तान्ह्या बाळाच्या पोषणासाठी कोविड काळातही करावे स्तनपात, फायदे

तान्ह्या बाळाच्या पोषणासाठी कोविड काळातही करावे स्तनपात, फायदे

तान्ह्या बाळाच्या पोषणाची व विकासाची सुरुवात त्याला मिळालेल्या स्तनपानातून होते. स्तनपानाचे जे फायदे बाळाला व आईला होतात, त्यांचे महत्त्व जोपासण्यासाठी ‘राष्ट्रीय स्तनपान महिना’ साजरा करण्यात येतो. मात्र सध्या ‘कोविड-19’च्या साथीच्या काळात बाळाला स्तनपान देण्याबद्दल अनेक चिंता व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे तान्ह्या बाळाला स्तनपान करण्याबाबत अनेक महिलांमध्ये गैरसमजही पसरले आहेत. मात्र याबाबत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. नेहा पवार यांनी या काळातही स्तनपान देण्याची शिफारस केली आहे आणि आई व बाळ यांच्यातील या बंधाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. डॉ. नेहा पवार यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी ‘POPxo मराठी’ च्या वाचकांसाठी सांगितल्या आहेत. तुम्हीही या गोष्टी नमूद करून ठेवल्यास, तुम्हालाही फायदा मिळेल.

आईच्या दुधामुळे नवजात बालकांना मिळते परिपूर्ण सुदृढ सुरुवात

कोविड काळातही कसे करावे स्तनपान

Shutterstock

नव्याने माता बनलेल्या ज्या स्त्रियांना ‘कोविड-19’ची लागण झाल्याचा संशय आहे किंवा ज्यांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आलेली आहे, त्या भयंकर तणावाखाली आहेत आणि बाळाला स्तनपान कसे द्यायचे, याबद्दल त्यांच्या मनात अनेक शंकाकुशंका आहेत; तथापि, बाळ जन्माला आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्याला स्तनपान द्यायला हवे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेले आहे. 

 • प्रसूती झाल्यानंतर एका तासाभरातच बाळाला स्तनपान द्यावे, तसेच बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत त्याला स्तनपानच देत राहावे.
 • स्तनपान देण्यापूर्वी आईने आपल्या हातांची व्यवस्थित स्वच्छता करणे आवश्यक आहे. बाळाला घेण्यापूर्वी व नंतरही तिने आपले हात कमीतकमी 40 सेकंद तरी धुवायला हवेत, तसेच स्तनपान देताना मास्कही घालायला हवा. 
 • तान्ह्या बाळांना ‘कोविड-19’ची बाधा होण्याची शक्यता खूप कमी असते आणि स्तनपानामुळे बाळाला जे लाभ होतात, त्याने ही कोविडची जोखीम आणखीनच कमी होते. 
 • अंगावरचे दूध हे बाळासाठी अतिशय पौष्टिक असते. त्याने बाळाची प्रतिकारशक्तीही वाढते. बाळामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली किंवा त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तरी त्याला आईने स्तनपान देत राहणेच हिताचे आहे. 
 • आईने स्वतःला आणि बाळालादेखील गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहायला हवे. केवळ डॉक्टरांकडे जाण्यासाठीच त्यांनी घराबाहेर पडावे. 
 • बाळाच्या देखभालीसाठी आईच्या बरोबरीने केवळ एकच काळजीवाहू दाई असावी. त्यामुळे बाळाच्या आईला पुरेशी विश्रांती मिळू शकेल व इतर कोणताही संसर्ग तिला होणार नाही. 
 • आईने पुरेसे पाणी व द्रवपदार्थ घेऊन आपले शरीर शुष्क होणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच सर्व प्रकारच्या सकस व संतुलित अन्नाचे सेवन करावे. 
 • बाळाच्या आईची प्रकृती बिघडली व तिला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ लागला, तरी ती आवश्यक दक्षता घेऊन बाळाचे स्तनपान करू शकते. ती अगदीच जास्त आजारी पडली, तर अंगावरचे दूध एखाद्या स्वच्छ भांड्यात काढून ते बाळाला पाजावे. अशावेळी ‘वेट नर्सिंग’ हा दुसरा एक उपाय आहे. आईची प्रकृती सुधारली, की ती पुन्हा बाळाला पाजू शकते. 
 • पावडरचे कृत्रिम दूध, पाणी व मध, दुधाच्या बाटल्या, ‘पॅसिफायर्स’ यांचा वापर पहिल्या सहा महिन्यांत बाळासाठी टाळावा. या गोष्टींमुळे, विशेषतः पावडरच्या दुधामुळे बाळाला जंतूसंसर्ग होण्याची जास्त शक्यता असते.  

आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का

स्तनपानाचे फायदे

Shutterstock

 • स्तनपानाचे बाळाला खूप फायदे होत असतात आणि त्याचबरोबर आईलादेखील लाभ होतात. स्तनपान देण्यामुळे आईच्या अंगातील अतिरिक्त उष्मांक (कॅलरीज) कमी होतात आणि गरोदरपणात वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. 
 • स्तनपान दिल्यामुळे आईच्या शरिरात ‘ऑक्झिटोसिन’ हा अंतस्राव तयार होतो. या अंतस्रावामुळे गर्भाशय आकुंचन पावते व त्याचा आकार गरोदरपणापूर्वी होता, तेवढा होण्यात मदत होते. 
 • बाळाला स्तनपान देण्याच्या निश्चित वेळा नसतात. त्याला जेव्हा हवे, तेव्हा ते दिले पाहिजे. 
 • स्तनपानामुळे आई व बाळामधील भावनिक बंध घट्ट होण्यास मदत होते.  
 • स्तनपानाच्या निमित्ताने आई व बाळ यांच्यात शारिरीक जवळीक होते, ती बाळाच्या एकूणच स्वास्थ्यासाठी चांगली असते. बाळाचा जन्म झाल्यावर आणि त्यानंतरही स्तनपानाच्या वेळी आई व बाळ हे दिवसरात्र एकमेकांच्या सहवासात राहावेत व त्यांचा एकमेकांना सतत स्पर्श होत राहावा. कांगारूची मादी पिल्लाला जशी आपल्या पोटाशी धरून राहते, तसेच आईने बाळाला अगदी छातीशी कवटाळून ठेवावे. त्यातून बाळाला मायेची ऊब मिळत राहते.  

जाणून घ्या स्तनपान देणाऱ्या नवमातांनी कोणती फळे खावी

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा