वरण भात, पुरणपोळी, मोदक, खिचडी या पदार्थांची तूपाशिवाय आपण अजिबातच कल्पना करू शकत नाही. तूप म्हणजे आहारातील महत्त्वाचा भागच आहे. प्रत्येक भारतीय घरात तुम्हाला तूप तर दिसणारच. डालडा आणि साजूक तूप या दोन्हीमध्ये खूपच फरक आहे. गावठी तूप अर्थात आपण जे घरी गाय अथवा म्हशीचे दूध तापवून लोणी कढवून तयार करतो ते तूप. याबाबतच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांना वाटतं की, तूप खाल्ल्याने वजन अथवा चरबी वाढते. मात्र असं काहीही नाही. मुळात वजन अथवा चरबी ही तुपामुळे नाही तर तेलामुळे वाढते हे तुम्ही मनात पक्कं करा. तुम्ही रोज दिवसभरातून एक ते दोन चमचा तूप खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या त्वचेसाठी तर याचा अप्रतिम फायदा मिळतो. नक्की या गावठी तुपाचे काय काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
तूप हे आपण जेवणात नेहमी वरण भात अथवा खिचडीवर घालून खातो. हे पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होत नाहीत. पण तुपामध्ये नक्की कोणते घटक असतात याची तुम्हाला कल्पना आहे का? शरीराला पोषक असणारे अर्थात शरीराला योग्य पोषण देणारे असे कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, विटामिन डी, विटामिन ए आणि अँटिव्हायरल घटक असतात. जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अलर्जी असेल त्यावर तूप गुणकारी आहे. तुम्ही नियमित नाकातून काही थेंब घातल्यास, तुम्हाला असणारी अलर्जी कमी होईल. इतकंच नाही तर तुमचे अनेक आजार यामुळे बरे होतील. त्याशिवाय तुम्हाला केसगळती किंवा केसांच्या बाबतीत काही समस्या असतील तर या उपायाने त्या समस्याही दूर होतील. मुळात तुम्हाला तूप नियमित नाकातून शरीरात गेल्यास मायग्रेन अथवा डोकेदुखीसारख्या आजारातूनही सुटका मिळते.
बऱ्याच जणांना शौचाला जाण्यास त्रास होतो. पोट साफ होत नाही. यावर तूप हा उत्तम उपचार आहे. रोज रात्री झोपताना तुम्ही एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप मिक्स करा आणि ते प्या. यामुळे सकाळी तुम्हाला शौचाला साफ होईल अर्थात तुमचे पोट साफ होईल आणि त्याशिवाय मूळव्याधीचा त्रास असेल तर तोही संपेल. मुत्रविकार असतील तर जेवणाच्या आधी एक चमचा आणि जेवणानंतर एक चमचा तूप खावे. लवकरच हा विकार बरा होतो. तूप खाल्ल्याने पोटात जर गॅसचा जरी त्रास होत असेल तर तो दूर होण्यास मदत मिळते. जुलाब होत असतील तरीही त्यावर तूप अत्यंत गुणकारी आहे. तूप आणि साखर एकत्र करून खाल्ल्यास लगेच आराम मिळतो.
तूप खाल्ल्याने तुमची त्वचा अतिशय तजेलदार राहाते. पोट साफ झाल्याने कोणत्याही प्रकारची घाण त्वचेत साठून राहात नाही. तसंच तुम्हाला सतत ओठ फुटण्याचा त्रास असेल तर तुम्ही ओठांना तूप लावा. तूप लावल्याने ओठ अतिशय मऊ आणि मुलायम होतात.