घरात प्राणी पाळणं हा एखाद्याचा छंद असू शकतो अथवा आवड. पाळीव प्राण्यांवर (Pet) जीवापाड प्रेम करणारे अनेक लोक आज समाजामध्ये आहेत. जर तुम्हीही असे प्राणी प्रेमी असाल आणि तुमच्या घरी तुमचे आवडते पाळीव प्राणी असतील तर तुम्ही खूपच लकी आहात. कारण थकून भागून जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा घरात शिरताच क्षणी तुमचे हे जीवलग (Pet) तुमचं अगदी प्रेमाने स्वागत करतात. या प्राण्यांमुळे तुमचा दिवसभराचा थकवा आणि कंटाळा एका क्षणात दूर होऊ शकतो. खरंतर पाळीव प्राणी माणसापेक्षा जास्त इमानदार असतात ते तुमची आयुष्यभर साथ देतात. जर तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील तर तुम्हाला कधीच एकटं पडण्याची भिती वाटत नाही.
पाळीव प्राणी पाळणं हा तुमचा छंद असला तरी तुम्हाला हे माहीत आहे का तुमचे आवडते प्राणी पाळणं हे तुमच्यासाठी शुभ देखील ठरू शकतं. वास्तुशास्त्र आणि पुराणातील काही संदर्भानुसार काही प्राणी तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येतात. तुमचे हे पाळीव प्राणी तुमच्यासाठी नक्कीच लकी ठरू शकतात. तुमचं गुडलक एखाद्या पाळीव प्राण्यात दडलेलं असू शकतं. तुमचं घर म्हणजेच वास्तूमध्ये काही प्राणी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यासाठी जाणून घ्या कोणते प्राणी घराच्या भरभराटीसाठी पाळायला हवेत. जर तुम्म्हाला गुडलक हवं असेल तर आम्ही दिलेली ही पाळीव प्राण्यांविषयी माहिती अवश्य वाचा
पाळीव प्राणी कुत्रा हा अतिशय प्रामाणिक आणि इमानदार आहे हे आपण लहापणापासून ऐकलं असेल. घराची राखण करण्यासाठी, शिकारीसाठी, गुन्हेगारीच्या तपासणीसाठी आणि प्राण्यांची आवड म्हणून कुत्रा पाळला जातो. कुत्र्यांच्या अनेक प्रजाती जगभरात प्रसिद्ध आहेत. काही विशिष्ठ व्यांधीसाठी कुत्र्यांचा वापर ‘थेरपी डॉग’ म्हणून केला जातो. संशोधकांनुसार कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यासाठी मदत करतो. मात्र एवढंच नाही वास्तुशास्त्र सांगतं की, कुत्रा पाळण्यामुळे तुमच्या घरातील आजारपणदेखील कमी होऊ शकतं. घरात मानसिक आणि शारीरिक आरोग्य राहण्यासाठी तुमच्या घरातील टॉमी, बुलेट, डॉगी, टायगर कारणीभूत ठरू शकतात. तेव्हा घरामध्ये कुत्रा पाळा आणि निरोगी आयुष्य जगा. वास्तुतज्ञ्जांच्या मते जर तुमच्या घराचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल अथवा शौचालयाची दिशा चुकीची असेल तर घरात कुत्रा पाळा. एवढंच नाही जर तुम्हाला घरात कुत्रा पाळणं शक्य नसेल तर अशा लोकांनी भटक्या कुत्र्यांना खाऊ दिल्यास त्यांचा वास्तुदोष कमी होऊ शकतो.
मांजर म्हणजेच तुमच्या लाडक्या माऊवर तुमचे जीवापाड प्रेम असते. बऱ्याच घरात उंदीर येऊ नयेत म्हणून मांजर पाळली जाते. कारण उंदीर हे मांजराचे प्रमुख भक्ष्य आहे. मांजरीला वाघाची मावशी असंही म्हणतात. मात्र लक्षात ठेवा घरात दूध पिऊन ताणून झोपलेल्या या मांजरीमुळे तुमच्या घरात सुख नांदू शकते. मांजर हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे मांजर पाळल्यामुळे तुमच्य घरावर लक्ष्मीमाता प्रसन्न होऊ शकते. जर तुमच्या घराची रचना चुकीची असेल तर वास्तुतज्ज्ञ काळी मांजर पाळण्याऐवजी पांढऱ्या रंगाची मांजर पाळण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष कमी होऊ शकतात. भुतदया म्हणून पाळीव प्राणी पाळणं नेहमीच चांगलं मात्र हे तुमच्या घराच्या भरभराटीसाठीदेखील फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत होतं का?
