हेअर स्पानंतर केस कायम चमकदार दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

हेअर स्पानंतर केस कायम चमकदार दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

प्रत्येकीला आपले केस सुंदर दिसावे असं वाटत असतं. केस सिल्की आणि स्मूथ करण्यासाठी 'हेअर स्पा'चा नक्कीच चांगला फायदा होतो. लॉकडाऊननंतर आता  सलॉन सुरू झाले असल्यामुळे तुम्ही सुरक्षेची काळजी घेत सलॉन स्टाईल हेअर स्पा करू शकता मात्र हेअर स्पा केल्यावर या चुका करणं टाळा. नाहीतर तुम्ही एवढे पैसे खर्च करून केलेला महागड्या हेअर स्पाचा काहीच फायदा होणार नाही.

 

हेअर स्पानंतर टाळा या चुका

हेअर स्पा केल्यानंतर काय करावे आणि काय करणे टाळावे यासाठी ही माहिती अवश्य वाचा.

तेलकट आणि तिखट खाद्यपदार्थ खाणे -

हेअर स्पा केल्यावर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनातील काही केमिकल्स स्पानंतर तुमच्या केसांमधून तुमच्या त्वचेमध्ये उतरतात. काही काळ या केमिकल्सचा परिणाम तुमच्या शरीरावरही होत असतो. म्हणूनच या केमिकल्सचा प्रभाव कमी होण्यासाठी  आणि तुमच्या शरीरातून ती डिटॉक्स होण्यासाठी हेअर स्पा केल्यावर काही दिवस पोषक आहार घेणं गरजेचं आहे. यासाठी हेअर स्पा केल्यानंतर कोणतेही तिखट, चमचमीत आणि तळलेले पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी खिचडी, ओटमील, पालेभाज्या, सॅलेड, वरणभात असं साधं अन्न खा. तुमच्या आवडीप्रमाणे आणि शरीरात लवकर पचणारे पदार्थ तुम्ही या काळात खाऊ शकता.

केसांवर तेल लावणे -

हेअर स्पा करताना तुमच्या केसांना  खोलवर मुरणाऱ्या तेल आणि लोशनने मसाज केलेला असतो. त्यामुळे जर हेअर स्पा केल्यानंतर लगेचच तुम्ही केसांवर तेल अथवा इतर सौंदर्य उत्पादने वापरली तर तुमच्या केसांना अती प्रमाणात पोषण मिळते. ज्याची हेअर स्पा केल्यानंतर काहीच गरज नसते. त्यामुळे हेअर स्पा केल्यानंतर एका  आठवड्यानंतर केसांवर इतर ट्रिटमेंट करा अथवा तेल लावा.

मद्यपान अथवा धुम्रपान करणे -

आजकाल मद्यपान आणि धुम्रपान करणे ही एक प्रकारची जीवनशैलीच झाली आहे. मात्र मद्यपान आणि धुम्रपान तुमच्या शरीरासाठी घातक असते. याचा वाईट परिणाम तुमच्या केस आणि त्वचेवरही होतो. हेअर स्पा केल्यावर लगेचच मद्यपान अथवा धुम्रपान केल्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचा अंश कमी होत जातो. ज्यामुळे तुमचे केस पुन्हा कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात.

केस मोकळे सोडणे -

हेअर स्पा केल्यावर तुमच्या केसांची शक्य तितकी काळजी घ्या. केस मऊ आणि  मुलायम झाल्यामुळे त्यांना तुम्ही मोकळेच सोडता. मात्र हे चुकीचं आहे कारण आता तुमच्या केसांना तुम्ही जास्तीत जास्त झाकून ठेवलं पाहिजे. ज्यामुळे तुमच्या केसांचे धुळ, माती, प्रदूषणापासून संरक्षण होईल. त्याचप्रमाणे केस सैलसर बांधून ठेवण्यामुळे तुमचे केस नीट राहतात आणि केसांमधील चमक टिकू शकते. 

हेअर स्पानंतर लगेच केस धुणे -

काही महिलांना हेअर स्पा अथवा कोणतीही हेअर ट्रिटमेंट केल्यावर केस धुण्याची सवय असते. मात्र असं मुळीच करू नका. कारण केस धुणं ही कितीही चांगली गोष्ट  असली तरी हेअर स्पानंतर केस धुण्याने त्यातील मऊपणा  कमी होऊ शकतो. यासाठीच हेअर स्पा केल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन दिवस हेअर वॉश करणं टाळा.

हेअर स्टायलिंग करणे -

एखाद्या पार्टीसाठी अथवा कार्यक्रमाआधी हेअर स्पा करू नका. कमीत कमी एक ते दोन दिवस आधी हेअर स्पा करा. कारण  हेअर स्पा केल्यावर लगेचच त्यावर स्टायलिंग केल्यामुळे केसांचा मऊ पणा कमी होऊ शकतो. स्ट्रेटनर अथवा ड्रायरचा वापर हेअर स्पा नंतर जास्तीत जास्त कमी प्रमाणात करा. चांगल्या परिणमासाठी हेअर स्पा केल्यावर कमीत कमी एक आठवडा या वस्तूंचा वापर करू नका. 

कमी प्रमाणात पाणी पिणे -

हेअर स्पा केल्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणात तहान लागू शकते. कारण तुमच्या केसांना त्यातून अधिक पोषण  मिळतं. मात्र जर या काळात तुम्ही पुरेसं पाणी पिणं टाळलं तर याचा थेट परिणाम तुमच्या केसांवर होतो. यासाठी हेअर स्पा केल्यावर पाणी, ज्यूस, नारळपाणी, ग्रीन टी अवश्य घ्या.