प्रार्थना करते. तर पूर्वीच्या काळी स्त्री जेव्हा स्वतःला असुरक्षित समजत असे तेव्हा ती अशा व्यक्तीला राखी बांधत असे जो तिची रक्षा करू शकेल. राखी बांधण्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. 

  कृष्ण जन्माष्टमी

  कृष्ण जन्माष्टमी - 11 ऑगस्ट

  कृष्ण जन्माष्टमी हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेमध्ये देवकी - वसुदेवच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाचा संहार करणारा म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतात अगदी जल्लोषात साजरी करण्यात येते. त्याचा दुसरा दिवस म्हणजे गोपाळकालाही खूपच उत्साहात साजरा करण्यात येतो. हा श्रावण महिन्यातील सर्वात मोठा सण असून कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी बऱ्याच जणांकडे उपवासही केला जातो. दहीकाला अर्थात दह्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिक्स करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडण्यात येतो. श्रीकृष्णाला आवडणाऱ्या सर्व गोष्टी या दिवशी करण्यात येऊन हा सण अतिशय आनंदाने साजरा करण्यात येतो. भारतभर दहीहंडी फोडूनदेखील हा दिवस साजरा करण्यात येतो. या सणानंतर श्रावण महिन्यातील सणांची समाप्ती होते. मात्र संपूर्ण महिनाभर श्रावणातील सण आणि त्याची लगबग चालू राहते.