माणसाची सध्या बदलेली जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देत असते. मात्र आयुर्वेदशास्त्रात आहाराबाबत सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास आजारी पडण्याचा धोका कमी होतो. आयुर्वेदातील या जीवनशैलीमुळे आरोग्य तर निरोगी राहतेच शिवाय तुम्हाला दीर्घायुष्यही प्राप्त होऊ शकते. कारण आपल्या आहाराचा शरीरावरच नाही तर मनावरही तितकाचपरिणाम होत असतो. सहाजिकच तुम्ही काय खाता, कसं खाता, कधी खाता आणि किती खाता हेही तितकंच महत्वाचं आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत आयुर्वेदानुसार काही जेवणाबाबत असलेले नियम शेअर करत आहोत. ज्याचा तुम्हाला आजारपणांपासून दूर राहण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो.
जीवनशैलीत झालेले बदल, अती काम, चुकीच्या सवयी यामुळे जेवणाच्या वेळा बदलल्या आहेत. दुपारी बारा आणि सांयकाळी सहा ते सात या दोन वेळा जेवणासाठी योग्य असतात. मात्र या वेळी न जेवता नको त्या वेळी मिळेल ते खाण्याची सवय लोकांनी स्वतःला लावून घेतली आहे. ज्याचा परिणाम हळूहळू तुमच्या आरोग्यावर पडू लागतो. जेवणाची योग्य वेळ न पाळल्यामुळे तुम्हाला कधीही भुक लागते. ज्यामुळे तुम्ही काहीही मिळेल ते आणि आहारासाठी योग्य नसलेले पदार्थ खाता. अशा वेळी भुक दाबून ठेवली तरी तरी त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा, थकवा, दृष्टीदोष, चक्कर अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यासाठीच जेवणाच्या वेळा पाळा आणि मधल्या वेळी भुक लागल्यास फळे, सुकामेवा असे पौष्टिक पदार्थ खा.
बऱ्याचदा खाण्यासाठी वेळ मिळेल अथवा नाही या भितीने तुम्ही भुक नसतानाही जेवता. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण जर तुम्हाला भुक लागलेली नाही याचा अर्थ तुमच्या पोटातील अन्नाचे अजून पचन झालेले नाही. जेव्हा तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पचन होते तेव्हा शरीरात पाचकरस निर्माण होतो आणि तुम्हाला पुन्हा भुक लागते. भुक लागलेली नसतानाच खाण्यामुळे तुम्हाला अपचन, पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, अती लठ्ठपणा अशा समस्या जाणवू शकतात.
निरोगी राहण्यासाठी कमीतकमी दुपारी बारा ते एक आणि रात्री आठच्याआधी जेवण करणं गरजेचं आहे. मात्र जर तुम्हाला या वेळ पाळणं शक्य नसेल तर कमीत कमी दुपारी व्यवस्थित जेवा आणि रात्री अर्धपोटी राहा. कारण आयुर्वेदानुसार पाचक रस अथवा पाचक अग्नी हा सुर्याप्रमाणे असतो. हा रस दिवसा कार्यरत असतो. पण जर तुम्ही संध्याकाळी आणि रात्री भरपूर जेवला तर तुम्हाला वात आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो. सर्वात उत्तम सकाळी भरपूर नाश्ता करा, दुपारी व्यवस्थित जेवा आणि रात्रीच्या वेळी अर्धपोटी जेवा.
तुपामुळे अन्नपदार्थ शुद्ध आणि सात्विक होतात. म्हणूनच प्राचीन काळापासून तुपाचा वापर औषधाप्रमाणे केला जातो. तुपामुळे तुमच्या पोटातील पाचकरस उत्तेजित होतो आणि तुपाच्या पोषणामुळे शारीरिक क्षमताही वाढते. जे लोक नियमित तूप खातात ते नेहमी चिरतरूण दिसतात. कारण तुपामध्ये अॅंटिएजिंग तत्व आढळतात. याचाच अर्थ तुम्ही आजारपणांपासून नक्कीच दूर राहता. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स होण्यासाठी तुप खाणं गरजेचं आहे.
प्रत्येकाच्या शरीराची अन्नग्रहण करण्याची आणि पचवण्याची एक शारीरिक क्षमता असते. एखाद्या पदार्थ आवडतो म्हणून अथवा चवीला चांगला लागला म्हणून तो जास्त प्रमाणात खाणे टाळा. कारण त्यामुळे तुमच्या शरीरातील पचनक्रिया बिघडते. यासाठी तुमचा नेहमीचा आहार घेण्याचे प्रमाण दररोज फॉलो करा. एखाद्या खास दिवसासाठी त्यामध्ये कोणताही बदल करू नका. असं म्हणतात की, कल्पनेने तुमच्या अन्नग्रहण करण्याच्या क्षमतेचे चार भाग करा. यातील एक भाग पचनक्रियेसाठी रिकामा ठेवा आणि तीन भागच अन्न ग्रहण करा. थोडक्यात पोट पुर्ण भरेल इतकं न खाता थोडं रिकामं राहील याची काळजी घ्या. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल.
आजकालच्या धकाधकीच्या काळात एक वेळ तयार करून दोन वेळा खाणे अथवा रात्रीचे उरलेले अन्न सकाळी फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी गरम करून खाणे याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम तुमच्या आहाराप्रमाणेच शरीर आणि आरोग्यावर होतो. यासाठी शक्य असेल तेव्हा ताजे आणि गरम अन्न खाण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहील.
डायनिंग टेबल, खुर्चीवर जेवणं हा आणखी एक जीवनशैलीचा भाग बनला आहे. मात्र आयुर्वेदानुसार खाली बसून मांडी घालून जेवणे हेच उत्तम आहे. शिवाय जेवताना टिव्ही अथवा इतर गोंधळ असू नये. शांत वातावरणात अन्नपदार्थांचा रंग, वास, चव याचा आनंद घेत जेवण्यामुळे ते पदार्थ लवकर पचतात.त्याचप्रमाणे घाईघाईत जेवू नये. प्रत्येक घास व्यवस्थित चावून तो खावा. शिवाय असं जेवल्यामुळे तुमचं मनही प्रसन्न राहण्यास मदत होते.
बऱ्याच लोकांना जेवताना प्रत्येक घासाला घटाघटा पाणी पिण्याची सवय असते. मात्र आपले शरीर हे वात, पित्त आणि कफ या तीन प्रकृतीने तयार झालेले असते. अशा प्रकारे जेवताना पाणी पिण्यामुळे हे तीनही दोष असतुंलित होतात. शिवाय पाचक रस डायल्यूट झाल्यामुळे अन्नाचे पचनही व्यवस्थित होत नाही. म्हणूनच जेवताना कधीच पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी आणि जेवनानंतर कमीत कमी अर्धा तासाने पाणी प्यावे. शिवाय पाणी पिताना ते घटाघट न पिता घोट घोट असे प्यावे.