घरात मासे पाळण्याची अनेकांना आवड असते. कधीकधी फक्त घराच्या इंटेरिअरचा एक भाग म्हणून अनेकजण घरात फिशटॅंक ठेवतात. मात्र लक्षात ठेवा मासे हे जरी थंड रक्ताचे असली तरी त्यांची पाण्यामधली सतत होणारी सळसळ तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते. त्यामुळे फिशटॅंकमध्ये माशांची सळसळ जितकी वेगात असेल तितकीच तुमच्या घराची प्रगती वेगात होणार. असं म्हणतात की, मासे पाळणे तुमच्या घरातील मंडळींच्या आरोग्य आणि सुखासाठी फायदेशीर ठरतात. तेव्हा फक्त घराची शोभा वाढवण्यासाठी नव्हे तर घराला सुख समाधान मिळण्यासाठीही घरात मासे पाळा.
'ससा तो ससा की कापुस जसा' हे गाणं आपण लहाणपणी नक्कीच ऐकलं असेल. पण काही लोकांना हा कापसासारखा दिसणारा मऊ मऊ पाळीव प्राणी फार आवडतो. ससा सर्वजण पाळत नसले तरी अनेकांना ससा पाळण्याची आवड नक्कीच असू शकते. ससा घरी पाळणं ही एक सुंदर भावना तर आहेच पण एवढंच नाही हा ससा तुमच्या घरात सुख आणि समाधानही आणू शकतो. असं म्हणतात ससा पाळणाऱ्या लोकांना थायरॉईड ग्रंथींचे विकार होत नाहीत. म्हणूनच जर तुम्हाला थायरॉईड ग्रंथीची समस्या असेल तर ससा पाळा आणि निरोगी व्हा.
पोपट हा तुमच्या आवडीचा पक्षी नक्कीच असेल. हिरवाकंच रंग, लाल चोच आणि गळ्यावर लालसर पट्टा असणारा पोपट पिंजऱ्यात पाळणं हा अनेकांचा छंद असतो. घरातील पोपटाला काही शब्द शिकवले की तो पाहुण्यांसमोर ते गोड आवजात बोलून दाखवतो. त्यामुळे पोपट पाळण्यामुळे मनोरंजनही छान होते. पोपट अनेक लोक पाळत असले तरी वास्तुशास्त्रानुसार पोपट पाळणं मुळीच योग्य नाही. पिंजऱ्यात ठेवलेला हा पोपट तुमच्या घराच्या भरभराटीसाठी नाही तर दुःखासाठी कारणीभूत ठरू शकतो. घरासाठी बॅडलक म्हणजे पोपट पाळणे होय. पोपटामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. उद्योगधंद्यांमध्ये नुकसान, मुलीचा सासरी छळ होणे अथवा मुलांच्या प्रगतीत बाधा येणे असे दोष यामुळे येऊ शकतात. तेव्हा शक्य असल्यास पोपटाला मोकळं सोडा अथवा घरात पोपटाचे चित्र अथवा शिल्प ठेवा. लक्षात ठेवा गुडलक हवं असेल तर पोपट पिंजऱ्यात ठेवून मुळीच पाळू नका.
कासव विष्णूचा अवतार असल्यामुळे कासव पाळणे हे नक्कीच शुभ मानले जाते. जिथे कासव असते तिथे विष्णूमागे लक्ष्मीमाताही वास करते अशी मान्यता आहे. मात्र जिवंत कासव हा पाळीव प्राणी नसून एक वन्यजीव आहे. सरकारी नियमानुसाक वन्य जीवांना घरात पाळण्याची परवानगी नाही. त्यामुळे जर तुम्हाला घराच्या भरभराटीसाठी कासव हवे असेल तर तुम्ही ते प्रतिकात्मक रुपात ठेवू शकता. तुमचं घर जर प्रशस्त आणि ग्रामीण भागात असेल तर अंगणातील विहीरीमध्ये तुम्ही जिवंत कासव पाळू शकता. मात्र घरात मात्र तुम्हाला कासवाचे प्रतिकच ठेवावे लागेल.
उंदीर मामा यांना हिंदुधर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे कारण उंदीर हे गणपती बाप्पाचे वाहन आहे. त्यामुळे बऱ्याचदा गणेशोत्सव सुरू असताना उपद्रवी असूनही उंदीर मारणे पाप समजले जाते. मात्र उंदीर फार मोठ्या प्रमाणावर पाळले नक्कीच जात नाहीत. पांढऱ्या रंगाचे उंदीर मात्र उपद्रवी नसल्याने पाळण्याची प्रथा आहे. कारण हे पांढऱ्या रंगाचे उंदीर घरामध्ये सुख समृद्धी आणतात अशी समजूत आहे. तरिही हे उंदीर मोकळे सोडण्याऐवजी पिंजऱ्यात ठेवून पाळले जातात.
गिनीपिग या प्राण्याचा उल्लेख पिग म्हणजे डुक्करासारखा असा होत असला तरी याचा डुक्कर या प्राण्याशी काहीही संबध नाही. या प्राण्याची उत्पत्ती भारताबाहेरील देशांमध्ये होत असल्याने तो पाळण्याची प्रथा भारतात नाही. मात्र तरिही अनेक देशांमध्ये हा प्राणी अथवा कुत्रा अथवा मांजर याप्रमाणेच पाळला जातो. याचं महत्त्वाचं कारण तो घरासाठी सुखसमृद्धी आणतो अशी एक समजूत आहे.
हॅमस्टर हा प्राणी देखील उंदीराप्रमाणे दिसणारा असून तो युरोप आणि आशियातील काही भागात आढळतो. गिनीपिग प्रमाणे हॅमस्टरही प्रयोगशाळेत संशोधनासाठी वापरण्यात येतात. त्यामुळे परदेशात हा प्राणी पाळला जातो. इतर प्राण्यांप्रमाणे घरात गुडलक येण्यासाठी या प्राण्याला पाळलं जातं. वास्तूनुसार या प्राण्यांची मागणी परदेशात मोठ्या प्रमाणावर आहे.
बेडूक हा प्राणी पाळीव नसल्याने त्याला पाळण्याची पद्धत नाही. पावसाळ्यात घरी आलेल्या बेडकाला बाहेर काढले जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात बेडूक असणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात बेडूक पाण्यात असताना जो आवाज काढतो त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येऊ शकते. शिवाय बेडकामुळे तुमच्या घरातील माणसं एकत्र येतात शिवाय घरातील ताणतणाव कमी होतो. म्हणूनच घरातील समस्या दूर करण्यासाठी घरात बेडकाचं प्रतिक ठेवा.
कबूतर हा सुंदर पक्षी असला तरी त्याचा आवाज फारच कंटाळवाणा असतो. त्यामुळे कबूतर पाळणं लोकांना आवडतंच असं नाही. मात्र असं असलं तरी ज्यांना डिम्नेशिया अथवा अर्थांगवायूचा त्रास आहे अशा लोकांनी कबूतर पाळल्यास त्यांना लवकर बरे वाटू शकते. स्मृतीभ्रंश अथवा स्मरणशक्तीच्या समस्या असलेल्या लोकांनी कबूतर पाळणे शुभ असू शकते.
1. कोणता प्राणी वास्तुसाठी शुभ मानला जातो ?
घरासाठी बेडूक हा प्राणी अतिशय शुभ मानला जातो. जिवंत बेडूक पाळणं शक्य नसलं तरी वास्तुशास्त्रानुसार बेडकाचे प्रतिक घरात नक्कीच ठेवता येऊ शकते. असं म्हणतात की, तीन पायांचा बेडूक घरात ठेवण्यामुळे घरात सुख समृद्धी येते.
2. घरासाठी कोणता पक्षी शुभ मानला असतो ?
वास्तुशास्त्रानुसार करकोचा हा पक्षी घरासाठी शुभ मानला जातो.
3. कोणता पक्षी मृत्यूचे प्रतिक आहे ?
वास्तुशास्त्रानुसार कावळा, घुबड, टिटवी, फिनिक्स हे पक्षी मृत्युचे प्रतिक मानले जातात.
4. कोणते पाळीव प्राणी माणसचा मित्र असतो ?
कुत्रा हा पाळीव प्राणी माणसाचा मित्र असतो. कुत्रा हा सर्वात जास्त इमानदार पाळीव प्राणी आहे.
5. कोणते पाळीव प्राणी एकटे राहू शकतात ?
उंदीर, गिनीपिग, हॅमस्टर हे प्राणी एकटे राहू शकतात.
6. घरातील लहान मुलांसाठी कोणते पाळीव प्राणी योग्य असतात ?
कुत्रा, मांजर असे अनेक पाळीव प्राणी आहेत जे तुमच्या घरातील लहान मुलांसाठी योग्य ठरतात. मात्र शक्य असल्यास ते लहान असताना त्यांना हाताळण्यास द्यावेत. ज्यामुळे ते त्यांना सहज उचलू शकतात. एकदा पाळीव प्राण्यांची तुमच्या मुलांसोबत मैत्री झाली की ते त्यांना कधीच त्रास देत नाहीत.